Sunday, April 20, 2014

असे वैज्ञानिक असे विज्ञान - २ वॉलेस आणि डार्विन


वॉलेस आणि डार्विन

आल्फ्रेड रसेल वॉलेस हे नाव आपल्याकडे तसे फारसे प्रसिद्ध नाही. पण काही काही अतर्क्य अशा घटना प्रत्यक्षांत घडल्या आहेत. अशा घटना घडल्या की मग त्या योगायोगाने घडल्या असे आपण म्हणतो. एकच सिद्धांत दोन शास्त्रज्ञांनी एकाच वेळी शोधून काढला आहे तर कधी एका शास्त्रज्ञाचे श्रेय त्या दोघांपैकी एकालाच मिळालेले आहे. रॉबर्ट हूकसारखी श्रेय ‘हुक’लेल्या कमनशिबी शास्त्रज्ञांची कांहीं उदाहरणे देतां येतील. काही शास्त्रज्ञ मात्र याबाबतीत सुदैवी मानतां येतील कारण त्यांचे श्रेय हिरावून घेतले गेलेले नाही. निसर्गशास्त्रात असे आणखी काही वेळा घडले आहे. एक वेधक उदाहरण आणि या लेखाचा विषय आहे आल्फ्रेड रसेल वॉलेस आणि चार्ल्स डार्विन.


 चार्ल्स डार्विन १८५४

 आल्फ्रेड रसेल वॉलेस १८९५

डार्विनची कथा बहुतेकांना ठाऊक आहे. तरी ताज्या संदर्भासाठी अतिशय थोडक्यात देत आहे. चार्ल्स रॉबर्ट डार्विन. जन्म १२ फेब्रुवारी १८०९. वडील सुखवस्तु वैद्यकीय व्यावसायिक. मराठीत सांगायचे झाले तर डॉक्टर. एडींबराला वैद्यकी शिकायला चार्ल्स डार्विनला मोठा भाऊ इरॅस्मस डार्विन याच्याबरोबर पाठवले. (याच्या आजोबांचे नाव देखील इरॅस्मस डार्विन होते) परंतु भूलशास्त्राचा शोध वा अवलंब नसलेल्या त्या काळच्या एका छोट्या मुलावरच्या शस्त्रकियेच्या पहिल्याच पाठाला चार्ल्स पळून गेला आणि त्याने वैद्यकीय शिक्षणाला कायमचा रामराम ठोकला. नंतर वडलांनी त्याला धर्मशास्त्राचे शिक्षण द्यायचे ठरवले. त्यासाठी इंग्रजी भाषेचा स्नातक असणे आवश्यक असे. १८२८ ते १८३१ या काळात चार्ल्स डार्विनचे इंग्रजीचे शिक्षण चालू होते. इथें चार्ल्सने इंग्रजीत उत्तीर्ण होण्याइतके गुण मिळतील एवढाच अभ्यास केला आणि उर्वरित वेळ आपल्या निसर्गशास्त्राचे नमुने गोळा करायच्या छंदात घालवला. या आवडत्या विषयावरचे त्याचे वाचनहि अर्थातच चालू होतेच.

२७ डिसेंबर १८३१ रोजी चार्ल्स डार्विन इंग्लंडमधल्या डेव्हनपोर्ट बंदरातून एच एम एस बीगल या जहाजावरून प्रवासाला निघाला. या उचापतीला त्याच्या वडिलांचा विरोध होता. वैद्यकी सोडून धर्मशास्त्र शिकणार असलेल्या चार्लसने निदान धर्मशास्त्राचे शिक्षण तरी धडपणे पूर्ण करावे आणि आपल्या सुखवस्तु कुटुंबांतले ‘सुशेगात’ आयुष्य निवांतपणे कंठावे असे वडिलांना वाटत होते. पण आजोबांनी - आईच्या वडिलांनी - त्यांचे मन वळवले. रॉबर्ट फिट्झरॉय हा बीगल या बोटीचा कप्तान होता. पाश्चात्य लोक अंधश्रद्धाळू नाहीत असा आपल्याकडे एक गैरसमज आहे. या फिट्झरॉयचा चेहर्‍यावरून भविष्य वगैरे जाणण्याच्या थोतांडावर विश्वास होता. डार्विनचे वाकडे नाक अपशकुनी आहे असा त्याचा ग्रह होता. वाकड्या नाकाच्या डार्विनचें थोबाड पाहायला मला आवडत नाही तेव्हा तो मला माझ्या बोटीवर नको असे म्हणून बीगलच्या या कप्तानाने त्याला बोटीवर घ्यायला नकार दिला होता. पण केंब्रिज विद्यापीठातले एक प्राध्यापक श्री हेन्सलो यांच्या शिफारसीमुळे (यांच्या नादानेच चार्ल्स डार्विन प्राण्यांचे, वनस्पतींचे, नमुने गोळा करीत असे.) कप्तानाने त्याला फुकट प्रवासाच्या बोलीवर बोटीवर घेतले. जेवणाचा व इतर सर्व खर्च डार्विनने स्वतःचा स्वतःच करायचा होता. बोटीवरच्या प्रवासात बोट लागून (बोट लागणे या आजारात समुद्रात बोट प्रवास करीत असतांना लाटांवर वरखाली हालते. त्या हालण्यामुळे मळमळ किंवा/आणि उलट्यांच्या त्रास होतो.) आजारी पडल्यावर डार्विनने लायेलचे (भूगर्भशास्त्राचा प्रणेता Sir Charles Lyell) भूगर्भशास्त्रावरचें पुस्तक त्याने वाचले. हा लायेल भूगर्भशास्त्रातला एक थोर तज्ञ म्हणून ओळखला जात होता आणि जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन या संस्थेचा अध्यक्ष तसेच इतर विविध पदे त्यानें भूषवली होती. या पुस्तकाने डार्विनच्या प्रतिभेला चालना मिळाली आणि डार्विनने पुढे भूकवचाची हालचाल आणि सजीवांची उत्क्रांती यांची सांगड घातली.

नंतर काय झाले? थोडा धीर धरून वॉलेसची माहिती घेऊयात.

आल्फ्रेड रसेल वॉलेसचा जन्म ८ जानेवारी १८१३. म्हणजे वॉलेस हा डार्विन पेक्षा चारेक वर्षांनी लहान. १९ व्या शतकांतला उत्क्रांतीवादी विचारवंत. उत्क्रांतीचा सिद्धांत आणि नैसर्गिक निवडीचें तत्व त्याने स्वतंत्रपणे शोधून काढले होते. इंडोनेशियावरून त्याने अशी एक काल्पनिक रेषा ओढली की त्या रेषेच्या पूर्वेला ऑस्ट्रेलियातील प्राण्यांशी साधर्म्य दाखवणारे प्राणी सापडतात आणि पश्चिमेला आशियातील प्राण्यांशी साधर्म्य दाखवणारे प्राणी आढळतात. या काल्पनिक रेषेला ‘वॉलेस लाईन’ म्हणतात. या वॉलेस रेषेबद्दल तो ख्यातनाम आहे. याच्यामुळेच डार्विनला आपला उत्क्रांतिविषयक शोधनिबंध का आणि कसा प्रसिद्ध करावा लागला हे आपण पुढे पाहाणार आहोत.

शालेय शिक्षणानंतर वॉलेसने सर्वेक्षणाचे - भूभागाचा सर्व्हे करायचे - प्रशिक्षण घेतले. त्या काळी रेलवे, रस्ते इ. बांधणीची कामे जोरात चालू असल्यामुळे सर्वेक्षणाच्या या कामाला तेजी होती. पण वॉलेसमहाशयांना मात्र निसर्गशास्त्रात गोडी होती. प्राण्यांचे विविध नमुने गोळा करण्याचा जगावेगळा छंद होता. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी आणि इतर केव्हाही वेळ मिळेल तेव्हा हे महाशय छंद म्हणून नमुने गोळा करीत. इंग्लंडमधल्या लिस्टरशायरमध्यें तेव्हा हजारो जातींचे किडे होते. यापेक्षा जास्त किडे डोक्यात वळवळत असलेला त्याच्यासारखाच एक अवलिया मित्र त्याला भेटला. हा होता हेनरी बेट्स. रविवारचा सुटीचा दिवस ते दोघे या जगावेगळ्या छंदात घालवीत. बर्‍याच शैक्षणिक संस्था असे नमुने विकत घेत. मग काय विचारता, असे नमुने गोळा करून विकता येतील म्हणून दोघानी नोकर्‍या सोडून नमुनेच गोळा करून विकणारी संस्था स्थापन केली आणि जवळ फक्त शंभर पौंड घेऊन दक्षिण अमेरिकेच्या मोहीमेवर निघाले. डार्विन सुखवस्तु होता हे आपण पाहिलेच आहे. परंतु वॉलेस मात्र उपजीविकेसाठी पैसे कमावणे आणि छंदहि जोपासणे अशा दुहेरी हेतूने मोहिमेवर निघाला. जीव वैविध्य जेथे असाधारण वैपुल्याने आहे त्या जगाच्या दिशेने. जिथे एकहि निसर्गशास्त्रज्ञ नमुने जमवायला अजून पोहोचला नाही अशा ठिकाणी जाण्यासाठी. ज्यांनी कधीहि गोरा माणूस पाहिला नाही अशा रेड इंडियनांच्या वस्तीत घाबरत घाबरत गेल्यावर चाळीसेक दिवस त्यांच्यात राहून त्यांच्या मदतीने अनेक नमुने जमवले. निरंजन घाटे त्यांच्या ‘उत्क्रांतीची नवलकथा’ या पुस्तकात डार्विन आणि वॉलेस या दोघांच्या स्वभावाची मार्मिक तुलना करतात. डार्विनने सदैव रेड इंडियनांना कमी लेखले व सदैव त्यांचा तिरस्कार केला. याउलट नवीन भाषा, चालीरीती आणि नवे शोध याबद्दल रेड इंडियनांना महत्त्व वाटते असे वॉलेसचें मत होते. रेड इंडियन संस्कृती आणि पश्चिम युरोपीय विकसित संस्कृति यात साम्य आढळलेला वॉलेस हा पहिला मानववंशशास्त्रज्ञ. वॉलेसला रेड इंडियन बनून त्यांच्यातच राहावेसे वाटत होते. वॉलेसची रेड इंडियनांबरोबरच्या एक दिवसाच्या अनुभवावरची कविताहि ते मराठीत उद्धृत करतात तर चिलीच्या दक्षिण टोकावरच्या तिएरा देल फ्युएगोला राहणार्‍या रेड इंडियनांना बघून डार्विनला घृणा वाटली होती अशा अर्थाचे ते लिहितात.

असो. चार वर्षें ऍमेझॉनच्या खोर्‍यात काढून वॉलेस जेव्हा इंग्लंडकडे परतीच्या प्रवासाला निघाला तेव्हा त्याला रोज थंडी वाजून ताप येत होता. जहाजावर चढवतांना बर्‍याच नमुन्यांना जलसमाधी मिळाली. १२ जुलै १८५२ रोजी वॉलेस ‘हेलन’ या बोटीवर चढला. त्या जहाजावर बाल्सम नांवाच्या वनस्पतीपासून बनलेले ज्वालाग्राही पदार्थ होते. (माझ्या माहितीप्रमाणे गुग्गुळ वर्गांतील या झाडाचा डिंक व राळ - दोन्ही ज्वालाग्राही असतात) ६ ऑगस्ट १८५२ रोजी त्या जहाजाला प्रचंड आग लागली आणि खलाशांना व प्रवाशांना ते जळते जहाज सोडून द्यावे लागले. वॉलेसचे सगळे जैव नमुने, त्याने काढलेली विविध जैव नमुन्यांची असंख्य रेखाचित्रे वगैरे सर्व त्या आगींत त्याच्या डोळ्यांसमोर भस्मसात झाले.

पुढे काय?

१८३५ मध्यें डार्विन इंग्लंडला परत आला. १८३८ मध्यें माल्थसचा ‘एसे ऑन पॉप्युलेशन’ वाचल्यावर चार वर्षें विचारमंथन करून १९४२ साली त्याने त्याचा उत्क्रांतिविषयक प्रबंध लिहून तयार केला.) लायेल, हूकर आणि कांही अन्य निवडक मित्रांना त्याने त्या ग्रंथाचे हस्तलिखित वाचायला दिले. मध्यंतरी २४ जानेवारी १८३९ रोजी लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्यत्त्व त्याला मिळाले होते. लगेचच २९ जानेवारीला एम्मा वेजवूड या त्याच्यापेक्षा नऊ महिन्याने मोठी असलेल्या धनवान मामेबहिणीशी त्याचा विवाह झाला. सुखवस्तु वडील आणि मातब्बर सासरेबुवा असल्यामुळें डार्विनला तसा चरितार्थाचा प्रश्न नव्हता. १९४४ साली हस्तलिखित त्याच्याकडे परत आले. पण बायबलमध्ये तर म्हटले होते की ‘ख्रिस्तपूर्व ४००४ मध्ये परमेश्वराने या सृष्टीची निर्मिति केली’. बायबलमधल्या ‘जेनिसिस’च्या या धार्मिक सिद्धांताला डार्विनचा सिद्धांत छेद देणारा होता. ख्रिस्ती धर्मगुरूंचा रोष टाळायला हा प्रबंध प्रसिद्ध करायची डार्विन  इ. स. १८५८ सालापर्यंत टाळाटाळ करीत होता. नव्हे आपल्या हयातीनंतरच तो प्रसिद्ध व्हावा अशा खटाटोपात तो होता असे मानावयास जागा आहे. हे हस्तलिखित आणि कांही पैसे असे बाड बांधून वर आपल्या पत्नीला एक सूचना लिहिली की माझे काही बरेवाईट झाले तर चार्ल्स लायेल आणि डॉ. जोसेफ डाल्टन हूकर (अणुसिद्धांतवाला जॉन डाल्टन वेगळा, तो हा नव्हे) यांच्याकडून संपादित करून घेऊन ४०० पौंड खर्चून हे पुस्तक प्रसिद्ध करावे, आणि बाड बॅंकेत ठेवले. पण जवळजवळ त्याच सुमारास एक घटना घडली.


वॉलेस नंतर १८५४ मध्ये पूर्वेकडील देशांत गेला. तिथे मात्र त्याने वॉलेस लाईन रेषा शोधून काढली. १८५५ मध्ये वॉलेसने ‘ऑन द लॉ विच हॅव रेग्युलेटेड द इंट्रॉडक्शन ऑफ न्यू स्पीशीज’ हा शोधनिबंध लिहिला आणि या विषयात डार्विनला चागली गति आहे हे ठाऊक असल्याने त्याला अभिप्रायार्थ पाठवून दिला. डार्विन आपले संशोधन चर्चला आणि सार्वजनिक टीकेला घाबरून ठामपणे मांडायला धजत नव्हता. आपल्या प्रबंधाचा गोषवारा एखाद्या त्या विषयात पारंगत तज्ञ असलेल्या विद्वत्ताप्रचुर शास्त्रज्ञाला काढायला सांगितला तर जसा असेल त्यापेक्षा सरसच आणि आत्मविश्वासपूर्ण अशा नेमक्या भाषेतला असा वॉलेसचा तो शोधनिबंध वाचून आता डार्विनची काय अवस्था झाली असेल ते सांगायला नकोच. सामाजिक टीकेला अजिबात न घाबरणार्‍या वॉलेसने जर हा शोधनिबंध त्या वेळी त्वरित प्रसिद्ध केला असता तर उत्क्रांतीचा सिद्धांत एकट्या वॉलेसच्या नावावर गेला असता आणि डार्विन कदाचित कोणाला ठाऊकहि झाला नसता. पण दैवगति वेगळी होती. पुढे काय झाले?

वॉलेसचा प्रबंध हाती पडल्यावर देखील डार्विन आपला एकट्याचा शोधनिबंध त्वरेने प्रसिद्ध करू शकला असता. कारणे कांहीही असोत, पण त्याने तसे केले नाही. डार्विनने वॉलेसचा प्रबंध चार्ल्स लायेल आणि डॉ हूकर यांना दाखवला. त्या दोघांनी एक तोडगा काढला. डार्विनचा १८४४ चा शोधनिबंध आणि वॉलेसचा १८५५ चा शोधनिबंध दोन्ही १ जुलै १८५८ रोजी लिनिअस सोसायटी कडे एकाच वेळी एकत्रित रीत्या सादर केले. त्यातल्या त्यात वॉलेसचे नशीब एवढे की उत्क्रांतीच्या शोधाच्या इतिहासात वॉलेसचे नाव डार्विनच्या बरोबरीने कोरले गेले. पण प्रसिद्धीचा झोत मात्र सदैव डार्विनवरच राहिला. सुरुवातीला धार्मिक नेत्यांनी प्रतिक्रिया नोंदवली नाही. पण ही वादळापूर्वीची शांतता होती. २४ नोव्हेंबर १८५९ रोजी डार्विनचा ‘ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज’ हा १२५० पानी ग्रंथ प्रकाशित झाला.  आता चर्चनें आणि कर्मठ प्रसारमाध्यमांनी डार्विनला लक्ष्य केले. ‘डिसेंट ऑफ मॅन’ हें डार्विनचे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर तर डार्विनचे डोके आणि माकडाचे धड असलेले व्यंगचित्र १८७१ साली एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते.


म्हणजे डार्विनला जे धर्ममार्तंडांचे भय होते ते वाजवी होते. वॉलेस जर जन्मालाच आला नसता वा त्यानें उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला नसता तर कदाचित डार्विनचा सिद्धांत डार्विनच्या हयातीनंतर प्रसिद्ध झाला असता.

पण डार्विनचे समाजातले उच्च स्थान आणि उच्चभ्रू वर्गातल्या चार्ल्स लायेल, ग्रे, डॉ. जोसेफ हूकर, थॉमस हक्सले इ. घनिष्ट मित्रांचा ठोस पाठिंबा यामुळे त्याला निभावून नेतां आले. १९ एप्रिल १८८२ रोजी इंग्लंडमधल्या केंट परगण्यातील डाउने येथे डार्विनचा वयाच्या ७३व्या वर्षी मृत्यू झाला. खरे तर डाउनेच्या सेंट मेरी चर्चमागे त्याचे दफन होणार होते. पण त्याचा एक सहकारी विल्यम स्पॉटिंगवूड हा तेव्हा रॉयल सोसायटीचा अध्यक्ष होता. त्याच्या प्रयत्नाने डार्विनचे दफन वेन्स्टमिन्स्टर ऍबेच्या शाही स्मशानभूमीत सर आयझॅक न्यूटन आणि जॉन हर्षल यांच्या सान्निध्यात झाले.

वॉलेसचे नशीब एवढे थोर की उत्क्रांतीच्या संशोधनाला डार्विनच्या उच्चभ्रू पाठिराखे लाभले होते. वॉलेस एकटा असता तर कदाचित चर्चने त्याची वासलात लावली असती. वॉलेसचे पुढे काय झाले? १८८० मध्ये देवीच्या लसीला देखील एक समाजसुधारक(?) या नात्याने आक्षेप घेऊन वॉलेसने देवीलसविरोधी चळवळीत भाग घेतला. देवीचा रोगाचा केवळ सार्वजनिक आणि शारिरिक अस्वच्छतेमुळे प्रसार होतो आणि या लसीच्या प्रसारामागे वैद्यकीय व्यावसायिकांचे आर्थिक हितसंबंध असावेत असा त्याचा संशय होता. आजच्या वैद्यकीय विश्वाचे चित्र पाहातां त्या संशयात काही वावगे दिसत नाही. देवीसंबंधात वॉलेसने आपल्या मुद्द्याच्या समर्थनार्थ दिलेली आकडेवारी ही संशयास्पद होती असे ‘लॅन्सेट’ या संस्थेचे मत होते. (होमिओपॅथीसबंधी लॅन्सेटने अलीकडे तोडलेले तारे पाहाता लॅन्सेट ही कशा प्रकारची संस्था आहे हेही आपल्याला कळून येते) त्याचा भाऊ जॉन हा अमेरिकेत स्थायिक झाला होता. १८८६ मध्ये वॉलेसने अमेरिकेचा दहा महिन्यांचा दौरा करून जैवभूगोलशास्त्र, स्पिरीच्युऍलिझम (अचूक मराठी शब्द मला ठाऊक नाही) आणि अर्थशास्त्रीय सामाजिक सुधारणा या एकमेकांशी सर्वस्वी भिन्न असलेल्या तीन विषयांवर व्याख्याने दिली. त्याचे व्यक्तिमत्त्व असे बहुरंगी, बहुढंगी, बहुपेडी होते. या वास्तव्यात तो एक आठवडा कोलोरॅडो इथे राहिला आणि रॉकी पर्वतातील वनस्पतींचे नमुने जमा केले. आशियातील, डोंगराळ भागातील वनस्पती आणि युरोप तसेच अमेरिकेतील डोंगराळ भागातील वनस्पती यांत जे साम्य आहे त्यावर हिमयुगाच्या दृष्टिकोनातून काय प्रकाश पडतो याचा अभ्यास करायला हे नमुने उपयुक्त ठरले. १८८९ मध्ये वॉलेसने ‘डार्विनिझम’ नांवाचा डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या तत्वाची पाठराखण करणारा ग्रंथ लिहिला. त्यात मांडलेले संकरित- हायब्रीड जातीबद्दलचें तत्त्व ‘वॉलेस इफेक्ट’ या नावानें ओळखले जाते.

या काळात मात्र वॉलेस स्पिरिच्युऍलिझमच्या  नादी लागला होता. त्याच्या मते किमान तीन वेळा अज्ञात शक्तीने इतिहासात हस्तक्षेप केला. प्रथम निर्जीव रसायनांपासून सजीव पेशी बनली तेव्हा, दुसर्‍यांदा उच्च प्रजातीत जाणिवा निर्माण झाल्या तेव्हा आणि तिसर्‍यांदा मानवात उच्च कोटीची बुद्धिमत्ता निर्माण झाली तेव्हा.

असे असले तरी विविध संस्थांची पदे त्यानें भूषवली आणि विपुल लेखन केले. १८९३ मध्ये वॉलेसची रॉयल सोसायटीवर निवड झाली. १९०७ मध्ये त्याने मंगळावरील कालव्यांवर लेखन केले. वृद्धापकाळात वॉलेस एक थोर शास्त्रज्ञ आणि समाजसुधारक म्हणून ख्यातनाम होता. ७ नोव्हेंबर १९१३ रोजी इंग्लंडमधल्या ब्रॉडस्टोन, डॉर्सेट इथें वयाच्या नव्वदाव्या वर्षी वॉलेसचा मृत्यू झाला. त्याचे दफन वेस्टमिन्स्टर ऍबे इथे डार्विनच्या शेजारी व्हावें अशी त्याच्या घनिष्ट मित्रांची इच्छा होती. पण त्याच्या पत्नीने म्हटले की ब्रॉडस्टोनच्या छोट्या चर्चमागेच चिरनिद्रा घ्यायची त्याची इच्छा होती. म्हणून त्याचे दफन ब्रॉडस्टोनलाच झाले. मग काही तत्कालीन आघाडीच्या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी वेस्टमिन्स्टर ऍबे इथे डार्विनच्या समाधीशेजारी  त्याच्या नांवाचा स्मृतिफलक उभारावा म्हणून समिती स्थापन केली. १ नोव्हेंबर १९१५ रोजी या स्मृतिफलकाचें अनावरण झाले.

न्यूयॉर्क टाईम्स वॉलेसच्या मृत्यूलेखांत म्हणतो "द लास्ट ऑफ द जायंट्स बिलॉंगिंग टु दॅट वंडरफुल ग्रूप ऑफ इंटलेक्चुअल्स दॅट इन्क्लूडेड, अमंग अदर्स, डार्विन, हक्सले, स्पेन्सर, लायेल ऍंड ओवेन, हूज डेअरिंग इन्व्हेस्टिगेशन्स रेव्होल्युशनाईज्ड ऍण्ड इव्हल्यूशनाईज्ड द थॉट ऑफ द सेन्च्युरी."

क्लिष्टता तसेच विस्तार टाळण्यासाठी उत्क्रांति, उत्परिवर्तन, नैसर्गिक निवड, लैंगिकतेच्या अनुषंगानें होणारी नैसर्गिक निवड, इ. बारकाव्यांचा उल्लेख टाळला आहे.

संदर्भ:
१. उत्क्रांतीची नवलकथा:०१/१९९३:निरंजन घाटे
२. विकीपेडिया.
३. तिन्हीं चित्रें विकीपेडियावर विनामूल्य उपलब्ध.

No comments: