Wednesday, April 23, 2014

असे वैज्ञानिक असे विज्ञान - ५ लिझ मेईट्नर

इतिहासातील आत्यंतिक सुदैवाचे आणि आत्यंतिक दुर्दैवाचे फेरे वाट्याला आलेली शास्त्रज्ञ असे मीं हिचे वर्णन करेन. अणुभंजनाची म्हणजेच ऍटॉमिक फिशनची प्रणेती असलेली लिझ वैज्ञानिक जगतांत खरे तर अणुबॉंबची आई म्हणूनच समजली जाते. पण समाजाकडून अपमानित होण्यासाठीं आवश्यक असलेल्या एक नव्हे तर दोन तत्कालीन गोष्टी तिच्या ठायी उपजतच होत्या. पहिली म्हणजे तिने स्त्रीजन्म घेतला. दुसरी म्हणजे म्हणजे ती जन्माने ज्यू होती आणि कर्तृत्त्व ऐन बहरात असताना ती नंतर नाझी टाचेखाली गेलेल्या जुलमी जर्मनीत होती. परिणाम काय? वयाच्या ६६ व्या वर्षापर्यंत अवहेलना, हेतुपुरस्सर केलेले अवमान आणि असंख्य पाणउतारे वाट्याला आले.

जन्म ७ किंवा १७ नोव्हेंबर १८७८. वडील फिलिप मेईट्नर हे ऑस्ट्रियातील पहिल्या काहीं ज्यू वकीलांपैकी एक. त्यांच्या आठ मुलांपैकी लिझ तिसरी. व्हिएन्नाच्या ज्यू समाजाच्या रजिस्टरमध्ये  तिचा जन्म १७ नोव्हेंबर १८७८ असा दाखवलेला आहे तर इतर सर्व दस्तावेजातल्या नोंदीत तो आहे ७ नोव्हेंबर १८७८. १९०८ सालीं वयाच्या ३० व्या वर्षी तिनें बाप्तिस्मा घेतला आणि प्रॉटेस्टंट ख्रिश्चन धर्म स्वीकारला. आपलें एलिझ (Elise) हे नाव आणखी छोटे करून तिने लिझ (Lise) असे केले.

त्या काळी महिलांना शैक्षणिक संस्थांतून उच्च शिक्षण घेता येत नसे. पण तिच्या आईबाबांच्या पाठिंब्यामुळे तिला ते शक्य झाले. चांगले, नव्हे सर्वोत्तम म्हणता येतील असे आईबाबा लाभले हे तिचे भाग्यच. याबद्दल तिच्या आईबाबांचे जगावर उपकारच आहेत. Externe Matura ही शालांत परीक्षा Akedemisches Gymnasium या व्हिएन्नातील सर्वांत जुन्या शाळेतून मधून मिळवून तिने १९०१ सालीं खाजगी रीत्या आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.  आपले शिक्षक आणि विख्यात भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्टझमन यांच्या प्रोत्साहनामुळे तिने भौतिकशास्त्राचा अभ्यास केला. व्हिएन्ना विद्यापीठातून भौतिकशास्त्रातून डॉक्टरेट घेणारी ती दुसरी महिला. साल होते १९०५. गॅसचे दिवे बनवणार्‍या कारखान्यांत काम करायची संधी तिने नाकारली. वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे तसेच आर्थिक पाठिंब्यामुळे ती बर्लिनला गेली. मॅक्स प्लांकने आपल्या व्याख्यानांना हजर राहायची तिला परवानगी दिली. खरे तर हे थोडे विचित्रच होतें. तोपर्यंत मॅक्स प्लांकने एकाही महिलेला तशी परवानगी दिली नव्हती. तिच्या आयुष्यातील सुदैवी घटनांमधली एक एक झळझळीत शलाका. एक वर्षानंतर ती मॅक्स प्लांकची सहाय्य्क बनली. सुरुवातीची काही वर्षे तिने रसायनशास्त्रज्ञ ऑटो हान याच्या बरोबर काम केले. भौतिकशास्त्रज्ञ लिझ मेईट्नर आणि रसायनशास्त्रज्ञ ऑटो हान अशी अद्वितीय जोडगोळी बनली. दोघांनीं संयुक्त रीत्या अनेक समस्थानिके - आयसोटोप्स - शोधून काढले. १९०९ मध्ये तिने बीटा किरणोत्सर्गावर दोन प्रबंध सादर केले.

१९१२ मध्ये हान-मेईट्नर ही संशोधक जोडगोळी बर्लिनमध्ये नवीनच स्थापन झालेल्या कैसर विल्हेम इन्स्टिट्यूट म्हणजेच केडब्लूआय या नैऋत्य बर्लिनमधल्या डाह् लेम इथें स्थलांतरित झाली. हानच्या किरणोत्सर्गी रसायनांच्या विभागात तिनें पाहुणी शास्त्रज्ञ म्हणून बिनपगारी काम केले. म्हणजे दुर्दैवाचे दशावतार आता सुरु झाले होते. वयाची पस्तिशी गांठली तरी १९१३ मध्ये प्राग इथे सह-प्राध्यापक अर्थात असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करायची संधी येईपर्यंत तिला केडब्लूआय मध्यें मात्र कायमस्वरूपी पद मिळाले नाही.

पहिल्या महायुद्धाच्या पूर्वार्धात तिने परिचारिका म्हणून क्ष-किरण खाते सांभाळले. जर्मनींत देशसेवा केल्याचें तिला काय फळ मिळाले ते पुढे कळेलच. १९१६ मध्ये ती आपलें संशोधनकार्य पुढे चालू करायला बर्लिनला परतली. पण त्यासाठीं तिला प्रचंड आंतरिक संघर्ष करावा लागला. युद्धबळींच्या वेदना आणि यातना पाहून आणि त्यांना तिच्या वैद्यकीय तसेंच मानसिक मदतीची गरज असतांना आपले संशोधनकार्य पुढें चालू ठेवणे तिला लाजिरवाणें वाटले.

१९१७ मध्ये तिने आणि हानने दीर्घकाळ टिकणारा प्रोटॅक्टिनिअम या मूलद्रव्याच्या समस्थानिकाचा शोध लावला. त्या वर्षी कैसर विल्हेम इन्स्टिट्यूट फॉर केमिस्ट्री इथे तिचा भौतिकशास्त्र विभाग तिच्या हवाली करण्यात आला. १९२३ मध्ये तिने ‘ऑगर परिणामा’चीं कारणे शोधून काढली. गंमत म्हणजे त्यानंतर जवळजवळ दोन वर्षांनीं पियरे व्हिक्टर ऑगर या फ्रेंच वैज्ञानिकाने स्वतंत्रपणे शोधून काढला. या ऑगरच्या नावावरून या परिणामाचें ऑगर इफेक्ट असे बारसे झाले. याचें श्रेय लिझला मिळाले नाहीं कारण लिझला हा शोध वेगळे शोधकार्य करतांना अचानक योगायोगाने लागला. ऑगरचे संशोधन मात्र याच शोधाच्या दिशेने केलेले होते.

१९३० मध्ये मेईट्नरने प्रख्यात शास्त्रज्ञ लीओ शिलार्ड याच्या साथीने एका परिषदेत आण्विक भौतिकशास्त्र आणि आण्विक रसायनशास्त्राचे धडे दिले. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना अणुबॉंब बनवण्याबद्दल विनवणी करणारे पत्र लिहिणारा आणि एनरिको फर्मीच्या साथीने अणूभट्टीचे पेटंट घेणारा विख्यात शास्त्रज्ञ तो हाच शिलार्ड. १९३० मध्ये न्यूट्रॉनच्या शोधानंतर ९२ अणुक्रमांकाच्या यूरॅनियमपेक्षा जड मूलद्रव्य प्रयोगशाळेत बनविणें शक्य असल्याचें वर्तवले जाऊ लागले. आणि ब्रिटनमधला अर्नेस्ट रदरफर्ड, फ्रान्समधील आयरीन जोलिओत क्यूरी (मेरी आणि पीअरे क्यूरीची मुलगी), इटलीमधील एनरिको फर्मी आणि बर्लिनमधली मेईट्नर-हान जोडगोळी यांच्यात एक वैज्ञानिक शर्यत लागली. त्या काळी सर्व संबंधितांचा असा ग्रह झाला होता की संभाव्य नोबेल पारितोषिकाच्या आशेनें एका अमूर्त संशोधनाच्या दिशेने हा सर्व प्रवास सुरूं आहे. या संशोधनाचे पर्यवसान अण्वस्त्रात होईल अशी शंकाहि कोणाच्या मनात आली नव्हती.

१९३३ मध्ये ऍडॉल्फ हिटलर सत्तेवर आला तेव्हा मेईट्नर रसायन संस्थेची कार्यकारी संचालिका होती. पण जरी तिला तिच्या ऑस्ट्रियन नागरिकत्त्वाचे संशोधकांचे संरक्षण होते तरी फ्रीट्झ हेबर, लीओ शिलार्ड तसेंच तिचा भाचा ऑटो फ्रीश आणि अनेक ज्यू मान्यवरांना एकतर घालवून तरी दिले किंवा त्यांचे राजीनामे तरी घेतले. त्यांपैकीं बहुतेक जर्मनीतून पळाले. या काळात तिला अतिशय अपमानास्पद वागणूक मिळत असे. तिच्यासोबत चालणार्‍या तिच्या दुय्यम सहायकांना देखील इमारतींतील कॉरिडॉरमध्ये समोरून येणारे लोक गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून अशा अर्थाचे जर्मन भाषेंतले अभिवादन करीत पण तिच्याकडे पाहातही नसत वा तिच्या आरपार पाहात तिच्या अस्तित्त्वाची दखलही घेत नसत. ठायी ठायी असा अपमान होऊनही लिझने स्वतःला कामात गाडून घेतले. कारण एकच. आपल्या विषयातील संशोधनाबद्दल अतीव ओढ. ताबडतोब जर्मनीतून बाहेर पडले नाहीं हा केवळ मूर्खपणच नव्हता तर ही घोडचूकच होती अशी प्रांजळ कबुली तिने नंतर १९४६ मध्ये दिली.

ऑस्ट्रिया जर्मनीला जोडल्यानंतर मात्र पाणी गळ्याशी आलें. जुलै १९३८ मध्ये ती डच भौतिकशास्त्रज्ञ डर्क कोस्टर आणि ऍड्रियन फोकर यांच्या मदतीने नेदरलॅंड्सला पळाली. डच सीमेवर तिला छुप्या रीतीने जावे लागले. तिला नेदरलॅंड्सला जाण्याची परवानगी आहे असे सांगून जर्मन इमिग्रेशन अधिकार्‍यांची कोस्टरनें मनधरणी केली तेव्हा ती नेदरलॅंड्समध्ये सुरक्षित पोहोंचली खरी पण काहींही चीजवस्तु न घेता, केवळ अंगावरल्या कपड्यानिशीं. ती लिहिते कीं तिने जर्मनी सोडली ती पर्समध्यें केवळ दहा मार्क्स घेऊन. निघतांना ऑटो हाननें तिला त्याच्या आईकडून त्याला मिळालेली हिर्‍याची अंगठी दिली. जरूर पडली तर सीमेवरच्या पहारेकर्‍याला लाच म्हणून द्यायसाठी. पण तशी जरूर पडली नाही आणि नंतर तिच्या भाच्याच्या बायकोने ती वापरली. हानच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन विलक्षण पैलूचे इथें दर्शन होते. संकटांतल्या सहकार्‍याला अशी मदत करण्यामागचा अपार जिव्हाळा आणि मदत करतांना घेतलेली पुरावा मागे न ठेवण्याबाबत घेतलेली कांटेकोर दक्षता. शास्त्रज्ञ हे सहसा बावळट आणि अजागळ असतात आणि त्यांना व्यवहारांतील एवढे बारकावे ठाऊक नसतात तसेच निकटच्या सुहृदांना ते प्रेम देऊं शकत नाहीत असा प्रवाद आहे, पण या प्रवादाला छेद देणारी ही गोष्ट आहे.

पलायनात मेईट्नर यशस्वी झाली ते तिचें नशीबच. कुर्ट हेस नावाचा एक अतिउत्साही नाझी रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने मेईट्नर पलायन करणार असल्याची खबर संबंधित अधिकार्‍यांना दिली होती. परंतु ती सुखरूप पोहोचल्याचे कळल्यावरच काही अज्ञात मित्रांनीं तपासाचीं चक्रे फिरवलीं. ग्रॉनिंजेन विद्यापीठातील नेमणूक कांही फलद्रूप झाली नाही. त्याऐवजीं ती स्टॉकहोमला गेली. तिथे तिला मॅन सीग्बान्स प्रयोगशाळेंत पद मिळाले. तिथे स्त्रियांबद्दल आकस असल्यामुळे उद्भवणार्‍या अडचणी असूनही. इथे तिला प्रयोगशाळा मिळाली पण तांत्रिक साहाय्य करायला एकही शास्त्रज्ञ मिळाला नाही. एवढेच काय प्रयोगशाळेच्या चाव्याहि दुसर्‍याच कोणाकडे तरी असत आणि म्हणून ती चावीवाली व्यक्ती असल्याशिवाय ती प्रयोगशाळेंत जाऊपण शकत नसे. मात्र इथे नील्स बोहर (किंवा बोर)बरोबर तिचे व्यावसायिक नाते जुळल. बोहर तेव्हां कोपनहेगन ते स्टोकहोम अशा फेर्‍या नेमानें मारीत असे. हान आणि इतर जर्मन वैज्ञानिकांशी लिझ मेईट्नरचा पत्रव्यवहार सुरूं राहिला.

हान आणि मेईट्नर कोपनहेगन इथें छुप्या रीतीनें भेटत असत. प्रयोगांच्या नवीन फेर्‍यांची आखणी करायला. त्यानंतरही त्यांचा बराच पत्रव्यवहार झाला. हाननें नंतर तिच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्ट्रॉसमनला साथीला घेऊन कोपनहेगमध्यें काही अवघड प्रयोग केले. त्यांतून रेडियम हा धातू उत्पन्न झाला असे त्याला वाटले. पण प्रत्यक्षांत तो धातू होता बेरियम. मेईट्नरच्या स्थलांतरामुळे एक मात्र झाले. अणुविभाजनाचे अभिलेख बर्लिनच्या प्रयोगशाळेपासून दूर गेले आणि त्यामुळे बर्लिन उद्ध्वस्त होतांना नष्ट होण्यापासून वाचले. हान-मेईट्नर पत्रव्यवहारावरून असे दिसतें की बेरियमच्या निर्मितीचे कारण हे एकमेव आणि केवळ अणुभंजनच आहे हे हानने ओळखले होते. परंतु आपल्याच या लक्षणीय निष्कर्षाच्या धक्क्यानें त्याने कच खाल्ली आणि त्याने तसे मेईटनरला कळवले. न्यूट्रॉन्सच्या भडिमारामुळे युरेनियमचा अणुगर्भ भंग पावण्याची शक्यता बरीच वर्षे अगोदर वर्तवण्यात आली होती. खास करून आयडा नोडॅक हिनें १९३४ सालीं. परंतु अणुगर्भाचे तेव्हा प्रचलित असलेलें ‘लिक्विड ड्रॉप’ हें नील्स बोहरचे मॉडेल वापरून.

अणुगर्भाचे लहानलहान तुकडे कसे करता येतील याचा सिद्धांत शब्दबद्ध करण्यात मेईट्नर आणि फ्रीश हे प्रथमच यशस्वी झाले. युरेनियमच्या अणुगर्भाचे तुकडे होऊन त्यापासून बेरियम आणि क्रिप्टॉन या द्रव्यांचे अणुगर्भ निर्माण झाले होते, सोबतच अनेक न्यूट्रॉन्स आणि प्रचंड ऊर्जा मुक्त झाली होती. न्यूट्रॉन्स आणि ऊर्जा कुठून तयार झालीं? याचें कारण होतें यूरेनियमच्या अणुगर्भाच्या मूळ वस्तुमानात झालेली घट. नवीन तयार झालेल्या बेरियम व क्रिप्टॉन यांचे एकूण वस्तुमान हे युरेनियमच्या मूळ वस्तुमानाएवढे असायला हवे. पण प्रत्य्क्ष प्रयोगात मात्र ते कमी भरले. मग या कमी झालेल्या वस्तुमानाचे होते काय? एक कारण होते युरेनियमच्या अणुगर्भातून बाहेर पडलेले न्यूट्रॉन्स. त्या बाहेर पडलेल्या न्यूट्रॉन्सचें वजन विचारात घेतले तरीही अजून तूट शिल्लक होतीच. का बरे? प्रोटॉन्सचेच वजन कमी झाले होते का? की इलेक्ट्रॉन्सचे? त्या वजनातल्या तुटीतूनच तर ही बाहेर पडलेली ऊर्जा निर्माण झाली होती. मेईट्नरच्या हेही लक्षात आले होते की अणू नाश पावतांना जी प्रचंड ऊर्जा मुक्त होते त्याचेच ‘कमी झालेल्या वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होतें’ हें स्पष्टीकरण आईनस्टाईनच्या E=MC2 या सूत्रातून मिळते. तिने आणि फ्रीशने युरेनियममध्ये जेवढे प्रोटॉन असतात त्यापेक्षा जास्त प्रोटॉन असलेली मूलद्रव्ये निसर्गतः का आढळत नाहीत याचे मर्म आता जाणले होते. इतक्या संख्येनें असलेल्या प्रोटॉन्समध्ये आपापसांत असलेले विद्युत अपकर्षण हें तीव्र अणुगर्भीय बलावर मात करते हेच ते मर्म.

नील्स बोहर एका पत्रांत टिप्पणी करतो की त्याने प्रयोगात युरेनियम अणूंवर भडिमार केल्यानंतर जेवढी ऊर्जा मुक्त झाली ती ऊर्जा ही भंजनशील नसलेल्या अणुगर्भावर आधारित गणित केले तर जेवढी भरेल त्यापेक्षा फारच प्रचंड प्रमाणात होती. त्यातून डिसेंबर १९३८ मध्ये वरील मीमांसेला स्फूर्ती मिळाली. १९३८ मध्ये हे सर्व हानच्या साथीने प्रसिद्ध करणे तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे अशक्य होते. १९३८ मध्ये हान आणि फ्रीट्झ स्ट्रॉसमन या दोघांनी आपल्या प्रबंधाचें हस्तलिखित ‘नेचरविसेन्सकाफटेन’ कडे प्रसिद्धीसाठीं पाठवले. या प्रबंधात त्यांनी न्यूट्रॉन्सचा भडिमार केल्यावर युरेनियमपासून बेरियम सांपडल्याचे लिहिलेले होते. त्याचबरोबर त्यांनी हेच मेईट्नरलाही पत्राद्वारे कळवले होते. १९३९ साली हा प्रबंध प्रसिद्ध झाला व या प्रबंधाबद्दलच हानला नोबेल पारितोषिक मिळाले. या पारितोषिकातून मेईट्नरला वगळणे ही एक nobel mistake अर्थात उदात्त चूक समजली जाते. मेईट्नर आणि तिचा भाचा ऑटो रॉबर्ट फ्रीश याने या प्रयोगाचें अचूक भौतिकशात्रीय विश्लेषण करून ‘हेच तर अणुभंजन आहे’ असा अर्थ लावला. १३ जानेवारी १९३९ रोजी फ्रीशने हे प्रयोगाने सिद्ध देखील केले.

साखळी प्रक्रियेने यात अफाट स्फोटक शक्ती असल्याचे मेईट्नरने ओळखले. या अहवालाने शास्त्रीय जगतात एकच खळबळ माजली. कारण याचा अस्त्र म्हणून वापर होऊ शकतो. आणि हे ज्ञान जर्मनांच्या हातात असल्यामुळे लीओ शिलार्ड, एडवर्ड टेलर आणि युजीन विग्नर हे मूळचे हंगेरियन ज्यू पण आतां अमेरिकन बनलेले शास्त्रज आतां जोमाने कामाला लागले. ते आतांपावेतो उत्सवमूर्ती बनलेल्या आल्बर्ट आईनस्टाईनच्या मागे लागले. त्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलीन रूझवेल्ट यांना या संभाव्य जर्मन अण्वस्त्राच्या धोक्याची जाणीव करून देणारे पत्र लिहावे म्हणून. परिणामी काही वर्षांनी मॅनहॅटन प्रकल्प उभा राहिला. लॉस अलामॉस येथील प्रकल्पात काम करायची संधी तिने नाकारली. कोणत्याही बॉंबसाठी मी काहीही करणार नाही असें ठासून सागून. तिची तत्वनिष्ठा केवढी जाज्ज्वल्य आहे पाहा. हिरोशिमा हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्काच आहे आणि बॉंबची निर्मिती झाल्याबद्दल मला अत्यंत खेद होत आहे असे उद्गार नंतर तिने काढले.

मेईटनर प्रथम स्वीडनमधल्या सिग्बाहनच्या नोबेल इन्स्टिटयूट फॉर फिजिक्स मध्ये काम करीत होती. स्वीडनमधील संरक्षण संशोधन खात्यात आणि स्टॉकहोममधील शाही तंत्र निकेतनात. तिथे तिच्याकडे प्रयोगशाळा होती आणि तिने आर-१ या स्वीडनच्या पहिल्या अणुभट्टीच्या संशोधनकार्यात भाग घेतला होता. १९४७ मध्यें स्कॉटलंड विद्यापीठाच्या महाविद्यालयांत व्यक्तिशः तिच्यासाठीं एक खास पद निर्माण केले गेले. प्राध्यापकाएवढ्या वेतनावर आणि यासाठी निधी उपलब्ध केला होता अणुशक्ती संशोधन मंडळाने.

१९४४ मध्ये हानला अणुभंजन प्रक्रिया शोधून काढल्याबद्दल रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. बर्‍याच इतिहासकारांना त्याच्या जोडीनें याच शोधाबद्दल मेईट्नरलाही हे पारितोषिक मिळायला हवे होते असे वाटते. आईनस्टाईनला तिच्याबद्दल फार आदर वाटत असे आणि तो तिला ‘आमची मेरी क्यूरी’ असें आदराने म्हणत असे. पण आता मात्र वयाच्या ६८ व्या वर्षी तिला थोडे बरे दिवस आले. १९४६ सालीं अमेरिकेच्या दौर्‍यावर असतांना नॅशनल प्रेस क्लबमधील राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन आणि इतर मान्यवरांसमवेत झालेल्या मेजवानींत तिला ‘वुमन ऑफ द ईयर’ हा बहुमान दिला गेला. जर्मनीत परतायला मात्र तिने नकार दिला. सन १९६६ मधेयं हान, फ्रीट्झ स्ट्रॉसमन आणि मेईट्नर या तिघांना एनरिको फर्मी पारितोषिक मिळाले. हे पारितोषिक नोबेल पारितोषिकाच्या तोडीचे समजले जाते.  १९४९ मध्ये जर्मन भौतिकी मंडळाने दिलेले मॅक्स प्लांक पदक तिला मिळाले. तीन वेळा तिचे नांव नोबेल पारितोषिकासाठी सुचवले गेले, हा एक दुर्मिळ बहुमानच समजला जातो. परंतु त्यापेक्षाही मोठा आणि एक अजोड बहुमान तिला लाभला. १०९ क्रमांकाच्या मूलद्रव्याला मेईट्नेरिअम हें नाव दिले गेले. १९४५ मध्ये स्वीडिश शाही विज्ञान अकादमीची परदेशी सदस्या म्हणून तिचा सन्मान करण्यात आला. १९५१ मध्ये या सदस्यत्वात ‘परदेशी’ ऐवजी ‘स्वीडिश’ सदस्या असा बदल झाला. ऐंशीचे दशक उलटायला आले तरी स्टॉकहोममधे राहून संशोधन करण्यातला आणि सेवानिवृत्त आयुष्याचा उपभोग घेण्यातला आनंद उपभोगणे तिने पसंत केले. १९३३ ते १९३८ या काळात जर्मनी न सोडण्यांत आपली नैतिक चूक झाली असे तिने कबूल केले. पण हान आणि इतर जर्मन शास्त्रज्ञांबद्दल ती नाझींना सहकार्य दिल्याबद्दल आणि वेर्नर हायझेनबर्गबद्दल हिटलरशाहीविरुद्ध ब्र देखील न काढण्याच्या भूमिकेबद्दल ती फार कडवटपणे बोलते. "हायझेनबर्ग आणि तशाच कोट्यावधींना या छळछावण्या आणि तिथले दुर्दैवी बळीं जबरदस्तीने बघायला लावले पाहिजेत" असे तिने म्हटले आहे. हानला लिहिलेल्या एका पत्रात ती लिहिते,

"तुम्ही सर्वांनी नाझींसाठी काम केले. आणि तुम्ही त्यांना विरोध करायचा प्रयत्न केवळ नावापुरताच केला. आपला सदसद्विवेक कुठेतरी विकायचा म्हणून तुम्ही स्वतःवरच जुलूम करून घेतलात परंतु निषेधाचा एकही शब्द उच्चारला गेल्याशिवाय लाखो लोकांचे शिरकाण झाले ...(असे म्हटले जाते की) तुम्हीं तुमच्या मित्रांचा विश्वासघात केलात, नंतर तुम्ही तुमच्या मुलांचे प्राण या एका महापातकी युद्धात पणाला लावले - आणि शेवटी तुम्ही खुद्द जर्मनीचाही विश्वासघात केलात, कारण युद्ध जिंकायच्या आशा नष्ट झाल्यावरही जर्मनीचा निष्कारण होणारा सर्वनाश टाळायसाठीं देखील एकदाही हातात शस्त्र धरले नाही."

मेईट्नर आणि हान यांची मैत्री मरेपर्यंत टिकली. 
मेईट्नर जन्मानें ज्यू होती. बेल्सेन आणि बुचेनवाल्डमध्ये राहिलेल्या ज्यूंचे पुढें काय होत आहे हे तिला रेडिओवर कळत होते. छळछावण्यांबद्दल कळल्यावर तिची झोंप पार उडाली आणि तिला भयंकर स्वप्ने पडायला सुरुवात झाली. अपार औदासीन्यामुळें तिला रडे अनावर होत असे व रडता रडता ती बेशुद्धही होत असे. ‘मो बर्ग’ हा अमेरिकन ज्यू बेसबॉलपटु १९४१ मधल्या पर्ल हार्बर हल्ल्यानंतर सी आय ए मध्यें दाखल झाला होता व युरोपमध्ये, खासकरून भौतिकशास्त्रज्ञ आणि अणुगर्भशास्त्रज्ञांमध्ये जर्मनीविरोधी लोकमत तयार करणारा कार्यकर्ता होता. या मो बर्गकडे ती दीर्घकाळ आपले मन मोकळे करीत असे.

१९४९ मध्ये मेईट्नर स्वीडिश नागरिक बनली. १९६० मध्यें ती इंग्लंडमध्ये गेली आणि आपली नव्वदी गाठायला थोडेच दिवस असतांना २७ ऑक्टोबर १९६८ रोजी केंब्रिजमध्यें मरण पावली. हॅंपशायरलधील ब्रॅमले गावांतील सेंट पॅरिश चर्चमध्यें वॉल्टर या तिच्या १९६४ सालीं वारलेल्या धाकट्या भावाच्या शेजारीच तिचें दफन झाले. ऑटो रॉबर्ट फ्रीशनें तिच्या दफनशिलेवर ‘लिझ मेईट्नर, जी कधीही माणुसकी विसरली नाहीं’ अशा अर्थाची अक्षरे कोरली.

 
- X – X – X -

No comments: