Tuesday, April 22, 2014

असे वैज्ञानिक असे विज्ञान - 3 सर जगदीशचंद्र बसू

सर जगदीशचंद्र बसू
सर जगदीशचंद्र बसू. त्यांच्या मातृभाषेतील म्हणजे बंगाली उच्चार सर जॉगदीशचॉंद्र बॉशू. जन्म ३० नोव्हेंबर १८५८. एक चतुरस्त्र वैज्ञानिक. भौतिकशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, जैवभौतिकी शास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ आणि पुरातत्वज्ञ. सुरुवातीच्या थोडक्या विज्ञानसाहित्यिकांपैकीं एक. रेडिओ आणि सूक्ष्मलहरी प्रकाशविज्ञान - मायक्रोवेव्ह ऑप्टीक्स यांतील संशोधनाचा वस्तुपाठ त्यांनी घातला. वनस्पतीशास्त्रात त्यांनी मोलाची भर घातली. भारतीय उपखंडात प्रायोगिक विज्ञानाचा पायाच त्यांनी घातला. रेडिओ विज्ञानाचे जनकत्त्व ज्या काही मोजक्या शास्त्रज्ञांकडे जातें, त्यांपैकी एक. बंगाली विज्ञानसाहित्याचे जनक असलेले साहित्यिक आणि अमेरिकन हक्क - पेटंट मिळवणारी भारतीय उपखंडातील पहिली व्यक्ती अशी त्यांची थोडक्यात पण चतुरस्त्र अशी ओळख करून देता येईल.   

 भारतावर ब्रिटिशांचे राज्य असताना बंगालमधील मुन्शीगंज जिल्ह्यांत त्यांचा जन्म झाला. मुन्शीगंज जिल्ह्यांतील रारीखाल, बिक्रमपूर हें त्यांचे मूळ गाव. सध्या हा मुन्शीगंज जिल्हा बांगला देशात आहे. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू यांनी ब्राम्हो समाजाचा स्वीकार केला होता आणि ते फरीदपूर येथे उपदंडाधिकारी (डेप्युटी मॅजिस्ट्रेट) तसेच सहायक आयुक्त (असिस्टंट कमिशनर) म्हणून कार्यरत होते. इंग्रजी शिक्षण घेण्याअगोदर आपल्याला आपल्या मातृभाषेची तसेच स्वकीयांची ओळख असली पाहिजे असें भगवानचंद्रांचे मत होतें त्यामुळे त्यांनी छोट्या जगदीशचंद्रला प्रथम बंगाली माध्यमाच्या शाळेत घातले. १९१५ सालीं बिक्रमपूर येथील एका परिषदेत जगदीशचंद्र म्हणाले होते, "त्या काळी मुलांना इंग्रजी शाळेत पाठवणे हे उच्चभ्रू लोकांत एक प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाई. मीं जात असलेल्या देशी शाळेत माझ्या उजव्या बाजूला माझ्या वडिलांच्या मुस्लिम चपराशाचा मुलगा बसत असे तर डाव्या बाजूला एका कोळ्याचा मुलगा. हे दोघे माझे खेळगडी होते. त्यांच्या तोंडून पशुपक्ष्यांच्या आणि जलचरांच्या गोष्टी ऐकतांना मीं मंत्रमुग्ध होऊन जात असे. कदाचित त्या गोष्टींमुळेच माझ्या मनांत निसर्गाच्या किमयेबद्दल तीव्र जिज्ञासा निर्माण झाली असावी. माझ्या या सवंगड्यांसमवेत घरी आल्यावर माझी आई आम्हांला कोणताहि पंक्तिप्रपंच न करता खाऊ घालत असे. जरी ती एक सनातनी कर्मठ स्त्री असली तरी या अस्पृश्यांना आपल्या मुलासारखीच वागणूक देतांना तिच्यामनात कधीच अपराधी भावना दाटली नाही. त्यांच्याशी असलेल्या माझ्या मित्रत्त्वाच्या नात्यामुळेच मला ‘खालच्या जातीतले’ म्हणतां येतील असे प्राणी कुठे असू शकतील असें कधीही वाटले नाही. हिंदू आणि मुस्लिम या दोन्हीं समाजांना अशी एकच ‘समस्या’ भेडसावू शकेल हे मला कधी समजलेच नाही." एक शास्त्रज्ञ म्हणून जगदीशचंद्र तर श्रेष्ठ होतेच, पण एक व्यक्ती म्हणून ते किती श्रेष्ठ होते ते यावरून कळते.

१८६९ सालीं ते हेअर (Hare) शाळेत गेले आणि १८७५ कलकत्ता विद्यापीठाची पदवीच्या दर्जाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन सेंट झेवियर महाविद्यालयांत प्रवेश घेतला. इथे त्यांची फादर युजीन लफॉंट यांच्याशी ओळख झाली. त्यांच्यामुळेच त्यांना निसर्गविज्ञानाची गोडी लागली. १८७९ मध्यें त्यांनी पदवी मिळवली. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी त्यांनी लंडन विद्यापीठांत प्रवेश घेतला खरा पण प्रकृती बिघडल्यामुळें पूर्ण करू शकले नाहीत. मग ते भारतात परत आले आणि कलकत्ता विद्यापीठातील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये भौतिकविज्ञानाचे अधिव्याख्याते म्हणून ऋजूं झाले. इथें गोर्‍यांचा वंशभेद आणि तुटपुंजा निधी आणि अपुरी साधनसामग्री याचा सामना करीतच आपले संशोधन त्यांनी चालू ठेवले. दूरवर बिनतारी संदेश पाठविण्यात त्यांनी भरघोस प्रगति केली आणि संदेशग्रहणासाठी सर्वप्रथम उभयवाहकाचा - सेमीकंडक्टरचा उपयोग केला. पण केवळ आपल्या या संशोधनाचा इतरांना विकास करतां यावा म्हणून त्यांनी या संशोधनाचे हक्क न घेता ते प्रसिद्ध केले.

जगदीशचंद्रांना खरें तर इंग्लंडला जायचे होते ते आय सी एस होण्यासाठी. परंतु सरकारी अधिकारी असलेल्या त्यांच्या वडिलांनी त्यांचा हा बेत रद्द केला. आपला मुलगा विद्वान व्हावा आणि परक्या ब्रिटिशांची चाकरी न करता स्वतःचा स्वामी व्हावे अशी त्यांची इच्छा होती. मग जगदीशचंद्र वैद्यकीय शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले. पण तिथे ते आजारी पडले. तिथे शवविच्छेदनादरम्यान येणार्‍या तीव्र दर्पानें त्यांचा आजार बळावला असें म्हटले जाते.

त्यांच्या बहिणीचे यजमान आनंद मोहन हे पहिले भारतीय रॅंग्लर होते. जगदीशचंद्रांना केंब्रिजच्या खिस कॉलेजमध्ये निसर्गविज्ञान शिकायला प्रवेश मिळाला तो त्यांच्याच शिफारसीमुळे हे जरी खरे असले तरी त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून (ब्रिटनमध्यें) ट्रायपॉस या नांवानें ओळखली जाणारी पदवी मिळवली आणि १८८४ सालीं लंडन विद्यापीठातून बी एस सी ची पदवी मिळवली. केंब्रिजला त्यांना लॉर्ड रेले, मायकल फॉस्टर, जेम्स डेवर, फ्रॅन्सिस डार्विन (विख्यात निसर्गशास्त्रज्ञ सर चार्ल्स डार्विन यांचे सुपुत्र), फ्रान्सिस बाल्फोर आणि सिडनी व्हाईन्स यांसारखे दिग्गज गुरू लाभले. 

कलकत्त्यातील एशियाटिक सोसायटीत सर जगदीशचंद्रांच्या १५०व्या जयंतीनिमित्त भरलेल्या परिषदेत २८ जुलै रोजी केलेल्या भाषणात कलकत्त्याच्या बोस इन्स्टीट्यूटचे संचालक प्रा. शिबाजी राहा म्हणाले की त्यांनी स्वतः केंब्रिज विद्यापीठाच्या दस्तऐवजांतील नोंद तपासून पाहिली आणि त्यांना आढळले कीं केंब्रिजमधून त्यांना ट्रायपॉसव्यतिरिक्त एम ए ही पदवी देखील १८८४ मध्यें देण्यात आली होती.

१८८५ मध्यें जगदीशचंद्र भारतात परत आले. लॉर्ड रिपन तेव्हां व्हाईसरॉय होता. तेव्हा रिपनचा फॉसेट नावाचा आर्थिक सल्लागार होता. या फॉसेटचें रिपनला लिहिलेलें (शिफारस)पत्र तेव्हां जगदीशचंदांनी सोबत आणले होतें. सर आल्फ्रेड क्रॉफ्ट तेव्हां ‘लोकसूचना संचालक’ (डायरेक्टर ऑफ पब्लीक इन्स्ट्रक्शन) या पदावर होते. रिपनच्या विनंतीवरून त्यांनीं जगदीशचंद्रांची प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये भौतीकशास्त्राचे कार्यकारी प्राध्यापक - ऑफिशिएटिंग प्रोफेसर ऑफ फिजिक्स - या पदावर नियुक्ती केली. या नेमणुकीविरुद्ध कॉलेजचे प्राचार्य सी एच टॉने (C. H. Tawney) यांनी निषेध नोंदवला खरा पण त्यांना ती नेमणूक स्वीकारावीच लागली. स्वतःला पुरोगामी म्हणवणारे ब्रिटीश सामाजिकदृष्ट्या किती मागासलेले होते हे याचा हा आणखी एक ढळढलीत पुरावा.

त्यांना संशोधनाच्या सुविधा तर मिळाल्या नाहीतच वर वेतन ठरवतांना ते वर्णद्वेषाचे बळी ठरले. त्या काळीं गोर्‍या प्राध्यापकांना ३०० रुपये वेतन मिळे पण हिंदुस्थानी प्राध्यापकांना केवळ २०० रुपयेच मिळत. जगदीशचंद्र बोस यांची नेमणूक ही कार्यकारी म्हणजे officiating अर्थात हंगामी वा तात्पुरती म्हणता येईल अशीच असल्यामुळे त्यांना केवळ १०० रुपये देऊ केले. स्वाभिमानाचा आणि देशप्रेमाचा एक आगळाच पैलू दाखवितांना त्यांनी निषेधाचा नवीनच मार्ग पत्करला. त्यांनीं वेतनाचा धनादेश स्वीकारायलाच नकार दिला. तब्बल तीन वर्षे त्यांनीं अध्यापनाचे कार्य विनावेतन केले. शेवटी लोकसूचना संचालक आणि प्राचार्य, दोघांनाही त्यांच्या अध्यापनाच्या कौशल्याचे आणि त्यांच्या उच्च नीतीमत्तेचें महत्त्व कळून चुकले. किंवा हे प्रकरण ब्रिटनपर्यंत गेले तर जड जाईल असे देखील वाटले असेल. त्यांची नेमणूक नोकरीच्या पहिल्या दिवसापासून कायम करण्यांत आली. त्यांना तीन वर्षांचे पूर्ण वेतन एकरकमी देण्यांत आले.

प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये धड प्रयोगशाळाही नव्हती. २४ चौरस फुटांच्या अडगळीच्या जागेंत जगदीशचंद्रांना संशोधन करावे लागले. एका अकुशल लोहाराकडून त्यांनी एक उपकरण घडवून घेतले. भगिनी निवेदिता लिहितात ‘एका थोर शास्त्रज्ञाला अशा तर्‍हेने किरकोळ गैरसोयी आणि सततच्या मनस्तापाला तोंड द्यावे लागतें हे समजल्यावर मला फारच मोठा धक्का बसला. .... आपल्या संशोधनासाठी वेळच मिळणार नाही अशा तर्‍हेने कॉलेजचे वेळापत्रक त्यांना पूर्णपणे अडचणीचे आणि गैरसोयीचे बनवले होते.’ रोजच्या चरकातून सुटल्यावर कॉलेजातील आपल्या खोलीतल्या तुटपुंज्या जागेत रात्रीं उशिरापर्यंत जागून त्यांनीं आपले संशोधन चालू ठेवले.

ब्रिटिश सरकारचें धोरण वसाहतीतील मूलभूत संशोधनाला अनुकूल असे नव्हतेच. कष्टाने मिळविलेला आपला स्वतःचा पैसा जगदीशचंद्र प्रयोगासाठींचीं उपकरणें बनवण्यासाठीं खर्च करीत. अशा रीतीने संशोधनाबद्दलच्या त्यांच्या दुर्दम्य ओढीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. भारतात संशोधनासाठीं अनुकूल असें वातावरण नाही म्हणून आज बुद्धिजीवी वर्ग विकसित देशांत स्थायिक होत आहे. या वर्गाने जगदीशचंद्रांपासून धडा घेणे जरूरीचे आहे. ध्येयवादाला कोणत्याहि मर्यादा नसतात हेच खरे. 

१८८७ मध्यें ब्राम्हो समाजांतील सुप्रसिद्ध समाजसुधारक दुर्गा मोहन दास यांची कन्या अबला हिच्याशी त्यांचा विवाह झाला. ज्यांच्या नावावरून चितगांव हे नाव शहराला दिले ते चित्तरंजन दास तिचे चुलतभाऊ. १८८२ मध्यें मद्रास इथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठीं अबलाला बंगाल सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिला ते वैद्यकीय शिक्षण (नवर्‍याच्या पावलावर पाऊल ठेवून) सोडावे लागले. पतीपत्नी दोघांनीही वैद्यकीय शिक्षण सुरुवात केल्यावर लगेच सोडून द्यावे हा या दांपत्याच्या आयुष्यातील हा एक अजब दुहेरी योगायोग म्हणावा लागेल. त्याही दृष्टीने ३७वा गुण जुळला म्हणायचा. लग्नाच्या वेळी जगदीशचंद्र वेतन न घेण्याच्या भूमिकेमुळे तसेच (हयात असलेल्या) वडिलांनी केलेल्या कर्जामुळे आर्थिक संकटात सापडले होते. नवपरिणीत दांपत्याला टंचाई आणि उपासमारीचा सामना करावा लागला. परंतु त्याही परिस्थितींत त्यांनी तग धरला आणि वडिलांचे कर्ज फेडले. कर्ज फेडल्यानंतरची कांहीं वर्षे त्यांचे आईवडील हयात होते.

जेम्स क्लार्क मॅक्सवेल या ब्रिटिश सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञानें विस्तृत तरंगलांबीच्या विद्युत्चुंबकीय लहरींचे अस्तित्त्व गणिताने सिद्ध केलें होते. परंतु त्यानें गणितानें मांडलेली उपपत्ती प्रयोगानें सिद्ध व्हायच्या अगोदरच सन १८७९ मध्ये तो मरण पावला. ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ ऑलिव्हर लॉज याने मॅक्सवेलनें वर्तवलेल्या लहरी १८८७-८८ साली तारेतून दुसर्‍या ठिकाणीं पाठवल्या. १८८८ साली जर्मन वैज्ञानिक हेनरीक हर्ट्झ याने मोकळ्या अवकाशातील विद्युत्चुंबकीय लहरींचे अस्तित्त्व प्रयोगाने दाखवले. त्यानंतर हर्ट्झचे संशोधन पाहून हर्टझच्या मृत्यूनंतर जून १८९४ मध्ये ऑलिव्हर लॉजने त्याच्या स्मरणार्थ एक भाषण दिले आणि ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध केलें. लॉजच्या संशोधनाने देशोदेशींचे अनेक शास्त्रज्ञ प्रभावित झाले होते. त्यांत जगदीशचंद्रांचाहि समावेश होता.

जगदीशचंद्रांनी केलेल्या सूक्ष्मलहरींच्या संशोधनातील एक महत्त्वाचा भाग असा की त्यांनीं मिलीमीटरमध्यें मोजण्याइतपत सुमारें ५ मीमी पर्यंत कमी तरंगलांबीच्या (वेव्हलेंग्थ) सूक्ष्मलहरीं प्रयोगासाठी वापरल्या. सूक्ष्मलहरींच्या प्रकाशसदृश गुणधर्माचा अभ्यास करतांना जास्त तरंगलांबीमुळे होणार्‍या गैरसोयी त्यांनी जाणल्या होत्या.

सन १८९३ मध्यें निकोला टेस्ला यांनी पहिला रेडिओ संपर्क साधून दाखवला. त्यानंतर जवळजवळ वर्षभरानें नोव्हेंबर १८९४ वा १८९५ मध्ये (नक्की माहिती उपलब्ध नाहीं) जगदीशचंद्रांनी कलकत्त्याच्या टाऊन हॉलमध्यें केलेल्या जाहीर प्रयोगात मिलीमीटर तरंगलांबीच्या विद्युत्चुंबकीय लहरी वापरून दूर अंतरावरील बंदुकीची दारू पेटवली तसेच विजेवर चालणारी घंटाही वाजवून दाखवली. वैज्ञानिक प्रयोगात एवढे नाट्य बहुधा प्रथमच आले असणार. या प्रतिभेने मन थक्क होते. त्यानंतर त्यांनी बंगाली भाषेतून ‘अदृश्य आलोक’ म्हणजे ‘न दिसणारा प्रकाश’ या नावाचा एक निबंध लिहिला. हा अदृश्य प्रकाश विटांच्या भिंतीतून आरपार जाऊ शकत असे. त्यामुळें तारेच्या माध्यमाविना संदेश पाठवणें शक्य होईल असें त्यात प्रतिपादन केलें होतें. रशियात पापॉव्हनेही असेच प्रयोग केले. डिसेंबर १८९५ मध्ये पापॉव्हनें केलेल्या नोंदीवरून दिसते की रेडिओ लहरी वापरून संदेशवहन करता येईल असे त्याला वाटत होते.

लॉजच्या प्रबंधानंतर वर्षभरातच म्हणजे मे १८९५ मध्ये जगदीशचंद्र बसूंनी ‘ऑन पोलरायझेशन ऑफ इलेक्ट्रिक रेज बाय डबल रीफ्रॅक्टिंग क्रिस्टल्स’ हा आपला पहिलावहिला विज्ञानविषयक प्रबंध बंगालच्या एशियाटिक सोसायटीला पाठवला. ऑक्टोबर १८९५ मध्ये लॉर्ड रेले (Rayleigh) यांनी बसूंचा ‘ऑन अ न्यू इलेक्ट्रो-पोलॅरिस्कोप’ हा दुसरा प्रबंध लंडनच्या रॉयल सोसायटीला पाठवला. डिसेंबर १८९५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लंडनच्या द इलेक्ट्रीशियन (खंड ३६) या जर्नलमध्यें हा प्रबंध प्रसिद्ध झाला. त्या सुमारास हर्ट्झने बनवलेल्या तरंगग्राहकाला वा तरंगसंवेदकाला - रेडीओ डिटेक्टरला तमाम इंग्रज भाषिक विश्वात ‘कोहरर’ (coherer) हा लॉजने योजलेला शब्द वापरला जात असे. बसूंच्या ‘कोहरर’वर द इलेक्ट्रीशियनने छान टिप्पणी केली. या टिप्पणीचा वृत्तांत देतांना ‘इंग्लिशमन’ने म्हटले आहे

"प्राध्यापक बोस यांना जर कोहरर पूर्णत्वाला नेऊन त्याचें पेटंट घेणे शक्य झाले तर प्रेसिडेन्सी कॉलेजातील प्रयोगशाळेत एकहाती संशोधन करणार्‍या एका बंगाली वैज्ञानिकाच्या हस्ते अखिल नौकानयन जगतातील समुद्रकिनारे उजळून निघतील."

प्रत्यक्षात बसूंनीं कोहरर पूर्णत्वाला नेण्याचा बेत केला होता पण पेटंट घेण्याचे त्यांच्या कल्पनेतही आलेले नव्हते.

त्यानंतर सुमारे दोन वर्षांनी मे १८९७ मध्यें सॉल्सबरी (Salisbury) मैदानावर मार्कोनीने त्याचा बिनतारी संदेशाचा प्रयोग केला. १८९६ मध्ये बसू लंडनला व्याख्यानाच्या दौर्‍यावर गेले असतांना मार्कोनीला भेटले. तेव्हा मार्कोनी ब्रिटिश टपाल खात्यासाठीं बिनतारी संदेशवहनाचे प्रयोग करीत होता. एका मुलाखतीत बसूंनीं म्हटले होते कीं व्यापारी तत्त्वावरील बिनतारी संदेशवहनात आपल्याला बिलकूल स्वारस्य नाहीं आणि कोणाला हवे असेल तर माझॆ संशोधन कोणीही वापरू शकतो. १८९९ मध्यें बसूंनीं आपण टेलिफोन ग्राहक बसवलेला ‘लोखंड-पारा-लोखंड कोहरर’ विकसित केला असल्याचे लंडनच्या रॉयल सोसायटीला पाठवलेल्या एका प्रबंधांत म्हटले होते.

असें दिसते कीं मार्कोनीअगोदर बसूंनीच दूरस्थ बिनतारी संदेशवहनाचें प्रदर्शन केले होते. रेडिओ लहरी पकडण्यासाठीं (डिटेक्टर बनवण्यासाठीं) बसूंनींच सर्वांत अगोदर उभयवाहकाचा म्हणजेच सेमीकंडक्टरचा वापर केला होता. शिवाय त्यांनी आता सर्वसामान्य वापरात असलेल्या विविध प्रकारच्या सूक्ष्मलहरी देखील शोधून काढल्या होत्या. १९५४ मध्यें पीअर्सन आणि ब्रॅटेन यांनी रेडिओ लहरी संवेदक ग्राहक म्हणून सेमीकंडक्टरचा वापर सर्वप्रथम करण्याचा अग्रमान बसूंनाच दिलेला आहे. सध्या तांत्रिक दृष्ट्या सेमीकन्डक्टर पदार्थ हे अब्जांशतंत्रीय - नॅनोटेक्नॉलॉजिकल समजले जातात. पुढील पन्नास वर्षांत मिलीमीटर सूक्ष्मलहरींवर काहीही संशोधन झाले नाही. १८९७ मध्यें त्यांनीं आपण कलकत्त्यांत मिलीमीटर सूक्ष्मलहरींवर केलेल्या संशोधनाबद्दल लंडनच्या रॉयल सोसायटीला माहिती दिली. त्यांनी वेव्हगाईड्स, हॉर्न ऍंटेना, डायइलेक्ट्रीक लेन्सेस, विविध पोलरायझर्स एवढेच नव्हे तर सेमिकंडक्टर्सहि वापरले, तेहि ६० जीगॅहर्ट्झएवढ्या उच्च कंप्रतेला. त्यांच्या उपकरणांपैकीं बहुतेक अजूनहि कलकत्त्यांतील बोस इन्स्टिट्यूटमध्यें शाबूत आहेत. एक १.३ मिलीमीटर मल्टीबीम रिसीव्हर आजहि अमेरिकेंतील ऍरिझोना येथील एनआरएओ १२ मीटर टेलिस्कोपमध्यें कार्यरत आहे. त्यांच्या १८९७ मधील संकल्पना अजूनही अमेरिका वापरते. १९७७ सालीं सेमीकंडक्टर विषयातील नैपुण्याबद्दल मिळवलेल्या सर नेव्हिल मॉट यांनी म्हटले आहे कीं जे. सी. बोस हे काळाच्या कमीत कमी साठ वर्षे पुढें होते आणि त्यांना पी-टाईप तसेंच एन-टाईप सेमीकंडक्टरच्या अस्तित्त्वाचा अंदाज आलेला होता.

यानंतर जगदीशचंद्रांनी वनस्पतीच्या शरीररचनाशास्त्राचा पाया घातला. १९२७ सालीं वनस्पतीत ‘जीवरस ऊर्ध्ववहनाचा सिद्धांत त्यांनीं मांडला. या सिद्धांताप्रमाणे जीवपेशींच्या विद्युत्चुंबकीय स्पंदनामुळे वनस्पतींत जीवरस खालून वरच्या दिशेने वाहतो. आता ते डिक्सन आणि जॉली यांनीं १८९४ सालीं प्रथमच मांडलेल्या ताण-समाकर्षण (टेन्शन-कोहीशन) या लोकप्रिय सिद्धांताकडे संशयाने पाहू लागले होते. १८९५ सालीं कॅनी यानें मांडलेला सीपी सिद्धांत या संशयाला पुष्टि देणारा होता. अंतस्वचेच्या सांध्यापाशीं जीवपेशी पेशीरस कसा वाहून नेतात ते त्याने दाखवले.

वनस्पतींनीं विविध स्फुरकांना - स्टिम्यूलसना - दिलेले प्रतिसाद मोजणारे क्रेस्कोग्राफ (Crescograph) नांवाचे नवीनच यंत्र बनवले आणि वनस्पतींना प्राण्यांप्रमाणेच मज्जासंस्था (नर्व्हस सिस्टीम) असते हे त्यांनी दाखवले. अशा रीतेनें त्यांनी प्राणीपेशी आणि वनस्पतीपेशी यांतील साम्य शोधून काढले. संगीतमय, आनंददायक वातावरणात वनस्पती वेगाने वाढतात आणि कर्कश आवाजाच्या कोलाहलात त्यांची वाढ खुंटते हे त्यांनीं दाखवून दिले. नंतर हे त्यांनीं प्रयोगानें सिद्ध केले.

जीवभौतिकीमधील त्यांनीं घातलेली मोलाची भर म्हणजे विविध स्फुरकांना (रसायनें आणि जखमा) वनस्पतींनीं दिलेला प्रतिसादाच्या वहनाचे विद्युतीय स्वरूप. हे स्वरूप रासायनिक असावे असा त्यापूर्वी समज होता. त्यांचा हा दावा नंतर विल्डेन आणि सहकारी यांनी नंतर खरा असल्याचें सिद्ध केले. (नेचर, १९९२, ३६०, ६२-६५) वनस्पतीपेशींवरील सूक्ष्मलहरींचा परिणाम आणि तदनुषंगानें पेशीभित्तीतील विभवांतर कसे बदलते, ऋतूप्रमाणे वनस्पतींत काय बदल होतात हे बदल कसे घडून येतात, या बदलांचे स्वरूप काय असते, वाढ रोखणारीं रसायने, तपमान इत्यादींचे वनस्पतींवर काय आणि कसे परिणाम होतात याचा त्यांनीं अभ्यास केला. विविध परिस्थितीत पेशीभित्तीतील विभवांतरात झालेल्या बदलाच्या अभ्यासावरून त्यांनी विविध वनस्पतींना वेदना होतात आणि माया समजते असा दावा केला.

१८९६ मध्ये त्यांनीं निद्देशेर काहिनी ही तेव्हा अतिशय वाखाणली गेलेली विज्ञानकथा लिहिली. कुंतल किशोरी नांवाच्या केशतैलाच्या छोट्या बाटलीचा वापर करून वादळ शमवून करून हवामानावर ताबा मिळवण्याचा ‘प्रयोग’ त्यात दाखवला होता. हीच कथा त्यांनी नंतर ‘पातालोक तुफान’ या नांवाने त्यांनी दुसरीकडे प्रसिद्ध केली.

कोणत्याही शोधाचे हक्क घेण्याला त्यांचा असलेला विरोध जगजाहीर होता. आपल्या ‘कोहरर’ची रचना त्यांनी लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूशनमधल्या शुक्रवार सायंकाळच्या एका व्याख्यानात त्यांनी आपण बनविलेल्या कोहररची रचना उलगडून सांगितली. ‘द इलेक्ट्रिक इंजिनीअर’ने कोहररच्या रचनेत कोणतीहि गुप्तता न पाळल्यामुळे त्याचा व्यावहारिक वापर करून पैसे मिळविण्यास रान मोकळे असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलें. एका बिनतारी उपकरणे बनविणार्‍या उत्पादकाबरोबर भरघोस मोबदला देणार्‍या करारपत्रावर सही करायला त्यांनी नकार दिला. असे असलें तरी सारा चॅपमन बुल या अमेरिकन मैत्रिणीच्या आग्रहानें म्हणा वा दबावामुळे म्हणा त्यांनी ‘डिटेक्टर फॉर इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्सेस’ या एका उपकरणाच्या पेटंटच्या अर्जावर त्यांनीं सही केली. ३० सप्टेंबर १९०१ रोजी हा अर्ज सादर केला आणि २९ मार्च १९०४ रोजी त्यांना अमेरिकन पेटंट क्र. ७५५८४० दिले गेले. ऑगस्ट २००६ मध्ये ‘आपण भविष्यकाळाचें काय देणे लागतो: डिजीटल युगातील संकल्पना आणि तत्संबंधींची भूमिका’ या विषयावर दिल्लीत भरलेल्या एका परिषदेत आय आय टी दिल्लीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्स चे चेअरमन डॉ. व्ही एस राममूर्ती हे सर जगदीशचंद्र बसू यांच्या पेटंटविषयींच्या या दृष्टिकोनावर भर देतांना म्हणाले,

"पेटंट घेण्याच्या कोणत्याहि पद्धतीबद्दलची त्यांची नाराजी सुप्रसिद्ध आहे. रविंद्रनाथ टागोरांना १७ मे १९०१ रोजी लंडनहून लिहिलेल्या पत्रात त्यांनी तसे म्हटलेले आहे. पेटंट आणि पेटंटपासून मिळणार्‍यां फायद्यांबद्दल ते अनभिज्ञ होतें असें नाहीं. अमेरिकेंतील पेटंट (क्र. ७५५८४०) मिळवणारे ते पहिलेच भारतीय. पेटंटबद्दल जगजाहीर नाराजी असलेले जगात ते एकटेच नव्हते. रॉंटजे, पियरे क्यूरी, आणि इतर अनेकांनीं नैतिकतेच्या मुद्द्यावरून विनापेटंट असलेली वाट चोखाळली होती."

एक व्यक्ती म्हणून जगदीशचंद्र किती श्रेष्ठ होते ते आपण पाहिले आहेच. त्यामुळे त्यांच्या या विचाराचे फारसे आश्चर्य वाटायला नकोच. ३० नोव्हेंबर १९१७ रोजीं बोस इन्स्टिट्यूटच्या स्थापनेच्या दिवशी केलेल्या उद् घाटनाच्या भाषणात जगदीशचंद्रांन पेटंटविषयींचा आपला हा दृष्टिकोन नोंदवला आहे. पूर्णपणे वादातीत असें भारतीय मूळ असलेल्या बासमती तांदळाचे (टेक्ससवरून दिलेल्या टेक्समती या नावाचे) तसेच हळदीचे पेटंट फुकटांत लाटू पाहाणार्‍या अमेरिकन कंपनीपुढे ही नैतिक झळाळी प्रकर्षाने उठून दिसते. एका लबाड संस्थेमुळे अख्खे राष्ट्रच असे बदनाम होऊ शकते.

बसू यांच्या इतिहासांतील स्थानाचे मूल्य नव्यानें ठरवण्यांत आलेले आहे आणि बिनतारी संवेदक उपकरणाचे तसेच मिलीमीटर विद्युत्चुंबकीय लहरींच्या शोधाचे श्रेय आतां त्यांच्या नांवावर मांडले गेले आहे आणि जीवभौतिकविज्ञांतील आदर्श म्हणून त्यांची आता गणना होते. त्यांची कित्येक उपकरणे १०० वर्षे उलटून गेलीं तरी अजूनहि प्रदर्शनात दाखविली जातात. यात विविध ऍंटेना, पोलरायझर्स आणि वेव्हगाईड्स येतात जी आजहि आधुनिक स्वरूपात वापरली जातात. २३ नोव्हेंबर १९३७ रोजी त्यांचा भारतात मृत्यू झाला. १९५८ साली त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मशताब्दीपासून पश्चिम बंगालमध्यें विशेष शिष्यवृत्ती सुरू केलेली आहे. आधुनिक विज्ञानातील त्यांचे योगदान हीच त्यांची ओळख आहे.

विज्ञानाल नैतिकतेचे अधिष्ठान हवेच, ते त्यांनी दिले. त्यांची पत्नी देखील देशसेवेत मागे राहिली नाही. समाजकार्य हीच देशसेवा मानून तिने काम केले. स्त्रीशिक्षणाला चालना देण्यासाठी तिने सन १८९५ मध्ये नारी शिक्षा समिती या संधटनेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. विधवा स्त्रियांना शिक्षणासाठी अर्थसाहाय्य करणे हा या संघटनेचा प्रमुख उद्देश होता. अविकसित गावात ठिकाणी मुलींसाठी विद्यालये स्थापन करणे, चांगली पाठ्यपुस्तके बनवणे, सूतिकागृहे उघडणे आणि बालकल्याण केंद्रे सुरू करणे ही कामे या संस्थेने केली. ग्रामीण विभागात सुमारे २०० शाळा या संस्थेने उघडल्या. यावरून संस्थेच्या कार्याचा आवाका ध्यानात येतो. ‘विद्यासागर बाणी भवन’, ‘महिला शिल्प भवन’, आणि तरुण विधवांसाठी शिक्षिकांना प्रशिक्षण देणारे ‘बाणी भवन ट्रेनिंग स्कूल’ या काही ठळक संस्था. १९१० ते १९३६ या काळात त्या ‘ब्राह्मो बालिका शिक्षालय’ च्या चिटणीसपदी होत्या. जगदीशचंद्रांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने भगिनी निवेदिता स्त्रीशिक्षण निधीला १ लक्ष रुपयांची देणगी दिली. प्रौढांसाठी प्राथमिक शिक्षणाचे कार्य ही संस्था करीत होती. एक आदर्श भारतीय वैज्ञानिक म्हणून जगदीशचंद्रांचे आणि एक थोर भारतीय दांपत्य म्हणून या दोघांना वंदन करून लेख संपन्न करतो.
- X - X - X -

No comments: