Thursday, May 8, 2008

स्मारक केशवसुतांचे

स्मारक केशवसुतांचे



गणपतिपुळे हे एक निसर्गसुंदर आणि रम्य ठिकाण आहे हे सर्वांस ठाऊक आहे. येथून दोन कि. मी. वर मालगुंड आहे. हे कविवर्य केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले यांचे जन्मस्थान. येथे त्यांचे घर स्मारक म्हणून जतन करण्यात आले आहे. अगदी गर्द अरण्य असावे अशी नसली तरी बर्‍यापैकी झाडोरा पाहून मन प्रसन्न होते. मे महिन्याच्या उकाड्यात देखील ब्र्‍यापैकी थंडावा होता. झाडे पाहून व थंडावा अनुभवून मन प्रसन्न झाले. त्याखेरीज जाणवणारी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमालीची शांतता. पर्यटनाच्या गर्दीच्या दिवसांत देखील येथे पर्यटकांची फारशी गर्दी नव्हती. आम्ही धरून जेमतेम पंचवीस लोक येथे होते. जे येत ते भरभर कसेतरी निर्विकारतेने कांहीतरी पाहात व दहापंधरा मिनिटात निघून जात. पण त्याचाहि एक फायदा आहे. हे लोक पटकन गेल्याने आपल्याला त्यांचा फारसा उपद्रव होत नाहीं. दुसरे म्हणजे याबद्दल बर्‍यावाईट बहुधा वाईटच, प्रतिक्रिया ते इतरांना सांगणारच.त्यामुळे हे येथे आहे हे साहित्यप्रेमींना त्यांच्या तोंडून कळेलच.



नाममात्र शुल्क भरल्यावर प्रवेश मिळतो. ते भरून प्रवेश केल्यावर जांभा दगडापासून बनविलेली पायवाट आहे. (यालाच पाखाडी असे म्हणत.) प्रथमदर्शनी डाव्या हाताला त्यांचे जन्मघर (ज्या घरांत जन्म झाला ते घर) आहे. घर मातीच्या चौथर्‍यावर बांधलेले आहे. जांभा दगडाच्याच दोन पायर्‍या ओलांडल्या की आपण घरात जातो. कौलारू घर स्वच्छ सारवून नीटनेटके जतन केले आहे. आपण पुढे घरामागे गेलो की प्रशस्त बाग केलेली आहे. पण ही बाग वेगळीच आहे. येथे चकचकीत काळ्‍या दगडांच्या पाचफूट उंचीच्या पाट्या आहेत. त्यावर केशवसुतांच्या कविता कोरलेल्या आहेत. कांही कविता आपण शाळेत अभ्यासल्या आहेत. ९० अंशांत, पाट्या काट्कोनांत उभ्या नाहींत. ७५-८० अंशांच्या कोनांत. त्यामुळे वाचणें सोपे जातें. त्या वाचल्याखेरीज आपण पुढे जात नाही. एक तुतारी आपल्याला पुन्हा साद घालते. नव्या दमाच्या नव्या मनूचे आकर्षण पुन्हा मोहून टाकते. काठोकाठ भरलेला प्याला तर काय, आपल्यात चहादेखील न पिता उत्साह संचारतो. बहुतेकांना अपरिचित अशादेखील कविता आहेत. मग ग्रंथालय आहे.



नंतरचे दालन म्हणजे अलीबाबाची गुहाच. एकेका कवीचे पेन्सिलने काढलेले रेखाचित्र (स्केच) व त्याखाली त्याकवीचे नाव, जन्म (हयात नसलेल्यांच्या)मृत्यूचे वर्ष, त्याकवीच्या कवितांचे वैशिष्ट्य पाचदहा ओळीत व एक कविता. कधीतरी पूर्ण दिवस काढून येथे येण्याचे ठरविले. तासादोनतासांत वचावचा पर्यटन आटपण्याचे हे ठिकाणच नाही.



सर्वात मागच्या बाजूला सुरेख अंगण आहे. बसण्यास दगडी बाके आहेत. फार वेळ उभे राहून साहित्यप्रेमी थकणारच. अलीबाबाच्या गुहेत किती वेळ गेला ते मनाला कळत नाही. पण शरीर तक्रार करतेंच. या अंगणांत मस्त झाडे आहे. मागील बाजूस काही आवारांपलीकडे समुद्र आहे. झकास वारा येतो. थकवा पळून जातो. आपण केशवसुतांना मनोमन वंदन करतो, एक सुंदर स्मारक उभे केल्याबद्दल मधु मंगेश कर्णिक, कुसुमाग्रज जवंत दळवी इ. थोरांना ना दुवा देतो व एका उत्कट मनस्थितीत परत फिरतो.