Sunday, March 21, 2010

‘त्या’चे शिवधनुष्य

प्रथम पुरुषांच्या प्रमुख जबाबदार्‍या. कुटुंबापासून सुरुवात करूं. बालपणीं विद्यार्जन आणि शरीरसंवर्धन. तरुणपणीं कुटुंबाचें संरक्षण, अन्नपाणी मिळवणें (प्राचीन काळीं शिकार व शेती, आतां अर्थार्जन), वंशसंवर्धन, कुटुंबातर्गत शिस्त आणि वृद्धापकाळिं कुटुंबास मार्गदर्शन व न्यायदान या पुरुषांच्या प्रमुख जबाबदार्‍या आहेत. १९५० ते १९७० च्या दरम्यान यांत मूलभूत फरक पडलेला नाहीं.


मुलांच्या वयाच्या १०-१२व्या वर्षीं १५ ते २५च्या वयोगटांतील मोठीं मुलें हे आदर्श (Roll Model) असतात. ५० च्या दशकांत जन्मलेल्या मुलांपुढें असे आदर्श होते -
१. साने गुरुजी, सावरकर, भगतसिंग, चापेकर बंधू, एस एम जोशी, दारासिंग, श्यामची आई मधील श्याम आणि मदर इंडिया मधील बिरजू.
२. कांहींपुढें, गांधी, नेहरू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
३.कांहींपुढें आदर्श असे दिलीपकुमार, राज कुमार, राज कपूर इ. नट.


यांपैकीं दुसर्‍याव तिसर्‍या गटांतील मुलांना पुढें कांहीं अडचण आली नाहीं. परंतु पहिल्या गटाचें चित्र पाहा. साने ग्रुजींनीं समाजाच्या ढासळत्या नीतीमत्तेमुळें आत्महत्त्या केली.  सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली, भकतसीम्ग व चापेकर बंधू फाशीं केलें, एस एम जोशी राजकीय दृष्ट्या सदैव अल्पमतांत. दारासिंग यशस्वी असला तरी तशी शरीरसंपदा सहसा प्रत्येकाला लाभत नाहीं, श्यामच्या कपाळीं सतत दुःख आणि बिरजूला तर त्याची आईच ठार करते. हा प्रचंड भावनिक आघात होता. यांना रोजच्या व्यवहारापासून तत्त्वज्ञान वेगळें करतां आलें नाहीं. भ्रष्ट समाजापासून तुटलेपण कायम त्यांच्या मनांत आहे. हे लोक सरकारी नोकरीत असले तर पैसे खात नाहींत. बरेच सहकारी, वरिष्ठ व कनिष्ठ त्यांची त्यांच्या अपरोक्ष हेटाळणी करतात आणि बहुतेकांना यांची अडचण होते. गो. रा. खैरनार, तिनईकर, अरुण भाटिया, हे त्यांपैकीं आहेत. त्यांपैकीं गो. रा. खैरनार, आणि अरुण भाटिया यांना मीं त्यांच्या (वेगवेगळ्या) कार्यालयांत कार्यालयीन कामासाठीं भेटलों आहे. कोणतीहि ओळख नसतांना त्यांनिं माझें अगत्यानें स्वागत करून निरपेक्ष वृत्तीनें माझीं कामें त्वरित आणि सौजन्यानें केलेलीं आहेत. खैरनारांचा अनुभव तर वैशिष्ट्यपूर्ण आहे. तेव्हां ते जी नॉर्थ प्रभागामध्यें होते. त्यांच्या केबिनच्या वायरिंगचें काम नुकतेंच पूर्ण झालें होतें. टेलिफोन कंपनीच्या त्या कामगाराला बक्षीस द्यायला त्यांनीं खिशांत हात घालून पाकीट काढलें. पाकिटांत फक्त दोन रुपये होते. त्यांनीं त्यांच्या कनिष्ठ सहकार्‍याला बोलावलें. त्याच्याकडून वीस रु. उसने घेऊन टेलिफोन कामगाराला बक्षीस दिलें. उद्यां आठवणीनें वीस र. मागून परत घ्या म्हणून त्या सहकार्‍याला बजावायला विसरले नाहींत. हें सगळें माझ्या उपस्थितीत झालें म्हणून मला कळलें. असे लोक खाजगी नोकरीत पण स्वच्छ असतात. पर्चेस वा स्टोअरमध्यें ‘कट’ ठेवत नाहींत. दिवाळींत व नववर्षदिनीं भेटवस्तू घेत नाहींत. वेळच्या वेळीं आणि सौजन्यानें पेमेंट काढतात. माल चोख पारखून व मोजून घेतात परंतु करचुकवेगिरीला थारा देत नाहींत म्हणून बर्‍याच वेळां मालकवर्गालाहि नको असतात. गृह सहकारी संस्थेत देखील हे बहुतेकांना नको असतात. साहाजिकच या भ्रष्ट समाजांत आपण उपरे व परके आहोंत ही भावना त्यांच्या मनांत कायम असते. हे लोक सदोदित कथा-कादंबर्‍यांत, काव्य-संगीतांत वा पर्यटनांत वा एखाद्या अन्य छंदांत रमलेले असतात. केव्हां एकदां नोकरीच्या जाचातून सुटतों असें त्यांना झालेलें असतें. यांना सेवानिवृत्तीनंतर कांहींहि प्रश्न पडत नाहींत. त्यांचा आत्मविश्वास दुर्दम्य असतो. कायम शत्रुपक्षाच्या वेढ्यांतील प्रतिकूल परिस्थितीत राहून ते कणखर झालेले असतात व कितीहि बदललेल्या परिस्थितीत मजेंत राहूं शकतात. हे भरष्टाचाराच्या विरोधांत असले तरी स्वटःअची कामें करून घेतांना व्यवस्थित लाच देतात. टेलिफोन कामगाराला खैरनारांनीं बक्षिसीच्या नांवाखालीं व्यवस्थित लाच दिलीच, वर भविष्यातील तत्पर सेवेची हमी मिळवली. अन्यथा आपलें काम लटकलें, याला पर्याय नाहीं व जग असेंच भ्रष्ट आहे हें यांना ठाऊक. बहुधा ‘कमाई’च्या संधि दवडल्याबद्दल घरून सुद्धां यांना ऐकून घ्यावें लागतें. परंतु पैशाच्या हव्यासाला अंत नाहीं हें यांना पुरतें ठाऊक असतें.


ऐकूनच आश्चर्य वाटेल पण मुलांवर बालपणीं फार मोठा मानसिक ताण १९७०-७५ पर्यंत असे. अहंकार हा पुरुषाचा स्थायीभाव आहे. मुली व मुलें यांत मुलांना अहंकाराचें शिंग फुटतें. १२-१४व्या वर्षीं मुलांना वाटतें आपण बाप्ये झालों. ती भावना शारीर भाषेंतून (बॉडी लॅंग्वेज) म्हणजे हावभावांतून दिसते. कधींतरी तें तीर्थरूपांच्या ध्यानांत येतें मग ठिणगी पडायला वेळ लागत नाहीं. ते देखील पुरुषच असल्यामुळें असूयेची जोड मिळते. सत्ता वडिलांच्या हातीं असल्यामुळें मुलगे त्या काळीं काय्म तणावाखालीं असत. बहुतेक घरीं त्या काळीं हिटलर, अयूबखान, चंगीझखान, तुघलख अशीं नांवें ठेवलेलीं असत. विविध साहित्यकृतींत याचें प्रतिबिंब आढळतें. उदा. मध्यस्थ हें नाटक. यांत बापलेकाच्या द्वंद्वामध्यें आई मध्यस्थाची भूमिका निभावते. हें अडनिडें वय फारच संवेदनाक्षम असतें. त्या काळीं अनेक घरांत हें चित्र दिसे. इतरांशीं जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे आपले बाबा फक्त आपल्याशींच वाईट वागतात याचें या मुलांना फार वैषम्य वाटे. कांहीं मुलें नंतर सावरत. पण अनेक मुलें नंतर सावरूं शकलीं नाहींत. तीर्थरूपांच्या विचित्र वागण्याचे बळी होऊन हजारों मुलांचीं स्वप्नें भंगलीं व त्यांची आयुष्यें भरकटून उद्ध्वस्त झालीं. याचें संख्याशास्त्रीय विश्लेषण कोठेंहि उपलब्ध नाहीं. माझ्या शाळेतील एका वर्गांत ६० मुलें असत. प्रत्येक वर्गांत अशीं एकदोन मुलें असत. शेवटच्या बांकांवर बसणारीं. म्हणजे किती टक्के होतात पाहा. परंतु शिक्षक त्यांना सावरून घेत. अशा किती शाळा असतील जिथें अशा मुलांची काळजी विशेष काळजी घेतली जाते? अन्यथा परिणाम ठरलेला. कधीं शैक्षणिक र्‍हास तर कधीं व्यसनाधीनता. शेवट काय तर आयुष्य उद्ध्वस्त होणें.


पण चांगल्या संस्कारातलीं हीं मुलें गुन्हेगारीकडे वळतांना फारशीं दिसलीं नाहींत. फक्त वडिलांचा मायेचा हात पाठीवरून फिरणें हा एकच मार्ग या मुलांना मार्गावर आणण्यासाठिं असे. पण तें प्रयत्न करूनहि घडत नसे. पूर्वीं बापलेकांचा या मतभेदाला जनरेशन गॅप असें म्हणत असत. परंतु ही गॅप आई व मुलगी यांत फारशी आढळली नाहीं. भावनिक स्थैर्य नसेल तर प्रगति कशी खुंटते याचें मुद्देसूद विवेचन डॅनिअल गोलमननें त्याच्या ‘इमोशनल इंटलिजन्स’ या पुस्तकांत केलेलें आहे. पुरुषाच्या भावनिक अतिरेकाचें टोक म्हणजे खून असें तो म्हणतो. यांत कांहींहि अतिशयोक्ती नाहीं. बदलत्या परिस्थितीशीं स्त्री जितक्या सहजतेनें जुळवून घेते तितक्या सहजतेनें पुरुष नाहीं जुळवून घेत. त्याची पहिली प्रतिक्रिया ही परिस्थितीच बदलून टाकण्याची असते. तें नाहिं जमलें (बहुधा नाहींच जमत) तर तो उद्ध्वस्त होतो व कांहींहि करूं शकतो. धंद्यांत एकदां नुकसान आल्यावर नंतर उभ्या आयुष्यांत अर्थार्जन करूं शकणारे अनेक आहेत. परंतु १९८०-९० नंतर मात्र चित्र बदललें आहे. आतांचे बाप मुलांशींमित्रत्त्वानें वागतात. मागील दोन-चार पिढ्यांकडून त्यानें योग्य तो धडा घेतला आहेत.


भारतांत १९६२, १९६५ व १९७१ या तीन युद्धांनंतर महागाई प्रचंड प्रमाणांत वाढली. आर्थिक कमाई व कुटुंबाचा खर्च याचें प्रमाण व्यस्त झालें. कुटुंबाची गरज म्हणून स्त्री कमावती झाली. आर्थिक जबाबदारी कमी झाली. परिणामीं पुरुषांवरील कुटुंबाबाहेरून येणारा ताण कमी झाला. परंतु त्याचा तथाकथित अहंकार वा आत्मसन्मान वा स्वाभिमान दुखावला आणि मनांतील ताण वाढला.


आतां सामाजिक जबाबदार्‍या. इतर कुटुंबाशीं कौटुंबिक स्नेह, जातपंचायतीतील, ग्रामपंचायतीतील, नगरपालिकेतील, विधानसभेतील, विधानपरिषदेतील, लोकसभेतील, राज्यसभेतील, विविध सामाजिक वा राजकीय मंडळातील प्रतिनिधित्त्व इ. सामाजिक जबाबदार्‍या आहेत. आतां खासकरून १९८० च्या दशकानंतर स्त्रियांच्या सहभागामुळें जबाबदार्‍या कमी झाल्या परंतु स्पर्धा वाढली. साहाजिकच पुरुषावरचा मानसिक ताण वाढला.


आतां स्त्री व पुरुषांच्या मानसिकतेतील फरकाविषयी. "मेन आर फ्रॉम मार्स ऍन्ड वीमेन आर फ्रॉम व्हीनस" अर्थात "पुरूष मंगळावरील आहेत व स्त्रिया शुक्रावरील आहेत" या नांवाचे एक पुस्तक वाचले. वाचल्यावर खरे सांगायचे तर एक धक्का बसला. म्हणजे वाचतांना किंवा वाचल्यावर धक्क्याने खुर्चीवरून पडलो वगैरे नाही. पण धक्का बसला. पण बरीच कोडी उलगडली. मी मुलांच्या शाळेत शिकलो. कॉलेजात देखील मैत्रिणी कमी व मित्र जास्त. मैत्रिणींचा संबंध अभ्यासापुरता व साहित्याच्या चर्चेपुरता. साहाजिकच मुली म्हणजेच स्त्रिया कशा विचार करतात हे ठाऊकच नव्हते. घरी आई, आजी, बहिणी या स्त्रिया. परंतु एक तर वयातील फ़रक आणि दुसरे म्हणजे मुलाचे, नातवाचे किंवा भावाचे कौतुक यामुळे त्यांच्याशी असलेले नातेसंबंध बरोबरीचे नव्हते. बोलण्यातील विषय देखील वेगळे. मी लहान असतांना माझ्यावर आईचा व आजीचा प्रभाव होता. साहाजिकच त्यांच्याशी बोलतांना ऐकण्याकडे व शिकण्याकडे कल होता.भाजी कशी झाली रे? आमटीत मीठ घातले का विसरले बघ. वाण्याकडून गूळ आण. लवकर आंघोळी करा. चल अभ्यासाला बस. पुस्तक सोडून लवकर आला नाहीस तर खायला मिळणार नाही. फ़ळीवरचा डबा काढून दे. पाय स्वच्छ धू नाहीतर फ़टके मिळतील. इ. हुकूम वा वळणदात्या सूचना. त्यात मते व्यक्त करण्याचा प्रकार फ़ारसा नसे. मतांतराचा प्रश्न येथे येत नाही. भाजी छान झाली. गाणे छान आहे. लताचा आवाज सुरेख आहे. मासिकावरील दलालांचे चित्र सुरेख आहे. यात मतांतर होण्याचे काही कारण नाही. त्यामुळे एकाच विषयावरील मतांची तुलना झाली नव्हती.  मोठा झाल्यावर त्यांची मते कालबाह्य वाटू लागली. व बहीणींवर माझ्या त्या वेळच्या नव्या पिढीच्या व आधुनिक मताचा प्रभाव होता. त्यामुळे स्त्री व पुरुष यांमधील वैचारिक फ़रक तेव्हां जाणवला नाही. बायकोच्या व माझ्या विचारातील फ़रक हा मूलतः संस्कारातील फ़रकामुळे असावा असे वाटले होते.


परंतु हे पुस्तक वाचल्यावर फ़ार मोठा धक्का बसला. एकदा एक स्नेही कुटुंब पर्यटनास जाऊन आले. एकाने त्याच्या सौ. ला ही बातमी दिली. "तू आम्हाला कद्धी कुठे घेऊन जात नाहीस" अशी त्याला प्रतिक्रिया मिळाली. "तू ब-याच दिवसांत आम्हाला कोठे फ़िरायला नेले नाहीस" असा या वाक्याचा अर्थ आहे. परंतु तो याचा अर्थ शब्दशः घेतो. "मागे अमुक अमुक ठिकाणी नेले नव्हते का?" असे तो स्पष्टीकरण देईल. परंतु तिला स्पष्टीकरण नकोय. केवळ मन हलके करणे हाच तिचा उद्देश आहे. ती व तो यांच्या भावना व्यक्त करण्याच्या भाषेत कसा फ़रक आहे पाहा. पण त्याच्या ते ध्यानांत येत नाही. ती खोटे बोलली व कारण नसताना त्याचा अपमान केला असे त्याला वाटते. शब्दाने शब्द वाढतो व भांडणे होतात. वाढलेल्या घरगुती मानसिक तणावाचा नक्कीच व्यावसायिक कामावर (प्रोफेशनल परफॉर्मन्सवर) परिणाम होतो. खासकरून मुलांच्या शाळेत शिकलेल्या पुरुषांना याचा मोठा तणाव येतो. माझे भाऊ देखील मुलांच्याच शाळेत शिकले. माझे लग्न झाल्यावर आमच्या घरी गप्पा मारतांना एखाद्या फ़ालतू विषयावरून सौ, आई व बहिणी विरुद्ध मी व माझे तीन भाऊ असा गमतीदार सामना होत असे. अर्थात त्या आम्हांला पुरून उरत हे सांगायला नकोच. मग आम्ही आमचेच खरे व बरोबर असा मोठमोठ्याने आरडाओरडा करीत विजय साजरा करीत असू. त्यामुळे वादात आपलाच विजय झाला असे आम्हाला वाटत असे.


आतां मराठी पुरुषांविषयीं. माझ्या एका अविवाहित मित्राचें मत वेगळेंच आहे. घराघरात ‘ती’ प्रथम माघार घेते. नंतर त्याचे व मुलांचे फ़ाजील लाड करून त्याला व मुलांना तिच्यावर अवलंबून जगण्याची सवय लावते आणि त्यांच्यावर राज्य करते. अर्थात तिच्या खस्ता खाण्याचे व कुटुंबातील योगदानाचॆं मूल्य तो कमी लेखत नाहीं. पण कालची मांजर फिटेस्ट फॉर सर्व्हायव्हल या न्यायानें वाघीण कशी बनते याचें हें विश्लेषण आहे. आमच्या ह्यांना कचरा काढता येत नाही, कपडे धुता येत नाहीत, चहा देखील करता येत नाही म्हणजे जगण्यास आवश्यक अशा कोणत्याहि गोष्टी येत नाही असे कौतुक ती करते. आणि मूर्ख तो, त्याला याचे कौतुक वाटते. हे झाले घरगुती प्रयोग. साहाजिकच ५० ते ८० या दशकातील मध्यमवर्गीय मराठी पुरुष प्रगतीसाठी किंवा चमकदार संधीसाठी घर सोडून जातांना दिसत नाही. आणि मराठी मध्यमवर्गीयांवर अल्पसंतुष्टतेचा शिक्का बसला. याच वेळीं केरळी, उत्तर्भारतीय, बंगाली तरूण एका खोलीत दहावीसच्या जथ्थ्यानें काटकसरीनें राहून, अर्थार्जन करून कमी वेतनावर स्पर्धा करीत होते. अर्थात मराठी माणसाच्या व्यावसायिक पीछेहाटीचे हे काही एकमेव कारण नव्हे. परंतु हे एक प्रमुख कारण म्हणता येईल. अशा रीतीने घरगुती आयुष्याचे प्रतिबिंब व्यवसायावर पडलेले दिसून येते.  सध्यां मात्र मराठी तरूण मुलेंमुली नोकरीनिमित्त दूर एकेकटे राहतात आणि व्यावसायिक कौशल्याच्या जोडीनें स्वयंपाक व घरकामांत प्रवीण होताहेत. मायक्रोवेव्ह ओव्हन, धुलाई यंत्र, व्हॅक्यूम क्लीनर इतर यंत्रांचेहि त्याला चांगलें साहाय्य होतें.


गुजराथी मारवाडी घरांत लहानपणापासून व्यावसायिकतेचे संस्कार होतात. कमवायला लागल्यावर फुकट कांहीं घेऊं नये व फुकट कांहीं देऊं नये हें त्यांच्या मनावर पक्कें बिंबवलें जातें. त्यामुळें तीं मुलें बापाकडे धंद्यासाठीं व्याजानें कर्ज मागतात. बाप मुलाच्या धंद्याची चौकशी करतो. झालेंच तर धंद्यातले, धोके, दोषहि दाखवतो. मुलगाहि योग्य ती काळजी घेतो, दोष दूर करतो आणि बाप भांदवल उभें करून देतो. मराठी मुलाच्या बापाला धंद्याची माहितीच नसते. तो मुलाला मार्गदर्शन देऊं शकत नाहीं व भांडवलहि देऊं शकत नाहीं. भांडवल दिलेंच तर आयुष्याची कमाई असलेला प्रॉव्हिडंट फंड देतो. व्यावसायिक संस्कार नसलेला मुलगा बापाला व्याज तर सोडाच, मुद्दलहि परत देत नाहीं. मग मुलगा वा सुनेशीं पटलें नाहिम तर बाप निराधार. अशीं उदाहरणें पाहून बर्‍याच वेळां बाप मुलाला भांडवलच देत नाहीं. सुदैवानें सेवा व्यवसायाला एकविसाव्या शतकांत बरे दिवस आलेले आहेत. त्यामुळें सेवा व्यवसायांत मराठी तरूण अग्रेसर आहेत.


चालू असलेल्या धंद्यात मंदीमुळें तर कधीं चमकदार संधीसाठीं अचानक भांडवल लागतें. मारवाडी वा गुजराती स्त्री नवर्‍याला दागिने विकून व जमीन जुमला असें अन्य स्त्रीधन वेळप्रसंगीं घरहि विकून भांडवल उभें करायला साहाय्य करते. राजकोट, अहमदाबाद या बाजूला अशा कारणासाठिं घर वा अन्य मालमत्ता विकणें ही अगदीं सामान्य गोष्ट आहे. किती मराठी कुटुंबांत असें घडूं शकेल.या लोकांशीं स्पर्धा मराठी पुरुषाशीं आहे.


६० - ७० च्या दशकात ती नोकरी करू लागली. परंतु तिला अर्थिक स्वातंत्र्य नव्हते. ५ रुपये खर्च करतांना देखील तिला नवर्‍याची, सासूची किंवा सासर्‍यांची परवानगी लागे. आणि गंमत म्हणजे तथाकथित स्थैर्य व सुरक्षा याच्या बदल्यात तेहि तिला हवेसे असे. आर्थिक स्वातंत्र्य तसेच व्यक्तिस्वातंत्र्य या संकल्पनाच तिला ठाऊक नसत. तिला त्या ठाऊक झाल्यावरच ‘त्या’ची खरी गोची झाली. आतापर्यंत कार्यालयांत ‘ती’ ला दुय्यम भूमिका असे. डिक्टेशन घेणे, पत्रे टाईप करणे, डायरी ठेवणे,  अपॉइंट्मेंट्ची आठवण करणे, टेबल व्यवस्थित लावणे, अकाऊंट खात्यात काम करणे, इ. कामे ती करीत असे. आता ती जबाबदारीची पदे भूषवू लागली. ‘त्या’ ला होणारी स्पर्धा जास्त कठोर झाली. यावर कळस झाला जेव्हा ‘ती’ ‘त्या’च्यावर अधिकारी म्हणून आली. तिला बॉसच्या स्वरूपात पाहून त्याचा पुरुषी अहंकार दुखावला. लीलावती, मैत्रेयी सारख्या विदुषींच्या काळानंतर म्हणजे सुमारे १५०० वर्षे स्त्री दुय्यम भूमिकेत होती. फ़ुले, आगरकर, लोकहितवादी, महर्षी व र. धों. कर्वे पितापुत्र यांच्या पुण्याईने निदान त्यांच्यानंतर ५० - १०० वर्षानी का होईना स्त्रीला हे स्वातंत्र्य मिळाले. हे फ़क्त भारतातच नाही. जागतिकच उदाहरणे देतो. लिझ माईट्नर. जागतीक दर्जाची संशोधक. हिटलरच्या राज्यात संशोधक होती. तिच्या कार्यालयातील लोक तिच्याबरोबर चालत जात असलेल्या तिच्या हाताखालील दुय्यम सहकार्‍यांना ‘गुड मॉर्निंग’ सारखे अभिवादन त्यांच्या भाषेत करीत. परंतु तिच्याकडे पाहात देखील नसत. एकास्त्रीला बॉस म्हणून पुरुष सहन नाहीं करूं शकत. हें समर्थन नाहीं परंतु इतक्या वर्षांची मानसिकता आहे, ती बदलणें सोपें नाहीं. आताशीं कोठें हें सत्य तो पचवायला लागला आहे. पु. ल. देशपांडे गाडी चालवीत असतांनाची गोष्ट. सौ. सुनीताबाईच नेहमी प्रवासात गाडी चालवायच्या. पुलंना नीट जमत नसे वा तसा आत्मविश्वास नव्हता असेल. एकदा कोल्हापूरला रस्त्यावर कमी गर्दी असल्यामुळे पु. ल. ना गाडी चालवावीशी वाटली. नेहमी प्रमाणे सुनीताबाई गाडी चालवत होत्या. रस्त्यावर मुले खेळत होती. ‘अरे बाजूला व्हा, बाई गाडी चालवतीया’ मुलांची प्रतिक्रिया. तेवढ्यात गाडी थांबली व पु. ल. चक्रावर बसले. ‘खेळा रे आता! बाबा गाडी चालवायला बसला!’ मुले म्हणाली व निर्धास्त होऊन रस्त्यावर आली. समाजाची अशी प्रतिक्रिया आहे. व या जबाबदारीचा ताण सतत पुरुषावर असतो. जवळ्जवळ पंधराशे वर्षांची मानसिकता बदलण्याचे शिवधनुष्य पुरुषाला पेलायचे आहे. ज्या शिवधुष्याचें वजन स्त्रीवर नाही. म्हणजेच एकाच शर्यतीत स्त्री मोकळ्या हाताने व पुरुष सध्या तरी खांद्यावर वजन घेऊन धावत आहेत. थोडक्यात म्हणजे तिला टेल एंडर बॅट्स्मनला मिळणारा क्रिकेटरसिकांच्या अपेक्षा नसल्याचा लाभ मिळतो व ती तणावमुक्तपणे काम करू शकते. साहजिकच तिच्या कामाचा दर्जा वाढतो. पर्यायाने तिच्या पुरुष सहकार्‍यांना जास्त तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागते व कामाचा दर्जा घसरण्याची शक्यता वाढते.


हें पुरुषांपुढचें लंगडें समर्थन नव्हे. ही वस्तुस्थिति आहे. आणखी एक गोष्ट. मुलींना १२वीपर्यंतचें शिक्षण मोफत आहे. शहरांत दारिद्र्यरेषेखालील एका कुटुंबांत एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलगी शिकूं शकेल, मुलगा नाहीं. खेडेगांवीं देखील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांत आईबाप मुलीला शाळेंत पाठवतील व मुलाला शेवर कामाला. अर्थात हा मर्यादित अनुभवावर व ऐकीव माहितीवर आधारित आधारलेला तर्क आहे. यावर सांख्यिकी संशोधन व्हायला पाहिजे.


नोकरी व व्यवसायातील पुरुषांपुढील प्रश्न आतां आपण पाहिले. आतां सेवानिरुतांकडे वळूं. ९० च्या दशकानंतर आणखी वेगळेच ताट त्याच्यापुढे वाढलेले आहे. ग्लोबलायझेशन, कॉंप्यूटर, ऑन लाईन सेवा, आऊट्सोर्सिंग, नवीन मॅनेजमेन्ट धोरण तसेच प्रशिक्षित तरुणांची उपलब्धता  इ. मुळे त्याच्यावर स्वेच्छानिवृत्ती (खरे म्हणजे सक्तीनिवृत्ती)  घेऊन घरी बसण्याची पाळी आली. ती व तो यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत मुळातच फ़रक आहे हे ध्यानांत घेतले की अशीं बरीच प्रमेये सुटतात. आयुष्यातील पहिला अग्रक्रम स्त्री घराला देते. घर हेंच तिचें प्रमुख कार्यक्षेत्र होतें आणि बहुधा राहील. ती घरांत मनापासून एकजीव झालेली असते. नोकरींत असतांनाच सेवानिवृत्तीनंतर घरीं काय करायचे याचे तिचे प्लान्स आंखलेले असतात. सेवानिवृत्तीनंतर काय हा यक्षप्रश्न तिच्यापुढे नसतो. उलट सेवानिवृत्ती ही तिला समोर वाळवंटातील ओयासिसप्रमाणे विसाव्याचे स्थान म्हणून दिसत असते. केव्हा एकदाची नोकरीची दगदग संपते व घरात पूर्ण वेळ लक्ष देते असे तिला झालेले असते. तिच्यासमोर आतांसुद्धां जीवनाचें ध्येय वा उद्दिष्ट (Goal) असतें. याउलट दिवसाचे १० ते १२ तास घराबाहेर घालवणार्‍या पुरुषाचें मन मात्र घरांत रमत नाहीं. त्याला घर हा तुरुंग वाटत असतो. म्हणून सेवानिवृत्तीनंतर काय याचा यक्षप्रश्न त्याच्यापुढें आ वासून असतो. या प्रश्नाचा त्यानें इतका धसका घेतलेला असतो कीं प्लानिंग करणेंहि तो विसरतो. अगदीं डिपार्टमेंटचा प्लानिंग मॅनेजरदेखील असाच वागतो. मग निवृत्तीनंतरचें आयुष्य दिशाहीन व कोणतेंहि ध्येय वा उद्दिष्ट नसलेलें असतें. घर त्याला तुरुंगासारखें वाटतें. १५०० वर्षांच्या पुरुषप्रधान मानसिकतेत त्याला घरकाम हे कमीपणाचे वाटते. घरीं आयतें खाण्याच्या सवयीमुळें घरकाम करतांहि येत नसतें. घरकाम तर सोडाच बॅंकेचीं कामें करणें, बिलें भरणें इ. कामें करणें त्याला कमीपणाचें वाटतें. त्यातून पत्नी स्वर्गवासी झाली तर तर त्याची काळजी घेणार कोण? ही परिस्थिति बदलायची वेळ आली आहे. बॅंकिंग, बिलें भरणें हें ‘ऑन लाईन’ होऊं शकतें. सेवानिवृत्त पुरुष घरीं जेवण, साफसफाई, मुलें सांभाळणें, व इतर कामें करीत आहे, इंटरनेटवरून शेअर खरेदी विक्री करीत आहे, बायको, मुलगा व सून कामावर गेले आहेत हें चित्र कोठें दिसतें कां? मला स्वतःला मुलें सांभाळणें सोडून इतर सर्व कामें येतात.




आयुष्याला ध्येय वा उद्दिष्ट नसेल तर व्यक्तीचा शारिरिक र्‍हास होतो. - The absense of cause or goal leads to debacle of mental and physical health - असें मानसशास्त्रज्ञांचे तसेंच समाजशास्त्रज्ञांचेंहि मत आहे. मग ‘त्या’ला विविध रोग जडतात. जर मोठा आजार झाला तर बरें होण्यास जो मानसिक कणखरपणा लागतो तो त्याच्याकडे नसतो. बचाव ही गोष्ट पुरुषाच्या मानसिकतेत बसत नाहीं. तो आक्रमण वा हल्ला करूं शकतो. त्याच्या या मानसिकतेत बदल व्हायला पाहिजे.


खरे म्हणजे स्त्रीने व्यावसायिक क्षेत्र समर्थरित्या काबीज केले परंतु पुरुषाला मात्र गृहक्षेत्र काबीज करणे सोडा तर कांही सन्माननीय अपवाद वगळता तेथे रमणे देखील त्याला अजून जमले नाही. सेवानिवृत्त स्त्रीकडून अजूनहि घरांत स्वैपाक, मुले सांभाळणे, भाजी आणणे या बाबतीत मदतीची अपेक्षा केली जाते. पुरुषाकडून फ़ार फ़ार तर बॅंकेची कामे करणे, बिले भरणे, फ़ार तर भाजी आणणे याखेरीज फ़ारशी अपेक्षा केली जात नाही. तरीहि पुरुषाला सेवानिवृत्ती हे संकटच वाटते. या मानसिकतेतूनच त्यांनीच स्वतःची सुटका करून घ्यायला पाहिजे. कबूल आहे की वातावरण बदलल्यावर स्वतःला त्यात सामावून घेण्याची मानसिक तयारी मुलीची लहानपणापासूनच होते. हे करू नकोस, ते करू नकोस असे तिला लहानपणापासूनच घरूच अनौपचारिक प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरून तिला सासरी जुळवून घेणे सोपे जावे. एक किस्सा आठवला. आमच्या कार्यालयात एकदा समारंभ होता. रात्री दहापर्यंत रंगला. स्त्रियांची घाईगडबड सुरू झाली. एका ख्रिश्चन महिलेला मी म्हटले की उद्या रविवार आहे मस्त दहा वाजेपर्यंत झोपा काढा. ती तिशी पार केलेली दोन मुलांची आई असलेली महिला म्हणाली की सासू काम करते व सून झोपली आहे हे बरे दिसणार नाही. म्हणून जरी रविवार असला तरी मला लवकरच निदान सातच्या सुमाराला उठायला लागेल. हा याच प्रशिक्षणाचा दुष्परिणाम. पुरुषाला असे कोणतेहि प्रशिक्षण मिळत नाही. उलट त्याचे विनाकारण फ़ालतू लाडच होतात. सांगायचा मुद्दा हा की अम्हा पुरुषांच्या लाडावलेल्या आळशी, अहंकारी व अपरिवर्तनीय संवयी आपणच बदलायला पाहिजेत. पुरुषांनीं वयाच्या ४०-४५ च्या वर्षापासूनच असें प्रशिक्षण घेतलें पाहिजे. सेवानिवृत्त पुरुषांनीं आपली मानसिकता बदलायची गरज आहे. समाजात जीं कामें करणारे लोक सध्यां नाहिंत तीं कामें अहंकार व प्रतिष्ठा वा मानमरातब यांविषयींच्या मनाच्या पारंपारिक कल्पना दूर ठेवून केलीं पाहिजेत व मुख्य म्हणजे स्वयंपूर्ण झालें पाहिजे.


बदलत्या युगाचे भान ठेवून लहानपणापासूनच मुलांना देखील घरकाम, स्वयंपाक इ. कामे शिकून स्वयंपूर्ण बनायला पाहिजे. कमवायला लागल्यावर देखील घरात कामे केली पाहिजेत. जर ‘ती’ नोकरी करून स्वयंपाक करते तर ‘मी’ कां करू नये? असे आपल्या मनांत आले पाहिजे. आपण आता पहातोच की ग्लोबलायझेशनमुळे मुलांना तसेच मुलींना परदेशी जाऊन राहावे लागते. ही मुले लवकरच स्वयंपाक, कपडे धुणे व इतर घरकामांत लौकरच प्रवीण होतात. माझी खात्री आहे की ही मुले जेव्हा सेवानिवृत्त होतील तेव्हा त्यांना आताच्या सेवानिवृत्तांना ज्या समस्या भेडसावत आहेत त्या भेडसावणार नाहीत.




पूर्वप्रकाशन: रोहिणी: एप्रिल २००८, ‘त्या’चा दिवस या शीर्षकाखालीं.