Wednesday, April 23, 2014

असे वैज्ञानिक असे विज्ञान - ६ डोरोथी क्रोफूट हॉजकिन

डोरोथी क्रोफूट हॉजकिन 
DOROTHY CROWFOOT HODGKIN
प्रोटीन क्रिस्टलोग्राफीची (Protein Crystallography) जननी.

जन्म: कैरो, इजिप्त येथे १२ मे, १९१०. वडील जॉन आणि आई ग्रेस क्रोफूट या दांपत्याच्या चार मुलींपैकी हॉजकीन ही सर्वात मोठी. वडील शिक्षण मंत्रालयातर्फे कैरोमध्ये पुरावस्तुशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत तर आई थोर कलावंत. कॉप्टीक टेक्स्टाईल (प्राचीन इजिप्शियन वस्त्रेप्रावरणे) मधील कसबी कलावंत. १९३७ साली आफ्रिकी संस्कृती विषयातील तज्ञ थॉमस हॉजकीन यांच्याशी डोरोथीचा विवाह झाला. त्यांना तीन अपत्ये झाली.

सामान्यतः शास्त्रीय चरित्रकारांना उत्तम चारित्र्य आणि सखोल विज्ञान यात फारसा परस्परसंबंध आढळत नाही. अर्थात यालाही काही अपवाद आहेतच. चार्ल्स डार्विन हा प्रेमळ, उत्तम सांघिक शास्त्रज्ञ, कुटुंबासाठी वाहून घेतलेला पिता, तरूण सहकार्यांाचा आधार, प्रांजळ, प्रामाणिक आणि अजातशत्रु असा शास्त्रज्ञ होता अशी इतिहासकार त्याची मुक्त कंठाने स्तुती करतात. उत्क्रांतीविज्ञान डार्विन जिवंत असतांनाच आल्फ्रेड रसेल वॉलेसने शोधून काढले होते. त्या वॉलेसचा डार्विनने कधीही द्वेष केला नाही. उलट डार्विनच्या समाजातील मान्यवर स्थानामुळे आणि त्याच्या रसेलला असणार्‍या पाठिंब्यामुळे कर्मठ चर्च रसेलविरूद्ध कारवाई करायला धजले नाही.

डोरोथीला नक्कीच अशा अर्थाने आधुनिक युगातली डार्विन म्हणता येईल. तिच्या सहकार्‍यांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर “ती एक थोर रसायनशास्त्रज्ञा, संत म्हणता येईल अशी व्यक्ती, प्रेमळ, लोकप्रिय, मृदुस्वभावी आणि सहिष्णु वृत्तीची आणि विश्वशांतीची प्रणेती होती.”असे हेमोग्लोबीनच्या अणूचा शोध लावणारे विख्यात नोबेलविजेते शास्त्रज्ञ मॅक्स पेरूट्झ म्हणतात. विज्ञानक्षेत्रातल्या तिच्या योगदानाचा आणि विश्वशांततेसाठी तिने केलेल्या अथक कार्याचा आढावा थोडक्यात घेणे केवळ अशक्य आहे.

नमनाला भरपूर तेल ओतल्यानंतर आता तिच्या विज्ञानातल्या योगदानाकडे वळूयात. प्रथिन स्फटीकचित्रणविज्ञान अर्थात प्रोटीन क्रिस्टलोग्राफी या विषयाचा पाया तिने घातला. इ.स. १९३४ मध्ये आपले मार्गदर्शक गुरू जे. डी. बर्नल यांच्या साथीने तिने सर्वात प्रथम जैव पदार्थाच्या स्फटीकाच्या ‘क्ष-किरण डीफ्रॅक्शन’ पद्धतीने छायाचित्रणाला पेप्सिनच्या रेणूपासून सुरुवात केली.

आता क्ष किरण स्फटीकवेधाविषयी म्हणजे ‘एक्सरे क्रिस्टलोग्राफी’विषयी. प्रकाश सामान्यतः सरळ रेषेत प्रवास करतो. एखाद्या स्फटीकातून किरण गेले की किरणांच्या मार्गात बदल होतो. (इथे किरण ही संज्ञा प्रारणांचा झोत अशा व्यापक अर्थाने वापरली आहे. फक्त दृश्य किरणांचा झोत अशा मर्यादित अर्थाने नव्हे) हा बदल त्या स्फटीकाचे विशिष्ट किरणांनी छायाचित्र घेऊन नोंदवता येतो. क्लिष्टता टाळण्यासाठी जास्त तपशिलात जात नाही. या बदलावरून त्या स्फटीकाची अणुरचना समजण्यास मदत होते. क्ष किरण वापरून जर एखाद्या स्फटीकाच्या अणूचे छायाचित्र घेऊन त्या अणुरचनेचा अभ्यास केला तर त्या अभ्यासाच्या शास्त्राला ‘एक्स रे क्रिस्टलोग्राफी’ म्हणतात.

क्रिस्टलोग्राफीसाठी क्ष किरणच का? असा प्रश्न मला पडला. तरंगलांबी जेवढी कमी तेवढे अतिसूक्ष्म पदार्थाच्या चित्राचे तपशील - रेझोल्यूशन जास्त चांगले मिळत असावे असा माझा तर्क. म्हणूनच नॅनो तंत्रज्ञानात इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरत असावेत. असो. हा केवळ माझा तर्क.

‘क्ष किरण स्फटीकचित्रण’ पद्धतीने तिने कोलेस्टेरॉल, लॅक्टोग्लोब्यूलीन, फेरिटीन, टोबॅको मोझॅईक व्हायरस (TMV), पेनिसिलीन, B-12 जीवनसत्त्व आणि इन्शुलीन (इन्शुलीनची रचना शोधायला ३४ वर्षे लागली) या पदार्थांची अणुरचना शोधून तर काढलीच, वर क्ष-किरण तीव्रता जास्त अचूकतेने मोजण्याची व नोंदण्याची पद्धतही शोधून काढली. बर्नल यांच्या मार्गदर्शनाखाली काम पूर्ण केल्यानंतर तिने ऑक्सफर्ड इथे स्वतःची प्रयोगशाळा काढली. या प्रयोगशाळेतील आनंदी, उत्फुल्ल आणि उत्साहवर्धक वातावरणाबद्दल तिच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तिथल्या आठवणीत भरभरून लिहिले आहे.

हाती घेतलेली कामे प्रचंडच होती. कारण दर वेळी हाती घेतलेल्या नव्या प्रथिन रेणूचा आकार हा उपलब्ध तंत्राच्या आवाक्याबाहेरचा असे आणि दर वेळी हातातला प्रथिन रेणू नवनव्या वेगळ्या, वैशिष्ट्यपूर्ण अशा  समस्या उपस्थित करीत असे. १९४७ साली पेनिसिलीनची अणुरचना प्रसिद्ध केल्यावर तिला रॉयल सोसायटीच्या सदस्यत्वाचा बहुमान प्राप्त झाला तर B-12 म्हणजे सायनोकोबालअमाईनची अणुरचना तिने प्रसिद्ध केल्यावर १९६४ साली तिला नोबेल पारितोषिकाने गौरवले गेले. इन्शुलीनची रचना तिने अगोदरपासून ३४ वर्षे झगडल्यानंतर १९६९ साली शोधून काढली. १९८८ साली तिने अत्याधुनिक असे संगणकीय तंत्र शोधून काढले आणि प्रथिनाची रचना शोधून काढायचे क्लिष्ट काम आता काही वर्षांऐवजी काही महिन्यात किंवा काही आठवड्यात करता येऊ लागले. अशा तर्‍हेने क्ष किरण डीफ्रॅक्शन पद्धतीने केलेल्या स्फटीकवेधाच्या - क्रिस्टलोग्राफीच्या सहाय्याने क्लिष्ट रचना असलेल्या रेणूची रेण्वीय रचना शोधून काढण्याचे तंत्र तिने अनेक सुधारणा करून विकसित केले. तिचे क्रिस्टलोग्राफीतले कार्य तिचे नाव न घेता पुढे जाणे शक्य होणार नाही एवढे उत्तुंग असे आहे.

शास्त्रीय धोरण आणि विदेशनीती या क्षेत्रातली डोरोथीची भूमिका ही सदैव तिच्या संशोधनाला पूरक अशी राहिली. विश्वशांतीसाठी केलेल्या सार्वजनिक कार्यामुळे तिच्या संपूर्ण कुटुंबाला तीस वर्षांपेक्षा जास्त काळ समाजाकडून मानमरातब आणि आदर मिळाला. अनेक आंतरराष्ट्रीय शांतिसंघटनांची ती सदस्या होती. शीतयुद्धातल्या प्रतिबंधामुळे १९९० पर्यंत तिला अमेरिकेचा व्हिसा मिळाला नव्हता. वय ८०च्या पुढे गेले, संधिवाताच्या दुखण्याने विकलांग झाली तरी देखील अमेरिकेत जाऊन इन्शुलीन, क्रिस्टलोग्राफी आणि क्रिस्टलोग्राफीची भविष्यातील वाटचाल या विषयावर अमेरिकन संस्थांमध्ये चर्चा करण्याची संधी साधायला मात्र तिने अजिबात वेळ दवडला नाही आणि अमेरिकेचा एक संस्मरणीय दौरा केला. दौर्यारवरच्या प्रत्येक ठिकाणी गर्दीमुळे standing-room-only श्रोतृवृंद असे. (सभागृहातील सर्व खुर्च्या/आसने पूर्ण भरली की फक्त उभे राहून व्याख्यान ऐकण्यासाठी पाश्चिमात्य देशात तेव्हा कमी दराने तिकिटे विकली जात. अशा श्रोतृवृंदाला ‘स्टॅंडींग रूम ओन्ली ऑडिअन्स’ असा शब्दप्रयोग केला जात असे). १९९४ साली आपल्या वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी मेंदूच्या रक्तपुरवठ्यात अडथळा आल्यामुळे शिप्स्टन ऑन स्टूर, इंग्लंड इथे २९ जुलै १९९४ रोजी तिचे प्राणोत्क्रमण झाले.


- X – X – X –

असे वैज्ञानिक असे विज्ञान - ५ लिझ मेईट्नर

इतिहासातील आत्यंतिक सुदैवाचे आणि आत्यंतिक दुर्दैवाचे फेरे वाट्याला आलेली शास्त्रज्ञ असे मीं हिचे वर्णन करेन. अणुभंजनाची म्हणजेच ऍटॉमिक फिशनची प्रणेती असलेली लिझ वैज्ञानिक जगतांत खरे तर अणुबॉंबची आई म्हणूनच समजली जाते. पण समाजाकडून अपमानित होण्यासाठीं आवश्यक असलेल्या एक नव्हे तर दोन तत्कालीन गोष्टी तिच्या ठायी उपजतच होत्या. पहिली म्हणजे तिने स्त्रीजन्म घेतला. दुसरी म्हणजे म्हणजे ती जन्माने ज्यू होती आणि कर्तृत्त्व ऐन बहरात असताना ती नंतर नाझी टाचेखाली गेलेल्या जुलमी जर्मनीत होती. परिणाम काय? वयाच्या ६६ व्या वर्षापर्यंत अवहेलना, हेतुपुरस्सर केलेले अवमान आणि असंख्य पाणउतारे वाट्याला आले.

जन्म ७ किंवा १७ नोव्हेंबर १८७८. वडील फिलिप मेईट्नर हे ऑस्ट्रियातील पहिल्या काहीं ज्यू वकीलांपैकी एक. त्यांच्या आठ मुलांपैकी लिझ तिसरी. व्हिएन्नाच्या ज्यू समाजाच्या रजिस्टरमध्ये  तिचा जन्म १७ नोव्हेंबर १८७८ असा दाखवलेला आहे तर इतर सर्व दस्तावेजातल्या नोंदीत तो आहे ७ नोव्हेंबर १८७८. १९०८ सालीं वयाच्या ३० व्या वर्षी तिनें बाप्तिस्मा घेतला आणि प्रॉटेस्टंट ख्रिश्चन धर्म स्वीकारला. आपलें एलिझ (Elise) हे नाव आणखी छोटे करून तिने लिझ (Lise) असे केले.

त्या काळी महिलांना शैक्षणिक संस्थांतून उच्च शिक्षण घेता येत नसे. पण तिच्या आईबाबांच्या पाठिंब्यामुळे तिला ते शक्य झाले. चांगले, नव्हे सर्वोत्तम म्हणता येतील असे आईबाबा लाभले हे तिचे भाग्यच. याबद्दल तिच्या आईबाबांचे जगावर उपकारच आहेत. Externe Matura ही शालांत परीक्षा Akedemisches Gymnasium या व्हिएन्नातील सर्वांत जुन्या शाळेतून मधून मिळवून तिने १९०१ सालीं खाजगी रीत्या आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.  आपले शिक्षक आणि विख्यात भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्टझमन यांच्या प्रोत्साहनामुळे तिने भौतिकशास्त्राचा अभ्यास केला. व्हिएन्ना विद्यापीठातून भौतिकशास्त्रातून डॉक्टरेट घेणारी ती दुसरी महिला. साल होते १९०५. गॅसचे दिवे बनवणार्‍या कारखान्यांत काम करायची संधी तिने नाकारली. वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे तसेच आर्थिक पाठिंब्यामुळे ती बर्लिनला गेली. मॅक्स प्लांकने आपल्या व्याख्यानांना हजर राहायची तिला परवानगी दिली. खरे तर हे थोडे विचित्रच होतें. तोपर्यंत मॅक्स प्लांकने एकाही महिलेला तशी परवानगी दिली नव्हती. तिच्या आयुष्यातील सुदैवी घटनांमधली एक एक झळझळीत शलाका. एक वर्षानंतर ती मॅक्स प्लांकची सहाय्य्क बनली. सुरुवातीची काही वर्षे तिने रसायनशास्त्रज्ञ ऑटो हान याच्या बरोबर काम केले. भौतिकशास्त्रज्ञ लिझ मेईट्नर आणि रसायनशास्त्रज्ञ ऑटो हान अशी अद्वितीय जोडगोळी बनली. दोघांनीं संयुक्त रीत्या अनेक समस्थानिके - आयसोटोप्स - शोधून काढले. १९०९ मध्ये तिने बीटा किरणोत्सर्गावर दोन प्रबंध सादर केले.

१९१२ मध्ये हान-मेईट्नर ही संशोधक जोडगोळी बर्लिनमध्ये नवीनच स्थापन झालेल्या कैसर विल्हेम इन्स्टिट्यूट म्हणजेच केडब्लूआय या नैऋत्य बर्लिनमधल्या डाह् लेम इथें स्थलांतरित झाली. हानच्या किरणोत्सर्गी रसायनांच्या विभागात तिनें पाहुणी शास्त्रज्ञ म्हणून बिनपगारी काम केले. म्हणजे दुर्दैवाचे दशावतार आता सुरु झाले होते. वयाची पस्तिशी गांठली तरी १९१३ मध्ये प्राग इथे सह-प्राध्यापक अर्थात असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करायची संधी येईपर्यंत तिला केडब्लूआय मध्यें मात्र कायमस्वरूपी पद मिळाले नाही.

पहिल्या महायुद्धाच्या पूर्वार्धात तिने परिचारिका म्हणून क्ष-किरण खाते सांभाळले. जर्मनींत देशसेवा केल्याचें तिला काय फळ मिळाले ते पुढे कळेलच. १९१६ मध्ये ती आपलें संशोधनकार्य पुढे चालू करायला बर्लिनला परतली. पण त्यासाठीं तिला प्रचंड आंतरिक संघर्ष करावा लागला. युद्धबळींच्या वेदना आणि यातना पाहून आणि त्यांना तिच्या वैद्यकीय तसेंच मानसिक मदतीची गरज असतांना आपले संशोधनकार्य पुढें चालू ठेवणे तिला लाजिरवाणें वाटले.

१९१७ मध्ये तिने आणि हानने दीर्घकाळ टिकणारा प्रोटॅक्टिनिअम या मूलद्रव्याच्या समस्थानिकाचा शोध लावला. त्या वर्षी कैसर विल्हेम इन्स्टिट्यूट फॉर केमिस्ट्री इथे तिचा भौतिकशास्त्र विभाग तिच्या हवाली करण्यात आला. १९२३ मध्ये तिने ‘ऑगर परिणामा’चीं कारणे शोधून काढली. गंमत म्हणजे त्यानंतर जवळजवळ दोन वर्षांनीं पियरे व्हिक्टर ऑगर या फ्रेंच वैज्ञानिकाने स्वतंत्रपणे शोधून काढला. या ऑगरच्या नावावरून या परिणामाचें ऑगर इफेक्ट असे बारसे झाले. याचें श्रेय लिझला मिळाले नाहीं कारण लिझला हा शोध वेगळे शोधकार्य करतांना अचानक योगायोगाने लागला. ऑगरचे संशोधन मात्र याच शोधाच्या दिशेने केलेले होते.

१९३० मध्ये मेईट्नरने प्रख्यात शास्त्रज्ञ लीओ शिलार्ड याच्या साथीने एका परिषदेत आण्विक भौतिकशास्त्र आणि आण्विक रसायनशास्त्राचे धडे दिले. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना अणुबॉंब बनवण्याबद्दल विनवणी करणारे पत्र लिहिणारा आणि एनरिको फर्मीच्या साथीने अणूभट्टीचे पेटंट घेणारा विख्यात शास्त्रज्ञ तो हाच शिलार्ड. १९३० मध्ये न्यूट्रॉनच्या शोधानंतर ९२ अणुक्रमांकाच्या यूरॅनियमपेक्षा जड मूलद्रव्य प्रयोगशाळेत बनविणें शक्य असल्याचें वर्तवले जाऊ लागले. आणि ब्रिटनमधला अर्नेस्ट रदरफर्ड, फ्रान्समधील आयरीन जोलिओत क्यूरी (मेरी आणि पीअरे क्यूरीची मुलगी), इटलीमधील एनरिको फर्मी आणि बर्लिनमधली मेईट्नर-हान जोडगोळी यांच्यात एक वैज्ञानिक शर्यत लागली. त्या काळी सर्व संबंधितांचा असा ग्रह झाला होता की संभाव्य नोबेल पारितोषिकाच्या आशेनें एका अमूर्त संशोधनाच्या दिशेने हा सर्व प्रवास सुरूं आहे. या संशोधनाचे पर्यवसान अण्वस्त्रात होईल अशी शंकाहि कोणाच्या मनात आली नव्हती.

१९३३ मध्ये ऍडॉल्फ हिटलर सत्तेवर आला तेव्हा मेईट्नर रसायन संस्थेची कार्यकारी संचालिका होती. पण जरी तिला तिच्या ऑस्ट्रियन नागरिकत्त्वाचे संशोधकांचे संरक्षण होते तरी फ्रीट्झ हेबर, लीओ शिलार्ड तसेंच तिचा भाचा ऑटो फ्रीश आणि अनेक ज्यू मान्यवरांना एकतर घालवून तरी दिले किंवा त्यांचे राजीनामे तरी घेतले. त्यांपैकीं बहुतेक जर्मनीतून पळाले. या काळात तिला अतिशय अपमानास्पद वागणूक मिळत असे. तिच्यासोबत चालणार्‍या तिच्या दुय्यम सहायकांना देखील इमारतींतील कॉरिडॉरमध्ये समोरून येणारे लोक गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून अशा अर्थाचे जर्मन भाषेंतले अभिवादन करीत पण तिच्याकडे पाहातही नसत वा तिच्या आरपार पाहात तिच्या अस्तित्त्वाची दखलही घेत नसत. ठायी ठायी असा अपमान होऊनही लिझने स्वतःला कामात गाडून घेतले. कारण एकच. आपल्या विषयातील संशोधनाबद्दल अतीव ओढ. ताबडतोब जर्मनीतून बाहेर पडले नाहीं हा केवळ मूर्खपणच नव्हता तर ही घोडचूकच होती अशी प्रांजळ कबुली तिने नंतर १९४६ मध्ये दिली.

ऑस्ट्रिया जर्मनीला जोडल्यानंतर मात्र पाणी गळ्याशी आलें. जुलै १९३८ मध्ये ती डच भौतिकशास्त्रज्ञ डर्क कोस्टर आणि ऍड्रियन फोकर यांच्या मदतीने नेदरलॅंड्सला पळाली. डच सीमेवर तिला छुप्या रीतीने जावे लागले. तिला नेदरलॅंड्सला जाण्याची परवानगी आहे असे सांगून जर्मन इमिग्रेशन अधिकार्‍यांची कोस्टरनें मनधरणी केली तेव्हा ती नेदरलॅंड्समध्ये सुरक्षित पोहोंचली खरी पण काहींही चीजवस्तु न घेता, केवळ अंगावरल्या कपड्यानिशीं. ती लिहिते कीं तिने जर्मनी सोडली ती पर्समध्यें केवळ दहा मार्क्स घेऊन. निघतांना ऑटो हाननें तिला त्याच्या आईकडून त्याला मिळालेली हिर्‍याची अंगठी दिली. जरूर पडली तर सीमेवरच्या पहारेकर्‍याला लाच म्हणून द्यायसाठी. पण तशी जरूर पडली नाही आणि नंतर तिच्या भाच्याच्या बायकोने ती वापरली. हानच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन विलक्षण पैलूचे इथें दर्शन होते. संकटांतल्या सहकार्‍याला अशी मदत करण्यामागचा अपार जिव्हाळा आणि मदत करतांना घेतलेली पुरावा मागे न ठेवण्याबाबत घेतलेली कांटेकोर दक्षता. शास्त्रज्ञ हे सहसा बावळट आणि अजागळ असतात आणि त्यांना व्यवहारांतील एवढे बारकावे ठाऊक नसतात तसेच निकटच्या सुहृदांना ते प्रेम देऊं शकत नाहीत असा प्रवाद आहे, पण या प्रवादाला छेद देणारी ही गोष्ट आहे.

पलायनात मेईट्नर यशस्वी झाली ते तिचें नशीबच. कुर्ट हेस नावाचा एक अतिउत्साही नाझी रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने मेईट्नर पलायन करणार असल्याची खबर संबंधित अधिकार्‍यांना दिली होती. परंतु ती सुखरूप पोहोचल्याचे कळल्यावरच काही अज्ञात मित्रांनीं तपासाचीं चक्रे फिरवलीं. ग्रॉनिंजेन विद्यापीठातील नेमणूक कांही फलद्रूप झाली नाही. त्याऐवजीं ती स्टॉकहोमला गेली. तिथे तिला मॅन सीग्बान्स प्रयोगशाळेंत पद मिळाले. तिथे स्त्रियांबद्दल आकस असल्यामुळे उद्भवणार्‍या अडचणी असूनही. इथे तिला प्रयोगशाळा मिळाली पण तांत्रिक साहाय्य करायला एकही शास्त्रज्ञ मिळाला नाही. एवढेच काय प्रयोगशाळेच्या चाव्याहि दुसर्‍याच कोणाकडे तरी असत आणि म्हणून ती चावीवाली व्यक्ती असल्याशिवाय ती प्रयोगशाळेंत जाऊपण शकत नसे. मात्र इथे नील्स बोहर (किंवा बोर)बरोबर तिचे व्यावसायिक नाते जुळल. बोहर तेव्हां कोपनहेगन ते स्टोकहोम अशा फेर्‍या नेमानें मारीत असे. हान आणि इतर जर्मन वैज्ञानिकांशी लिझ मेईट्नरचा पत्रव्यवहार सुरूं राहिला.

हान आणि मेईट्नर कोपनहेगन इथें छुप्या रीतीनें भेटत असत. प्रयोगांच्या नवीन फेर्‍यांची आखणी करायला. त्यानंतरही त्यांचा बराच पत्रव्यवहार झाला. हाननें नंतर तिच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्ट्रॉसमनला साथीला घेऊन कोपनहेगमध्यें काही अवघड प्रयोग केले. त्यांतून रेडियम हा धातू उत्पन्न झाला असे त्याला वाटले. पण प्रत्यक्षांत तो धातू होता बेरियम. मेईट्नरच्या स्थलांतरामुळे एक मात्र झाले. अणुविभाजनाचे अभिलेख बर्लिनच्या प्रयोगशाळेपासून दूर गेले आणि त्यामुळे बर्लिन उद्ध्वस्त होतांना नष्ट होण्यापासून वाचले. हान-मेईट्नर पत्रव्यवहारावरून असे दिसतें की बेरियमच्या निर्मितीचे कारण हे एकमेव आणि केवळ अणुभंजनच आहे हे हानने ओळखले होते. परंतु आपल्याच या लक्षणीय निष्कर्षाच्या धक्क्यानें त्याने कच खाल्ली आणि त्याने तसे मेईटनरला कळवले. न्यूट्रॉन्सच्या भडिमारामुळे युरेनियमचा अणुगर्भ भंग पावण्याची शक्यता बरीच वर्षे अगोदर वर्तवण्यात आली होती. खास करून आयडा नोडॅक हिनें १९३४ सालीं. परंतु अणुगर्भाचे तेव्हा प्रचलित असलेलें ‘लिक्विड ड्रॉप’ हें नील्स बोहरचे मॉडेल वापरून.

अणुगर्भाचे लहानलहान तुकडे कसे करता येतील याचा सिद्धांत शब्दबद्ध करण्यात मेईट्नर आणि फ्रीश हे प्रथमच यशस्वी झाले. युरेनियमच्या अणुगर्भाचे तुकडे होऊन त्यापासून बेरियम आणि क्रिप्टॉन या द्रव्यांचे अणुगर्भ निर्माण झाले होते, सोबतच अनेक न्यूट्रॉन्स आणि प्रचंड ऊर्जा मुक्त झाली होती. न्यूट्रॉन्स आणि ऊर्जा कुठून तयार झालीं? याचें कारण होतें यूरेनियमच्या अणुगर्भाच्या मूळ वस्तुमानात झालेली घट. नवीन तयार झालेल्या बेरियम व क्रिप्टॉन यांचे एकूण वस्तुमान हे युरेनियमच्या मूळ वस्तुमानाएवढे असायला हवे. पण प्रत्य्क्ष प्रयोगात मात्र ते कमी भरले. मग या कमी झालेल्या वस्तुमानाचे होते काय? एक कारण होते युरेनियमच्या अणुगर्भातून बाहेर पडलेले न्यूट्रॉन्स. त्या बाहेर पडलेल्या न्यूट्रॉन्सचें वजन विचारात घेतले तरीही अजून तूट शिल्लक होतीच. का बरे? प्रोटॉन्सचेच वजन कमी झाले होते का? की इलेक्ट्रॉन्सचे? त्या वजनातल्या तुटीतूनच तर ही बाहेर पडलेली ऊर्जा निर्माण झाली होती. मेईट्नरच्या हेही लक्षात आले होते की अणू नाश पावतांना जी प्रचंड ऊर्जा मुक्त होते त्याचेच ‘कमी झालेल्या वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर होतें’ हें स्पष्टीकरण आईनस्टाईनच्या E=MC2 या सूत्रातून मिळते. तिने आणि फ्रीशने युरेनियममध्ये जेवढे प्रोटॉन असतात त्यापेक्षा जास्त प्रोटॉन असलेली मूलद्रव्ये निसर्गतः का आढळत नाहीत याचे मर्म आता जाणले होते. इतक्या संख्येनें असलेल्या प्रोटॉन्समध्ये आपापसांत असलेले विद्युत अपकर्षण हें तीव्र अणुगर्भीय बलावर मात करते हेच ते मर्म.

नील्स बोहर एका पत्रांत टिप्पणी करतो की त्याने प्रयोगात युरेनियम अणूंवर भडिमार केल्यानंतर जेवढी ऊर्जा मुक्त झाली ती ऊर्जा ही भंजनशील नसलेल्या अणुगर्भावर आधारित गणित केले तर जेवढी भरेल त्यापेक्षा फारच प्रचंड प्रमाणात होती. त्यातून डिसेंबर १९३८ मध्ये वरील मीमांसेला स्फूर्ती मिळाली. १९३८ मध्ये हे सर्व हानच्या साथीने प्रसिद्ध करणे तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे अशक्य होते. १९३८ मध्ये हान आणि फ्रीट्झ स्ट्रॉसमन या दोघांनी आपल्या प्रबंधाचें हस्तलिखित ‘नेचरविसेन्सकाफटेन’ कडे प्रसिद्धीसाठीं पाठवले. या प्रबंधात त्यांनी न्यूट्रॉन्सचा भडिमार केल्यावर युरेनियमपासून बेरियम सांपडल्याचे लिहिलेले होते. त्याचबरोबर त्यांनी हेच मेईट्नरलाही पत्राद्वारे कळवले होते. १९३९ साली हा प्रबंध प्रसिद्ध झाला व या प्रबंधाबद्दलच हानला नोबेल पारितोषिक मिळाले. या पारितोषिकातून मेईट्नरला वगळणे ही एक nobel mistake अर्थात उदात्त चूक समजली जाते. मेईट्नर आणि तिचा भाचा ऑटो रॉबर्ट फ्रीश याने या प्रयोगाचें अचूक भौतिकशात्रीय विश्लेषण करून ‘हेच तर अणुभंजन आहे’ असा अर्थ लावला. १३ जानेवारी १९३९ रोजी फ्रीशने हे प्रयोगाने सिद्ध देखील केले.

साखळी प्रक्रियेने यात अफाट स्फोटक शक्ती असल्याचे मेईट्नरने ओळखले. या अहवालाने शास्त्रीय जगतात एकच खळबळ माजली. कारण याचा अस्त्र म्हणून वापर होऊ शकतो. आणि हे ज्ञान जर्मनांच्या हातात असल्यामुळे लीओ शिलार्ड, एडवर्ड टेलर आणि युजीन विग्नर हे मूळचे हंगेरियन ज्यू पण आतां अमेरिकन बनलेले शास्त्रज आतां जोमाने कामाला लागले. ते आतांपावेतो उत्सवमूर्ती बनलेल्या आल्बर्ट आईनस्टाईनच्या मागे लागले. त्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलीन रूझवेल्ट यांना या संभाव्य जर्मन अण्वस्त्राच्या धोक्याची जाणीव करून देणारे पत्र लिहावे म्हणून. परिणामी काही वर्षांनी मॅनहॅटन प्रकल्प उभा राहिला. लॉस अलामॉस येथील प्रकल्पात काम करायची संधी तिने नाकारली. कोणत्याही बॉंबसाठी मी काहीही करणार नाही असें ठासून सागून. तिची तत्वनिष्ठा केवढी जाज्ज्वल्य आहे पाहा. हिरोशिमा हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्काच आहे आणि बॉंबची निर्मिती झाल्याबद्दल मला अत्यंत खेद होत आहे असे उद्गार नंतर तिने काढले.

मेईटनर प्रथम स्वीडनमधल्या सिग्बाहनच्या नोबेल इन्स्टिटयूट फॉर फिजिक्स मध्ये काम करीत होती. स्वीडनमधील संरक्षण संशोधन खात्यात आणि स्टॉकहोममधील शाही तंत्र निकेतनात. तिथे तिच्याकडे प्रयोगशाळा होती आणि तिने आर-१ या स्वीडनच्या पहिल्या अणुभट्टीच्या संशोधनकार्यात भाग घेतला होता. १९४७ मध्यें स्कॉटलंड विद्यापीठाच्या महाविद्यालयांत व्यक्तिशः तिच्यासाठीं एक खास पद निर्माण केले गेले. प्राध्यापकाएवढ्या वेतनावर आणि यासाठी निधी उपलब्ध केला होता अणुशक्ती संशोधन मंडळाने.

१९४४ मध्ये हानला अणुभंजन प्रक्रिया शोधून काढल्याबद्दल रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. बर्‍याच इतिहासकारांना त्याच्या जोडीनें याच शोधाबद्दल मेईट्नरलाही हे पारितोषिक मिळायला हवे होते असे वाटते. आईनस्टाईनला तिच्याबद्दल फार आदर वाटत असे आणि तो तिला ‘आमची मेरी क्यूरी’ असें आदराने म्हणत असे. पण आता मात्र वयाच्या ६८ व्या वर्षी तिला थोडे बरे दिवस आले. १९४६ सालीं अमेरिकेच्या दौर्‍यावर असतांना नॅशनल प्रेस क्लबमधील राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन आणि इतर मान्यवरांसमवेत झालेल्या मेजवानींत तिला ‘वुमन ऑफ द ईयर’ हा बहुमान दिला गेला. जर्मनीत परतायला मात्र तिने नकार दिला. सन १९६६ मधेयं हान, फ्रीट्झ स्ट्रॉसमन आणि मेईट्नर या तिघांना एनरिको फर्मी पारितोषिक मिळाले. हे पारितोषिक नोबेल पारितोषिकाच्या तोडीचे समजले जाते.  १९४९ मध्ये जर्मन भौतिकी मंडळाने दिलेले मॅक्स प्लांक पदक तिला मिळाले. तीन वेळा तिचे नांव नोबेल पारितोषिकासाठी सुचवले गेले, हा एक दुर्मिळ बहुमानच समजला जातो. परंतु त्यापेक्षाही मोठा आणि एक अजोड बहुमान तिला लाभला. १०९ क्रमांकाच्या मूलद्रव्याला मेईट्नेरिअम हें नाव दिले गेले. १९४५ मध्ये स्वीडिश शाही विज्ञान अकादमीची परदेशी सदस्या म्हणून तिचा सन्मान करण्यात आला. १९५१ मध्ये या सदस्यत्वात ‘परदेशी’ ऐवजी ‘स्वीडिश’ सदस्या असा बदल झाला. ऐंशीचे दशक उलटायला आले तरी स्टॉकहोममधे राहून संशोधन करण्यातला आणि सेवानिवृत्त आयुष्याचा उपभोग घेण्यातला आनंद उपभोगणे तिने पसंत केले. १९३३ ते १९३८ या काळात जर्मनी न सोडण्यांत आपली नैतिक चूक झाली असे तिने कबूल केले. पण हान आणि इतर जर्मन शास्त्रज्ञांबद्दल ती नाझींना सहकार्य दिल्याबद्दल आणि वेर्नर हायझेनबर्गबद्दल हिटलरशाहीविरुद्ध ब्र देखील न काढण्याच्या भूमिकेबद्दल ती फार कडवटपणे बोलते. "हायझेनबर्ग आणि तशाच कोट्यावधींना या छळछावण्या आणि तिथले दुर्दैवी बळीं जबरदस्तीने बघायला लावले पाहिजेत" असे तिने म्हटले आहे. हानला लिहिलेल्या एका पत्रात ती लिहिते,

"तुम्ही सर्वांनी नाझींसाठी काम केले. आणि तुम्ही त्यांना विरोध करायचा प्रयत्न केवळ नावापुरताच केला. आपला सदसद्विवेक कुठेतरी विकायचा म्हणून तुम्ही स्वतःवरच जुलूम करून घेतलात परंतु निषेधाचा एकही शब्द उच्चारला गेल्याशिवाय लाखो लोकांचे शिरकाण झाले ...(असे म्हटले जाते की) तुम्हीं तुमच्या मित्रांचा विश्वासघात केलात, नंतर तुम्ही तुमच्या मुलांचे प्राण या एका महापातकी युद्धात पणाला लावले - आणि शेवटी तुम्ही खुद्द जर्मनीचाही विश्वासघात केलात, कारण युद्ध जिंकायच्या आशा नष्ट झाल्यावरही जर्मनीचा निष्कारण होणारा सर्वनाश टाळायसाठीं देखील एकदाही हातात शस्त्र धरले नाही."

मेईट्नर आणि हान यांची मैत्री मरेपर्यंत टिकली. 
मेईट्नर जन्मानें ज्यू होती. बेल्सेन आणि बुचेनवाल्डमध्ये राहिलेल्या ज्यूंचे पुढें काय होत आहे हे तिला रेडिओवर कळत होते. छळछावण्यांबद्दल कळल्यावर तिची झोंप पार उडाली आणि तिला भयंकर स्वप्ने पडायला सुरुवात झाली. अपार औदासीन्यामुळें तिला रडे अनावर होत असे व रडता रडता ती बेशुद्धही होत असे. ‘मो बर्ग’ हा अमेरिकन ज्यू बेसबॉलपटु १९४१ मधल्या पर्ल हार्बर हल्ल्यानंतर सी आय ए मध्यें दाखल झाला होता व युरोपमध्ये, खासकरून भौतिकशास्त्रज्ञ आणि अणुगर्भशास्त्रज्ञांमध्ये जर्मनीविरोधी लोकमत तयार करणारा कार्यकर्ता होता. या मो बर्गकडे ती दीर्घकाळ आपले मन मोकळे करीत असे.

१९४९ मध्ये मेईट्नर स्वीडिश नागरिक बनली. १९६० मध्यें ती इंग्लंडमध्ये गेली आणि आपली नव्वदी गाठायला थोडेच दिवस असतांना २७ ऑक्टोबर १९६८ रोजी केंब्रिजमध्यें मरण पावली. हॅंपशायरलधील ब्रॅमले गावांतील सेंट पॅरिश चर्चमध्यें वॉल्टर या तिच्या १९६४ सालीं वारलेल्या धाकट्या भावाच्या शेजारीच तिचें दफन झाले. ऑटो रॉबर्ट फ्रीशनें तिच्या दफनशिलेवर ‘लिझ मेईट्नर, जी कधीही माणुसकी विसरली नाहीं’ अशा अर्थाची अक्षरे कोरली.

 
- X – X – X -

Tuesday, April 22, 2014

असे वैज्ञानिक असे विज्ञान - ४ जनुकशास्त्र

जनुकशास्त्र

खरे तर जनुकशास्त्र या विज्ञानाला मराठीत काय म्हणावे असा मला प्रश्न पडला होता. सूक्ष्मदर्शकाचा वापर वैज्ञानिक करू लागल्यावर सूक्ष्मजीवविज्ञानाचे एक दालनच उघडले. त्याचबरोबर वनस्पतींच्या, प्राण्यांच्या शरीरातील पेशींचा अभ्यासही सुरू झाला. अनुभवाच्या आधारावर जीवांचे गुणदोष, काही रोग अनुवंशिकतेच्या तत्वानुसार पुढील पिढीत उतरतात हे मानवाला ठाऊक झाले होते. संकर करून दोन जातीतील चांगले गुण एकत्र आणून नवीन उत्कृष्ट सजीवांची पैदास केली जात असे. जास्त तगडे, जास्त चपळ घोडे, चवीला जास्त चांगली, रोगप्रतिकारक, हेक्टरी जास्त उत्पन्न देणारी धान्ये, वगैरे जीवांची पैदास केली जात होती. पण गुणधर्मांचे हे स्थलांतर, हे गुणरोपण कसे घडून येते याचे कुतूहल मात्र वैज्ञानिकांना स्वस्थ बसू देत नव्हते. याचा शोध आजही घेतला जात आहे.

अपत्याकडे अनुवंशिक गुण वाहून नेणार्‍या सूक्ष्मघटकाला चार्ल्स डार्विनने जेम्यूल - Gemmule – असे नाव दिले. पुढे १८४८ मध्ये विल्हेम हॉफमेईस्टर Wilhelm Friedrich Benedikt Hofmeister (18 May 1824 – 12 January 1877) 

विल्हेम हॉफमेईस्टर
या जर्मन वनस्पतीशास्त्रज्ञाने पेशीविभाजन होतांना हा घटक मूळ पेशीपासून वेगळा होतांना सूक्ष्मदर्शकातून पाहिला आणि त्याला नाव दिले रंगसूत्र. ग्रीक शब्द क्रोमा याचा अर्थ रंग असा आहे तर सोमा याचा अर्थ शरीर असा आहे. म्हणजे रंगीत शरीर असलेला तो क्रोमोसोम.

ग्रेगॉर मेंडेलच्या (१८२२ ते १८६४) ध्यानात आले की जन्मदात्यांकडून जैविक गुणधर्म अपत्याकडे जातात. 
 ग्रेगॉर मेंडेल
१८६० साली वाटाण्यावर संशोधन करतांना त्याच्या हे लक्षात आले. गुणधर्म वाहून नेणार्‍या घटकाला त्याने १८६६ मध्ये ‘जीन’ असे नाव दिले. असे जरी असले तरी याचे जीवशास्त्रीय गूढ मात्र १९४० मध्ये पेशीकेंद्रकाम्लाचा – डीएनए - शोध लागेपर्यंत कायमच होते.

१८६९ मध्ये फ्रेडरिक मायश्चर (१८४४ – १८९५) Friedrich Miescher याने प्राणिज पेशीकेंद्रकातील फॉस्फरसयुक्त रसायनाला न्यूक्लेईक म्हणजे पेशीकेंद्रकीय असे म्हटले. 


फ्रेडरिक मायश्चर
हे रसायन आम्लधर्मी आढळल्याने त्याला नंतर न्यूक्लेईक ऍसिड म्हणजे पेशीकेंद्रकाम्ल असे म्हटले गेले.

फेलिक्स होप सेलर (१८२५ – १८९५) (Felix Hoppe Seyler) याने वनस्पतिज पेशीकेंद्रकाम्ल वेगळे करून 

फेलिक्स होप सेयलर
दाखवले. 


त्या काळात दळणवळणाची साधने फारशी नसल्यामुळे एके ठिकाणी काय घडते हे दुसर्‍या ठिकाणी कळेपर्यंत बराच काळ जायचा. डार्विनने १८६८ मध्ये पॅनजेनिसिस ही संज्ञा वापरली. पॅन या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण किंवा अखिल असा तर जेनिसिस हा शब्द ग्रीक शब्द जीनॉस म्हणजे उगम किंवा जन्म यावरून आला. पॅनजेनिसीस या शब्दाचा आपण पूर्णजन्म असा काहीसा शब्दशः अर्थ काढू शकतो.

१८८९ मध्ये आपल्या ‘इंट्रॅसेल्यूलर पॅनजेनिसीस’ या पुस्तकात ह्युगो डी’व्हराईज सूक्ष्म गुणकणास  पॅनजेन असे म्हणतो.  

ग्रेगॉर मेंडेलचा सिद्धांत ठाऊक नसलेल्या ह्युगो डी’व्हराईज, कार्ल कॉरेन्स आणि एरिक व्हॉन त्शेमार्क या तिघांनी १९०० मध्ये आपल्या स्वतंत्र संशोधनातून देखील ‘जन्मदात्यांकडून जैविक गुणधर्म अपत्याकडे जातात’ असाच निष्कर्ष काढला. परंतु हे गुणघटक पेशीमध्ये नक्की कुठे असतात हे मात्र या तिघांना ठाऊक नव्हते.

१९०५ मध्ये विल्यम बेटसन या ब्रिटीश शास्त्रज्ञाने जेनिटीक्स या शब्दाचा प्रथम वापर केला. 

विल्यम बेटसन
तरी रंगसूत्रे आणि गुणसूत्रे यांचे नक्की कार्य काय, ते कसे चालते अशी अनेक कोडी अनुत्तरित होती.

विल्हेम रूक्स याने सुचवले की प्रत्येक रंगसूत्रावर वेगळी माहिती नोंदलेली असते तसेच प्रत्येक रंगसूत्र एकमेवाद्वितीय असे असते. थिओडोर बोव्हेरी याने गुणधर्माचे वाहक हे रंगसूत्रांद्वारे म्हणजे क्रोमोसोमद्वारे होते हे दाखवून दिले. या सगळ्या गोष्टी, अनुवंशिकता आणि रंगसूत्रांचे कार्य यातील परस्परसंबंध बोव्हेरीने सप्रयोग सिद्ध करून उलगडून दाखवल्या. वॉल्टर सटन आणि बोव्हेरी यांनी पुढे एका ग्रंथातून ‘अनुवंशिकतेचा रंगसूत्र सिद्धांत’ मांडला.


थिओडोर बोव्हेरी आणि वॉल्टर सटन

 डॅनिश शास्त्रज्ञ विल्हेम योहान्सेन Wilhelm Johannsen याने १९०९ मध्ये पायाभूत कायिक कार्यकारी गुणघटकास गुणसूत्र - जीन असे नाव दिले.

विल्हेम योहान्सेन
 ग्रेगॉर मेंडेलच्या कार्याने प्रेरित होऊन या विषयात संशोधन करणार्‍या थॉमस हंट मॉर्गन (१८८६ – १९४५) याने 
थॉमस हंट मॉर्गन

१९१० मध्ये शोधून काढले की गुणसूत्रे –  जीन्स ही रंगसूत्रांवर - क्रोमोसोमवर असतात. या संशोधनाबद्दल मॉर्गनला ‘नोबेल’ मिळाले.

१९२८ मध्ये ग्रिफीथ प्रयोगाद्वारे फ्रेड्रीक ग्रिफीथ याने उष्णता देऊन मारलेल्या प्राणघातक जिवाणूमधील जीन्स उंदराच्या शरीरातल्या त्याच प्रकारच्या जिवंत जिवाणूत संक्रमित/आरोपण करून दाखवले आणि दाखवून दिले की जीन संक्रमित करता किंवा एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेता येतात तसेच जीन्सचे दुसर्‍या पेशीत आरोपण देखील करता येते.

गुणसूत्रात बदल झाले तर नवीन निर्माण होणार्‍या सजीवात विकृती किंवा उत्परिवर्तन घडून येते असे हरमान जे. मुल्लरने (१८९० – १९६७) शोधून काढले. त्याबद्दल १९४६ चे नोबेल त्याला प्राप्त झाले.

फेलिक्स होप सेलरचा एक विद्यार्थी आल्ब्रेख्त कोसेल (१८५३ – १९२५) याने पेशीकेंद्रकाम्लाची रचना शोधायचा श्रीगणेशा केला. त्याने यात ऍडेनाईन = A, सायटोसीन = C, गुआनीन किंवा ग्वानीन = G, आणि थायामाईन = T, (हे थायामाईन म्हणजेच ब-१ जीवनसत्त्व) ही प्रथिने पेशीकेंद्रकाम्लातून वेगळी केली. त्याबद्दल त्याला १९१० सालचे वैद्यक आणि शरीरशास्त्राचे ‘नोबेल’ मिळाले.

आता प्राथमिक घटकद्रव्ये सापडली. पण ती एकमेकांना कशी जोडली गेली आहेत किंवा पेशीकेंद्रकाम्लाची संपूर्ण रचना कशी आहे, ती पुराव्यासह कशी शोधून काढायची, सजीवाच्या गुणधर्मांत त्यांचा सहभाग काय आणि तो का व कसा वगैरे असंख्य प्रश्नांनी डोकी वर काढली. मानवी मनाची खुबी ही की प्रश्न दिसला की त्याचे उत्तर शोधायचे कुतूहल जास्त उभारीने डोके काढते. मग जीवशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, सर्वांनी आपापली शस्त्रे परजून पेशीकेंद्रकाम्लाच्या दिशेने रोखली. त्यातूनच मग विज्ञानाच्या जीवरसायन, जैवभौतीकी वगैरे नवनवीन शाखा निर्माण झाल्या आणि विकास पावल्या. पुढे काय झाले हे पाहाण्यापूर्वी विज्ञानाच्या इतर क्षेत्रातही जरा डोकावून पाहूयात.



- X – X – X –
  

असे वैज्ञानिक असे विज्ञान - 3 सर जगदीशचंद्र बसू

सर जगदीशचंद्र बसू
सर जगदीशचंद्र बसू. त्यांच्या मातृभाषेतील म्हणजे बंगाली उच्चार सर जॉगदीशचॉंद्र बॉशू. जन्म ३० नोव्हेंबर १८५८. एक चतुरस्त्र वैज्ञानिक. भौतिकशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, जैवभौतिकी शास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ आणि पुरातत्वज्ञ. सुरुवातीच्या थोडक्या विज्ञानसाहित्यिकांपैकीं एक. रेडिओ आणि सूक्ष्मलहरी प्रकाशविज्ञान - मायक्रोवेव्ह ऑप्टीक्स यांतील संशोधनाचा वस्तुपाठ त्यांनी घातला. वनस्पतीशास्त्रात त्यांनी मोलाची भर घातली. भारतीय उपखंडात प्रायोगिक विज्ञानाचा पायाच त्यांनी घातला. रेडिओ विज्ञानाचे जनकत्त्व ज्या काही मोजक्या शास्त्रज्ञांकडे जातें, त्यांपैकी एक. बंगाली विज्ञानसाहित्याचे जनक असलेले साहित्यिक आणि अमेरिकन हक्क - पेटंट मिळवणारी भारतीय उपखंडातील पहिली व्यक्ती अशी त्यांची थोडक्यात पण चतुरस्त्र अशी ओळख करून देता येईल.   

 भारतावर ब्रिटिशांचे राज्य असताना बंगालमधील मुन्शीगंज जिल्ह्यांत त्यांचा जन्म झाला. मुन्शीगंज जिल्ह्यांतील रारीखाल, बिक्रमपूर हें त्यांचे मूळ गाव. सध्या हा मुन्शीगंज जिल्हा बांगला देशात आहे. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू यांनी ब्राम्हो समाजाचा स्वीकार केला होता आणि ते फरीदपूर येथे उपदंडाधिकारी (डेप्युटी मॅजिस्ट्रेट) तसेच सहायक आयुक्त (असिस्टंट कमिशनर) म्हणून कार्यरत होते. इंग्रजी शिक्षण घेण्याअगोदर आपल्याला आपल्या मातृभाषेची तसेच स्वकीयांची ओळख असली पाहिजे असें भगवानचंद्रांचे मत होतें त्यामुळे त्यांनी छोट्या जगदीशचंद्रला प्रथम बंगाली माध्यमाच्या शाळेत घातले. १९१५ सालीं बिक्रमपूर येथील एका परिषदेत जगदीशचंद्र म्हणाले होते, "त्या काळी मुलांना इंग्रजी शाळेत पाठवणे हे उच्चभ्रू लोकांत एक प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाई. मीं जात असलेल्या देशी शाळेत माझ्या उजव्या बाजूला माझ्या वडिलांच्या मुस्लिम चपराशाचा मुलगा बसत असे तर डाव्या बाजूला एका कोळ्याचा मुलगा. हे दोघे माझे खेळगडी होते. त्यांच्या तोंडून पशुपक्ष्यांच्या आणि जलचरांच्या गोष्टी ऐकतांना मीं मंत्रमुग्ध होऊन जात असे. कदाचित त्या गोष्टींमुळेच माझ्या मनांत निसर्गाच्या किमयेबद्दल तीव्र जिज्ञासा निर्माण झाली असावी. माझ्या या सवंगड्यांसमवेत घरी आल्यावर माझी आई आम्हांला कोणताहि पंक्तिप्रपंच न करता खाऊ घालत असे. जरी ती एक सनातनी कर्मठ स्त्री असली तरी या अस्पृश्यांना आपल्या मुलासारखीच वागणूक देतांना तिच्यामनात कधीच अपराधी भावना दाटली नाही. त्यांच्याशी असलेल्या माझ्या मित्रत्त्वाच्या नात्यामुळेच मला ‘खालच्या जातीतले’ म्हणतां येतील असे प्राणी कुठे असू शकतील असें कधीही वाटले नाही. हिंदू आणि मुस्लिम या दोन्हीं समाजांना अशी एकच ‘समस्या’ भेडसावू शकेल हे मला कधी समजलेच नाही." एक शास्त्रज्ञ म्हणून जगदीशचंद्र तर श्रेष्ठ होतेच, पण एक व्यक्ती म्हणून ते किती श्रेष्ठ होते ते यावरून कळते.

१८६९ सालीं ते हेअर (Hare) शाळेत गेले आणि १८७५ कलकत्ता विद्यापीठाची पदवीच्या दर्जाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन सेंट झेवियर महाविद्यालयांत प्रवेश घेतला. इथे त्यांची फादर युजीन लफॉंट यांच्याशी ओळख झाली. त्यांच्यामुळेच त्यांना निसर्गविज्ञानाची गोडी लागली. १८७९ मध्यें त्यांनी पदवी मिळवली. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी त्यांनी लंडन विद्यापीठांत प्रवेश घेतला खरा पण प्रकृती बिघडल्यामुळें पूर्ण करू शकले नाहीत. मग ते भारतात परत आले आणि कलकत्ता विद्यापीठातील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये भौतिकविज्ञानाचे अधिव्याख्याते म्हणून ऋजूं झाले. इथें गोर्‍यांचा वंशभेद आणि तुटपुंजा निधी आणि अपुरी साधनसामग्री याचा सामना करीतच आपले संशोधन त्यांनी चालू ठेवले. दूरवर बिनतारी संदेश पाठविण्यात त्यांनी भरघोस प्रगति केली आणि संदेशग्रहणासाठी सर्वप्रथम उभयवाहकाचा - सेमीकंडक्टरचा उपयोग केला. पण केवळ आपल्या या संशोधनाचा इतरांना विकास करतां यावा म्हणून त्यांनी या संशोधनाचे हक्क न घेता ते प्रसिद्ध केले.

जगदीशचंद्रांना खरें तर इंग्लंडला जायचे होते ते आय सी एस होण्यासाठी. परंतु सरकारी अधिकारी असलेल्या त्यांच्या वडिलांनी त्यांचा हा बेत रद्द केला. आपला मुलगा विद्वान व्हावा आणि परक्या ब्रिटिशांची चाकरी न करता स्वतःचा स्वामी व्हावे अशी त्यांची इच्छा होती. मग जगदीशचंद्र वैद्यकीय शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले. पण तिथे ते आजारी पडले. तिथे शवविच्छेदनादरम्यान येणार्‍या तीव्र दर्पानें त्यांचा आजार बळावला असें म्हटले जाते.

त्यांच्या बहिणीचे यजमान आनंद मोहन हे पहिले भारतीय रॅंग्लर होते. जगदीशचंद्रांना केंब्रिजच्या खिस कॉलेजमध्ये निसर्गविज्ञान शिकायला प्रवेश मिळाला तो त्यांच्याच शिफारसीमुळे हे जरी खरे असले तरी त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून (ब्रिटनमध्यें) ट्रायपॉस या नांवानें ओळखली जाणारी पदवी मिळवली आणि १८८४ सालीं लंडन विद्यापीठातून बी एस सी ची पदवी मिळवली. केंब्रिजला त्यांना लॉर्ड रेले, मायकल फॉस्टर, जेम्स डेवर, फ्रॅन्सिस डार्विन (विख्यात निसर्गशास्त्रज्ञ सर चार्ल्स डार्विन यांचे सुपुत्र), फ्रान्सिस बाल्फोर आणि सिडनी व्हाईन्स यांसारखे दिग्गज गुरू लाभले. 

कलकत्त्यातील एशियाटिक सोसायटीत सर जगदीशचंद्रांच्या १५०व्या जयंतीनिमित्त भरलेल्या परिषदेत २८ जुलै रोजी केलेल्या भाषणात कलकत्त्याच्या बोस इन्स्टीट्यूटचे संचालक प्रा. शिबाजी राहा म्हणाले की त्यांनी स्वतः केंब्रिज विद्यापीठाच्या दस्तऐवजांतील नोंद तपासून पाहिली आणि त्यांना आढळले कीं केंब्रिजमधून त्यांना ट्रायपॉसव्यतिरिक्त एम ए ही पदवी देखील १८८४ मध्यें देण्यात आली होती.

१८८५ मध्यें जगदीशचंद्र भारतात परत आले. लॉर्ड रिपन तेव्हां व्हाईसरॉय होता. तेव्हा रिपनचा फॉसेट नावाचा आर्थिक सल्लागार होता. या फॉसेटचें रिपनला लिहिलेलें (शिफारस)पत्र तेव्हां जगदीशचंदांनी सोबत आणले होतें. सर आल्फ्रेड क्रॉफ्ट तेव्हां ‘लोकसूचना संचालक’ (डायरेक्टर ऑफ पब्लीक इन्स्ट्रक्शन) या पदावर होते. रिपनच्या विनंतीवरून त्यांनीं जगदीशचंद्रांची प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये भौतीकशास्त्राचे कार्यकारी प्राध्यापक - ऑफिशिएटिंग प्रोफेसर ऑफ फिजिक्स - या पदावर नियुक्ती केली. या नेमणुकीविरुद्ध कॉलेजचे प्राचार्य सी एच टॉने (C. H. Tawney) यांनी निषेध नोंदवला खरा पण त्यांना ती नेमणूक स्वीकारावीच लागली. स्वतःला पुरोगामी म्हणवणारे ब्रिटीश सामाजिकदृष्ट्या किती मागासलेले होते हे याचा हा आणखी एक ढळढलीत पुरावा.

त्यांना संशोधनाच्या सुविधा तर मिळाल्या नाहीतच वर वेतन ठरवतांना ते वर्णद्वेषाचे बळी ठरले. त्या काळीं गोर्‍या प्राध्यापकांना ३०० रुपये वेतन मिळे पण हिंदुस्थानी प्राध्यापकांना केवळ २०० रुपयेच मिळत. जगदीशचंद्र बोस यांची नेमणूक ही कार्यकारी म्हणजे officiating अर्थात हंगामी वा तात्पुरती म्हणता येईल अशीच असल्यामुळे त्यांना केवळ १०० रुपये देऊ केले. स्वाभिमानाचा आणि देशप्रेमाचा एक आगळाच पैलू दाखवितांना त्यांनी निषेधाचा नवीनच मार्ग पत्करला. त्यांनीं वेतनाचा धनादेश स्वीकारायलाच नकार दिला. तब्बल तीन वर्षे त्यांनीं अध्यापनाचे कार्य विनावेतन केले. शेवटी लोकसूचना संचालक आणि प्राचार्य, दोघांनाही त्यांच्या अध्यापनाच्या कौशल्याचे आणि त्यांच्या उच्च नीतीमत्तेचें महत्त्व कळून चुकले. किंवा हे प्रकरण ब्रिटनपर्यंत गेले तर जड जाईल असे देखील वाटले असेल. त्यांची नेमणूक नोकरीच्या पहिल्या दिवसापासून कायम करण्यांत आली. त्यांना तीन वर्षांचे पूर्ण वेतन एकरकमी देण्यांत आले.

प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये धड प्रयोगशाळाही नव्हती. २४ चौरस फुटांच्या अडगळीच्या जागेंत जगदीशचंद्रांना संशोधन करावे लागले. एका अकुशल लोहाराकडून त्यांनी एक उपकरण घडवून घेतले. भगिनी निवेदिता लिहितात ‘एका थोर शास्त्रज्ञाला अशा तर्‍हेने किरकोळ गैरसोयी आणि सततच्या मनस्तापाला तोंड द्यावे लागतें हे समजल्यावर मला फारच मोठा धक्का बसला. .... आपल्या संशोधनासाठी वेळच मिळणार नाही अशा तर्‍हेने कॉलेजचे वेळापत्रक त्यांना पूर्णपणे अडचणीचे आणि गैरसोयीचे बनवले होते.’ रोजच्या चरकातून सुटल्यावर कॉलेजातील आपल्या खोलीतल्या तुटपुंज्या जागेत रात्रीं उशिरापर्यंत जागून त्यांनीं आपले संशोधन चालू ठेवले.

ब्रिटिश सरकारचें धोरण वसाहतीतील मूलभूत संशोधनाला अनुकूल असे नव्हतेच. कष्टाने मिळविलेला आपला स्वतःचा पैसा जगदीशचंद्र प्रयोगासाठींचीं उपकरणें बनवण्यासाठीं खर्च करीत. अशा रीतीने संशोधनाबद्दलच्या त्यांच्या दुर्दम्य ओढीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. भारतात संशोधनासाठीं अनुकूल असें वातावरण नाही म्हणून आज बुद्धिजीवी वर्ग विकसित देशांत स्थायिक होत आहे. या वर्गाने जगदीशचंद्रांपासून धडा घेणे जरूरीचे आहे. ध्येयवादाला कोणत्याहि मर्यादा नसतात हेच खरे. 

१८८७ मध्यें ब्राम्हो समाजांतील सुप्रसिद्ध समाजसुधारक दुर्गा मोहन दास यांची कन्या अबला हिच्याशी त्यांचा विवाह झाला. ज्यांच्या नावावरून चितगांव हे नाव शहराला दिले ते चित्तरंजन दास तिचे चुलतभाऊ. १८८२ मध्यें मद्रास इथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठीं अबलाला बंगाल सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिला ते वैद्यकीय शिक्षण (नवर्‍याच्या पावलावर पाऊल ठेवून) सोडावे लागले. पतीपत्नी दोघांनीही वैद्यकीय शिक्षण सुरुवात केल्यावर लगेच सोडून द्यावे हा या दांपत्याच्या आयुष्यातील हा एक अजब दुहेरी योगायोग म्हणावा लागेल. त्याही दृष्टीने ३७वा गुण जुळला म्हणायचा. लग्नाच्या वेळी जगदीशचंद्र वेतन न घेण्याच्या भूमिकेमुळे तसेच (हयात असलेल्या) वडिलांनी केलेल्या कर्जामुळे आर्थिक संकटात सापडले होते. नवपरिणीत दांपत्याला टंचाई आणि उपासमारीचा सामना करावा लागला. परंतु त्याही परिस्थितींत त्यांनी तग धरला आणि वडिलांचे कर्ज फेडले. कर्ज फेडल्यानंतरची कांहीं वर्षे त्यांचे आईवडील हयात होते.

जेम्स क्लार्क मॅक्सवेल या ब्रिटिश सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञानें विस्तृत तरंगलांबीच्या विद्युत्चुंबकीय लहरींचे अस्तित्त्व गणिताने सिद्ध केलें होते. परंतु त्यानें गणितानें मांडलेली उपपत्ती प्रयोगानें सिद्ध व्हायच्या अगोदरच सन १८७९ मध्ये तो मरण पावला. ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ ऑलिव्हर लॉज याने मॅक्सवेलनें वर्तवलेल्या लहरी १८८७-८८ साली तारेतून दुसर्‍या ठिकाणीं पाठवल्या. १८८८ साली जर्मन वैज्ञानिक हेनरीक हर्ट्झ याने मोकळ्या अवकाशातील विद्युत्चुंबकीय लहरींचे अस्तित्त्व प्रयोगाने दाखवले. त्यानंतर हर्ट्झचे संशोधन पाहून हर्टझच्या मृत्यूनंतर जून १८९४ मध्ये ऑलिव्हर लॉजने त्याच्या स्मरणार्थ एक भाषण दिले आणि ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध केलें. लॉजच्या संशोधनाने देशोदेशींचे अनेक शास्त्रज्ञ प्रभावित झाले होते. त्यांत जगदीशचंद्रांचाहि समावेश होता.

जगदीशचंद्रांनी केलेल्या सूक्ष्मलहरींच्या संशोधनातील एक महत्त्वाचा भाग असा की त्यांनीं मिलीमीटरमध्यें मोजण्याइतपत सुमारें ५ मीमी पर्यंत कमी तरंगलांबीच्या (वेव्हलेंग्थ) सूक्ष्मलहरीं प्रयोगासाठी वापरल्या. सूक्ष्मलहरींच्या प्रकाशसदृश गुणधर्माचा अभ्यास करतांना जास्त तरंगलांबीमुळे होणार्‍या गैरसोयी त्यांनी जाणल्या होत्या.

सन १८९३ मध्यें निकोला टेस्ला यांनी पहिला रेडिओ संपर्क साधून दाखवला. त्यानंतर जवळजवळ वर्षभरानें नोव्हेंबर १८९४ वा १८९५ मध्ये (नक्की माहिती उपलब्ध नाहीं) जगदीशचंद्रांनी कलकत्त्याच्या टाऊन हॉलमध्यें केलेल्या जाहीर प्रयोगात मिलीमीटर तरंगलांबीच्या विद्युत्चुंबकीय लहरी वापरून दूर अंतरावरील बंदुकीची दारू पेटवली तसेच विजेवर चालणारी घंटाही वाजवून दाखवली. वैज्ञानिक प्रयोगात एवढे नाट्य बहुधा प्रथमच आले असणार. या प्रतिभेने मन थक्क होते. त्यानंतर त्यांनी बंगाली भाषेतून ‘अदृश्य आलोक’ म्हणजे ‘न दिसणारा प्रकाश’ या नावाचा एक निबंध लिहिला. हा अदृश्य प्रकाश विटांच्या भिंतीतून आरपार जाऊ शकत असे. त्यामुळें तारेच्या माध्यमाविना संदेश पाठवणें शक्य होईल असें त्यात प्रतिपादन केलें होतें. रशियात पापॉव्हनेही असेच प्रयोग केले. डिसेंबर १८९५ मध्ये पापॉव्हनें केलेल्या नोंदीवरून दिसते की रेडिओ लहरी वापरून संदेशवहन करता येईल असे त्याला वाटत होते.

लॉजच्या प्रबंधानंतर वर्षभरातच म्हणजे मे १८९५ मध्ये जगदीशचंद्र बसूंनी ‘ऑन पोलरायझेशन ऑफ इलेक्ट्रिक रेज बाय डबल रीफ्रॅक्टिंग क्रिस्टल्स’ हा आपला पहिलावहिला विज्ञानविषयक प्रबंध बंगालच्या एशियाटिक सोसायटीला पाठवला. ऑक्टोबर १८९५ मध्ये लॉर्ड रेले (Rayleigh) यांनी बसूंचा ‘ऑन अ न्यू इलेक्ट्रो-पोलॅरिस्कोप’ हा दुसरा प्रबंध लंडनच्या रॉयल सोसायटीला पाठवला. डिसेंबर १८९५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लंडनच्या द इलेक्ट्रीशियन (खंड ३६) या जर्नलमध्यें हा प्रबंध प्रसिद्ध झाला. त्या सुमारास हर्ट्झने बनवलेल्या तरंगग्राहकाला वा तरंगसंवेदकाला - रेडीओ डिटेक्टरला तमाम इंग्रज भाषिक विश्वात ‘कोहरर’ (coherer) हा लॉजने योजलेला शब्द वापरला जात असे. बसूंच्या ‘कोहरर’वर द इलेक्ट्रीशियनने छान टिप्पणी केली. या टिप्पणीचा वृत्तांत देतांना ‘इंग्लिशमन’ने म्हटले आहे

"प्राध्यापक बोस यांना जर कोहरर पूर्णत्वाला नेऊन त्याचें पेटंट घेणे शक्य झाले तर प्रेसिडेन्सी कॉलेजातील प्रयोगशाळेत एकहाती संशोधन करणार्‍या एका बंगाली वैज्ञानिकाच्या हस्ते अखिल नौकानयन जगतातील समुद्रकिनारे उजळून निघतील."

प्रत्यक्षात बसूंनीं कोहरर पूर्णत्वाला नेण्याचा बेत केला होता पण पेटंट घेण्याचे त्यांच्या कल्पनेतही आलेले नव्हते.

त्यानंतर सुमारे दोन वर्षांनी मे १८९७ मध्यें सॉल्सबरी (Salisbury) मैदानावर मार्कोनीने त्याचा बिनतारी संदेशाचा प्रयोग केला. १८९६ मध्ये बसू लंडनला व्याख्यानाच्या दौर्‍यावर गेले असतांना मार्कोनीला भेटले. तेव्हा मार्कोनी ब्रिटिश टपाल खात्यासाठीं बिनतारी संदेशवहनाचे प्रयोग करीत होता. एका मुलाखतीत बसूंनीं म्हटले होते कीं व्यापारी तत्त्वावरील बिनतारी संदेशवहनात आपल्याला बिलकूल स्वारस्य नाहीं आणि कोणाला हवे असेल तर माझॆ संशोधन कोणीही वापरू शकतो. १८९९ मध्यें बसूंनीं आपण टेलिफोन ग्राहक बसवलेला ‘लोखंड-पारा-लोखंड कोहरर’ विकसित केला असल्याचे लंडनच्या रॉयल सोसायटीला पाठवलेल्या एका प्रबंधांत म्हटले होते.

असें दिसते कीं मार्कोनीअगोदर बसूंनीच दूरस्थ बिनतारी संदेशवहनाचें प्रदर्शन केले होते. रेडिओ लहरी पकडण्यासाठीं (डिटेक्टर बनवण्यासाठीं) बसूंनींच सर्वांत अगोदर उभयवाहकाचा म्हणजेच सेमीकंडक्टरचा वापर केला होता. शिवाय त्यांनी आता सर्वसामान्य वापरात असलेल्या विविध प्रकारच्या सूक्ष्मलहरी देखील शोधून काढल्या होत्या. १९५४ मध्यें पीअर्सन आणि ब्रॅटेन यांनी रेडिओ लहरी संवेदक ग्राहक म्हणून सेमीकंडक्टरचा वापर सर्वप्रथम करण्याचा अग्रमान बसूंनाच दिलेला आहे. सध्या तांत्रिक दृष्ट्या सेमीकन्डक्टर पदार्थ हे अब्जांशतंत्रीय - नॅनोटेक्नॉलॉजिकल समजले जातात. पुढील पन्नास वर्षांत मिलीमीटर सूक्ष्मलहरींवर काहीही संशोधन झाले नाही. १८९७ मध्यें त्यांनीं आपण कलकत्त्यांत मिलीमीटर सूक्ष्मलहरींवर केलेल्या संशोधनाबद्दल लंडनच्या रॉयल सोसायटीला माहिती दिली. त्यांनी वेव्हगाईड्स, हॉर्न ऍंटेना, डायइलेक्ट्रीक लेन्सेस, विविध पोलरायझर्स एवढेच नव्हे तर सेमिकंडक्टर्सहि वापरले, तेहि ६० जीगॅहर्ट्झएवढ्या उच्च कंप्रतेला. त्यांच्या उपकरणांपैकीं बहुतेक अजूनहि कलकत्त्यांतील बोस इन्स्टिट्यूटमध्यें शाबूत आहेत. एक १.३ मिलीमीटर मल्टीबीम रिसीव्हर आजहि अमेरिकेंतील ऍरिझोना येथील एनआरएओ १२ मीटर टेलिस्कोपमध्यें कार्यरत आहे. त्यांच्या १८९७ मधील संकल्पना अजूनही अमेरिका वापरते. १९७७ सालीं सेमीकंडक्टर विषयातील नैपुण्याबद्दल मिळवलेल्या सर नेव्हिल मॉट यांनी म्हटले आहे कीं जे. सी. बोस हे काळाच्या कमीत कमी साठ वर्षे पुढें होते आणि त्यांना पी-टाईप तसेंच एन-टाईप सेमीकंडक्टरच्या अस्तित्त्वाचा अंदाज आलेला होता.

यानंतर जगदीशचंद्रांनी वनस्पतीच्या शरीररचनाशास्त्राचा पाया घातला. १९२७ सालीं वनस्पतीत ‘जीवरस ऊर्ध्ववहनाचा सिद्धांत त्यांनीं मांडला. या सिद्धांताप्रमाणे जीवपेशींच्या विद्युत्चुंबकीय स्पंदनामुळे वनस्पतींत जीवरस खालून वरच्या दिशेने वाहतो. आता ते डिक्सन आणि जॉली यांनीं १८९४ सालीं प्रथमच मांडलेल्या ताण-समाकर्षण (टेन्शन-कोहीशन) या लोकप्रिय सिद्धांताकडे संशयाने पाहू लागले होते. १८९५ सालीं कॅनी यानें मांडलेला सीपी सिद्धांत या संशयाला पुष्टि देणारा होता. अंतस्वचेच्या सांध्यापाशीं जीवपेशी पेशीरस कसा वाहून नेतात ते त्याने दाखवले.

वनस्पतींनीं विविध स्फुरकांना - स्टिम्यूलसना - दिलेले प्रतिसाद मोजणारे क्रेस्कोग्राफ (Crescograph) नांवाचे नवीनच यंत्र बनवले आणि वनस्पतींना प्राण्यांप्रमाणेच मज्जासंस्था (नर्व्हस सिस्टीम) असते हे त्यांनी दाखवले. अशा रीतेनें त्यांनी प्राणीपेशी आणि वनस्पतीपेशी यांतील साम्य शोधून काढले. संगीतमय, आनंददायक वातावरणात वनस्पती वेगाने वाढतात आणि कर्कश आवाजाच्या कोलाहलात त्यांची वाढ खुंटते हे त्यांनीं दाखवून दिले. नंतर हे त्यांनीं प्रयोगानें सिद्ध केले.

जीवभौतिकीमधील त्यांनीं घातलेली मोलाची भर म्हणजे विविध स्फुरकांना (रसायनें आणि जखमा) वनस्पतींनीं दिलेला प्रतिसादाच्या वहनाचे विद्युतीय स्वरूप. हे स्वरूप रासायनिक असावे असा त्यापूर्वी समज होता. त्यांचा हा दावा नंतर विल्डेन आणि सहकारी यांनी नंतर खरा असल्याचें सिद्ध केले. (नेचर, १९९२, ३६०, ६२-६५) वनस्पतीपेशींवरील सूक्ष्मलहरींचा परिणाम आणि तदनुषंगानें पेशीभित्तीतील विभवांतर कसे बदलते, ऋतूप्रमाणे वनस्पतींत काय बदल होतात हे बदल कसे घडून येतात, या बदलांचे स्वरूप काय असते, वाढ रोखणारीं रसायने, तपमान इत्यादींचे वनस्पतींवर काय आणि कसे परिणाम होतात याचा त्यांनीं अभ्यास केला. विविध परिस्थितीत पेशीभित्तीतील विभवांतरात झालेल्या बदलाच्या अभ्यासावरून त्यांनी विविध वनस्पतींना वेदना होतात आणि माया समजते असा दावा केला.

१८९६ मध्ये त्यांनीं निद्देशेर काहिनी ही तेव्हा अतिशय वाखाणली गेलेली विज्ञानकथा लिहिली. कुंतल किशोरी नांवाच्या केशतैलाच्या छोट्या बाटलीचा वापर करून वादळ शमवून करून हवामानावर ताबा मिळवण्याचा ‘प्रयोग’ त्यात दाखवला होता. हीच कथा त्यांनी नंतर ‘पातालोक तुफान’ या नांवाने त्यांनी दुसरीकडे प्रसिद्ध केली.

कोणत्याही शोधाचे हक्क घेण्याला त्यांचा असलेला विरोध जगजाहीर होता. आपल्या ‘कोहरर’ची रचना त्यांनी लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूशनमधल्या शुक्रवार सायंकाळच्या एका व्याख्यानात त्यांनी आपण बनविलेल्या कोहररची रचना उलगडून सांगितली. ‘द इलेक्ट्रिक इंजिनीअर’ने कोहररच्या रचनेत कोणतीहि गुप्तता न पाळल्यामुळे त्याचा व्यावहारिक वापर करून पैसे मिळविण्यास रान मोकळे असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलें. एका बिनतारी उपकरणे बनविणार्‍या उत्पादकाबरोबर भरघोस मोबदला देणार्‍या करारपत्रावर सही करायला त्यांनी नकार दिला. असे असलें तरी सारा चॅपमन बुल या अमेरिकन मैत्रिणीच्या आग्रहानें म्हणा वा दबावामुळे म्हणा त्यांनी ‘डिटेक्टर फॉर इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्सेस’ या एका उपकरणाच्या पेटंटच्या अर्जावर त्यांनीं सही केली. ३० सप्टेंबर १९०१ रोजी हा अर्ज सादर केला आणि २९ मार्च १९०४ रोजी त्यांना अमेरिकन पेटंट क्र. ७५५८४० दिले गेले. ऑगस्ट २००६ मध्ये ‘आपण भविष्यकाळाचें काय देणे लागतो: डिजीटल युगातील संकल्पना आणि तत्संबंधींची भूमिका’ या विषयावर दिल्लीत भरलेल्या एका परिषदेत आय आय टी दिल्लीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्स चे चेअरमन डॉ. व्ही एस राममूर्ती हे सर जगदीशचंद्र बसू यांच्या पेटंटविषयींच्या या दृष्टिकोनावर भर देतांना म्हणाले,

"पेटंट घेण्याच्या कोणत्याहि पद्धतीबद्दलची त्यांची नाराजी सुप्रसिद्ध आहे. रविंद्रनाथ टागोरांना १७ मे १९०१ रोजी लंडनहून लिहिलेल्या पत्रात त्यांनी तसे म्हटलेले आहे. पेटंट आणि पेटंटपासून मिळणार्‍यां फायद्यांबद्दल ते अनभिज्ञ होतें असें नाहीं. अमेरिकेंतील पेटंट (क्र. ७५५८४०) मिळवणारे ते पहिलेच भारतीय. पेटंटबद्दल जगजाहीर नाराजी असलेले जगात ते एकटेच नव्हते. रॉंटजे, पियरे क्यूरी, आणि इतर अनेकांनीं नैतिकतेच्या मुद्द्यावरून विनापेटंट असलेली वाट चोखाळली होती."

एक व्यक्ती म्हणून जगदीशचंद्र किती श्रेष्ठ होते ते आपण पाहिले आहेच. त्यामुळे त्यांच्या या विचाराचे फारसे आश्चर्य वाटायला नकोच. ३० नोव्हेंबर १९१७ रोजीं बोस इन्स्टिट्यूटच्या स्थापनेच्या दिवशी केलेल्या उद् घाटनाच्या भाषणात जगदीशचंद्रांन पेटंटविषयींचा आपला हा दृष्टिकोन नोंदवला आहे. पूर्णपणे वादातीत असें भारतीय मूळ असलेल्या बासमती तांदळाचे (टेक्ससवरून दिलेल्या टेक्समती या नावाचे) तसेच हळदीचे पेटंट फुकटांत लाटू पाहाणार्‍या अमेरिकन कंपनीपुढे ही नैतिक झळाळी प्रकर्षाने उठून दिसते. एका लबाड संस्थेमुळे अख्खे राष्ट्रच असे बदनाम होऊ शकते.

बसू यांच्या इतिहासांतील स्थानाचे मूल्य नव्यानें ठरवण्यांत आलेले आहे आणि बिनतारी संवेदक उपकरणाचे तसेच मिलीमीटर विद्युत्चुंबकीय लहरींच्या शोधाचे श्रेय आतां त्यांच्या नांवावर मांडले गेले आहे आणि जीवभौतिकविज्ञांतील आदर्श म्हणून त्यांची आता गणना होते. त्यांची कित्येक उपकरणे १०० वर्षे उलटून गेलीं तरी अजूनहि प्रदर्शनात दाखविली जातात. यात विविध ऍंटेना, पोलरायझर्स आणि वेव्हगाईड्स येतात जी आजहि आधुनिक स्वरूपात वापरली जातात. २३ नोव्हेंबर १९३७ रोजी त्यांचा भारतात मृत्यू झाला. १९५८ साली त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मशताब्दीपासून पश्चिम बंगालमध्यें विशेष शिष्यवृत्ती सुरू केलेली आहे. आधुनिक विज्ञानातील त्यांचे योगदान हीच त्यांची ओळख आहे.

विज्ञानाल नैतिकतेचे अधिष्ठान हवेच, ते त्यांनी दिले. त्यांची पत्नी देखील देशसेवेत मागे राहिली नाही. समाजकार्य हीच देशसेवा मानून तिने काम केले. स्त्रीशिक्षणाला चालना देण्यासाठी तिने सन १८९५ मध्ये नारी शिक्षा समिती या संधटनेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. विधवा स्त्रियांना शिक्षणासाठी अर्थसाहाय्य करणे हा या संघटनेचा प्रमुख उद्देश होता. अविकसित गावात ठिकाणी मुलींसाठी विद्यालये स्थापन करणे, चांगली पाठ्यपुस्तके बनवणे, सूतिकागृहे उघडणे आणि बालकल्याण केंद्रे सुरू करणे ही कामे या संस्थेने केली. ग्रामीण विभागात सुमारे २०० शाळा या संस्थेने उघडल्या. यावरून संस्थेच्या कार्याचा आवाका ध्यानात येतो. ‘विद्यासागर बाणी भवन’, ‘महिला शिल्प भवन’, आणि तरुण विधवांसाठी शिक्षिकांना प्रशिक्षण देणारे ‘बाणी भवन ट्रेनिंग स्कूल’ या काही ठळक संस्था. १९१० ते १९३६ या काळात त्या ‘ब्राह्मो बालिका शिक्षालय’ च्या चिटणीसपदी होत्या. जगदीशचंद्रांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने भगिनी निवेदिता स्त्रीशिक्षण निधीला १ लक्ष रुपयांची देणगी दिली. प्रौढांसाठी प्राथमिक शिक्षणाचे कार्य ही संस्था करीत होती. एक आदर्श भारतीय वैज्ञानिक म्हणून जगदीशचंद्रांचे आणि एक थोर भारतीय दांपत्य म्हणून या दोघांना वंदन करून लेख संपन्न करतो.
- X - X - X -

Sunday, April 20, 2014

असे वैज्ञानिक असे विज्ञान - २ वॉलेस आणि डार्विन


वॉलेस आणि डार्विन

आल्फ्रेड रसेल वॉलेस हे नाव आपल्याकडे तसे फारसे प्रसिद्ध नाही. पण काही काही अतर्क्य अशा घटना प्रत्यक्षांत घडल्या आहेत. अशा घटना घडल्या की मग त्या योगायोगाने घडल्या असे आपण म्हणतो. एकच सिद्धांत दोन शास्त्रज्ञांनी एकाच वेळी शोधून काढला आहे तर कधी एका शास्त्रज्ञाचे श्रेय त्या दोघांपैकी एकालाच मिळालेले आहे. रॉबर्ट हूकसारखी श्रेय ‘हुक’लेल्या कमनशिबी शास्त्रज्ञांची कांहीं उदाहरणे देतां येतील. काही शास्त्रज्ञ मात्र याबाबतीत सुदैवी मानतां येतील कारण त्यांचे श्रेय हिरावून घेतले गेलेले नाही. निसर्गशास्त्रात असे आणखी काही वेळा घडले आहे. एक वेधक उदाहरण आणि या लेखाचा विषय आहे आल्फ्रेड रसेल वॉलेस आणि चार्ल्स डार्विन.


 चार्ल्स डार्विन १८५४

 आल्फ्रेड रसेल वॉलेस १८९५

डार्विनची कथा बहुतेकांना ठाऊक आहे. तरी ताज्या संदर्भासाठी अतिशय थोडक्यात देत आहे. चार्ल्स रॉबर्ट डार्विन. जन्म १२ फेब्रुवारी १८०९. वडील सुखवस्तु वैद्यकीय व्यावसायिक. मराठीत सांगायचे झाले तर डॉक्टर. एडींबराला वैद्यकी शिकायला चार्ल्स डार्विनला मोठा भाऊ इरॅस्मस डार्विन याच्याबरोबर पाठवले. (याच्या आजोबांचे नाव देखील इरॅस्मस डार्विन होते) परंतु भूलशास्त्राचा शोध वा अवलंब नसलेल्या त्या काळच्या एका छोट्या मुलावरच्या शस्त्रकियेच्या पहिल्याच पाठाला चार्ल्स पळून गेला आणि त्याने वैद्यकीय शिक्षणाला कायमचा रामराम ठोकला. नंतर वडलांनी त्याला धर्मशास्त्राचे शिक्षण द्यायचे ठरवले. त्यासाठी इंग्रजी भाषेचा स्नातक असणे आवश्यक असे. १८२८ ते १८३१ या काळात चार्ल्स डार्विनचे इंग्रजीचे शिक्षण चालू होते. इथें चार्ल्सने इंग्रजीत उत्तीर्ण होण्याइतके गुण मिळतील एवढाच अभ्यास केला आणि उर्वरित वेळ आपल्या निसर्गशास्त्राचे नमुने गोळा करायच्या छंदात घालवला. या आवडत्या विषयावरचे त्याचे वाचनहि अर्थातच चालू होतेच.

२७ डिसेंबर १८३१ रोजी चार्ल्स डार्विन इंग्लंडमधल्या डेव्हनपोर्ट बंदरातून एच एम एस बीगल या जहाजावरून प्रवासाला निघाला. या उचापतीला त्याच्या वडिलांचा विरोध होता. वैद्यकी सोडून धर्मशास्त्र शिकणार असलेल्या चार्लसने निदान धर्मशास्त्राचे शिक्षण तरी धडपणे पूर्ण करावे आणि आपल्या सुखवस्तु कुटुंबांतले ‘सुशेगात’ आयुष्य निवांतपणे कंठावे असे वडिलांना वाटत होते. पण आजोबांनी - आईच्या वडिलांनी - त्यांचे मन वळवले. रॉबर्ट फिट्झरॉय हा बीगल या बोटीचा कप्तान होता. पाश्चात्य लोक अंधश्रद्धाळू नाहीत असा आपल्याकडे एक गैरसमज आहे. या फिट्झरॉयचा चेहर्‍यावरून भविष्य वगैरे जाणण्याच्या थोतांडावर विश्वास होता. डार्विनचे वाकडे नाक अपशकुनी आहे असा त्याचा ग्रह होता. वाकड्या नाकाच्या डार्विनचें थोबाड पाहायला मला आवडत नाही तेव्हा तो मला माझ्या बोटीवर नको असे म्हणून बीगलच्या या कप्तानाने त्याला बोटीवर घ्यायला नकार दिला होता. पण केंब्रिज विद्यापीठातले एक प्राध्यापक श्री हेन्सलो यांच्या शिफारसीमुळे (यांच्या नादानेच चार्ल्स डार्विन प्राण्यांचे, वनस्पतींचे, नमुने गोळा करीत असे.) कप्तानाने त्याला फुकट प्रवासाच्या बोलीवर बोटीवर घेतले. जेवणाचा व इतर सर्व खर्च डार्विनने स्वतःचा स्वतःच करायचा होता. बोटीवरच्या प्रवासात बोट लागून (बोट लागणे या आजारात समुद्रात बोट प्रवास करीत असतांना लाटांवर वरखाली हालते. त्या हालण्यामुळे मळमळ किंवा/आणि उलट्यांच्या त्रास होतो.) आजारी पडल्यावर डार्विनने लायेलचे (भूगर्भशास्त्राचा प्रणेता Sir Charles Lyell) भूगर्भशास्त्रावरचें पुस्तक त्याने वाचले. हा लायेल भूगर्भशास्त्रातला एक थोर तज्ञ म्हणून ओळखला जात होता आणि जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन या संस्थेचा अध्यक्ष तसेच इतर विविध पदे त्यानें भूषवली होती. या पुस्तकाने डार्विनच्या प्रतिभेला चालना मिळाली आणि डार्विनने पुढे भूकवचाची हालचाल आणि सजीवांची उत्क्रांती यांची सांगड घातली.

नंतर काय झाले? थोडा धीर धरून वॉलेसची माहिती घेऊयात.

आल्फ्रेड रसेल वॉलेसचा जन्म ८ जानेवारी १८१३. म्हणजे वॉलेस हा डार्विन पेक्षा चारेक वर्षांनी लहान. १९ व्या शतकांतला उत्क्रांतीवादी विचारवंत. उत्क्रांतीचा सिद्धांत आणि नैसर्गिक निवडीचें तत्व त्याने स्वतंत्रपणे शोधून काढले होते. इंडोनेशियावरून त्याने अशी एक काल्पनिक रेषा ओढली की त्या रेषेच्या पूर्वेला ऑस्ट्रेलियातील प्राण्यांशी साधर्म्य दाखवणारे प्राणी सापडतात आणि पश्चिमेला आशियातील प्राण्यांशी साधर्म्य दाखवणारे प्राणी आढळतात. या काल्पनिक रेषेला ‘वॉलेस लाईन’ म्हणतात. या वॉलेस रेषेबद्दल तो ख्यातनाम आहे. याच्यामुळेच डार्विनला आपला उत्क्रांतिविषयक शोधनिबंध का आणि कसा प्रसिद्ध करावा लागला हे आपण पुढे पाहाणार आहोत.

शालेय शिक्षणानंतर वॉलेसने सर्वेक्षणाचे - भूभागाचा सर्व्हे करायचे - प्रशिक्षण घेतले. त्या काळी रेलवे, रस्ते इ. बांधणीची कामे जोरात चालू असल्यामुळे सर्वेक्षणाच्या या कामाला तेजी होती. पण वॉलेसमहाशयांना मात्र निसर्गशास्त्रात गोडी होती. प्राण्यांचे विविध नमुने गोळा करण्याचा जगावेगळा छंद होता. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी आणि इतर केव्हाही वेळ मिळेल तेव्हा हे महाशय छंद म्हणून नमुने गोळा करीत. इंग्लंडमधल्या लिस्टरशायरमध्यें तेव्हा हजारो जातींचे किडे होते. यापेक्षा जास्त किडे डोक्यात वळवळत असलेला त्याच्यासारखाच एक अवलिया मित्र त्याला भेटला. हा होता हेनरी बेट्स. रविवारचा सुटीचा दिवस ते दोघे या जगावेगळ्या छंदात घालवीत. बर्‍याच शैक्षणिक संस्था असे नमुने विकत घेत. मग काय विचारता, असे नमुने गोळा करून विकता येतील म्हणून दोघानी नोकर्‍या सोडून नमुनेच गोळा करून विकणारी संस्था स्थापन केली आणि जवळ फक्त शंभर पौंड घेऊन दक्षिण अमेरिकेच्या मोहीमेवर निघाले. डार्विन सुखवस्तु होता हे आपण पाहिलेच आहे. परंतु वॉलेस मात्र उपजीविकेसाठी पैसे कमावणे आणि छंदहि जोपासणे अशा दुहेरी हेतूने मोहिमेवर निघाला. जीव वैविध्य जेथे असाधारण वैपुल्याने आहे त्या जगाच्या दिशेने. जिथे एकहि निसर्गशास्त्रज्ञ नमुने जमवायला अजून पोहोचला नाही अशा ठिकाणी जाण्यासाठी. ज्यांनी कधीहि गोरा माणूस पाहिला नाही अशा रेड इंडियनांच्या वस्तीत घाबरत घाबरत गेल्यावर चाळीसेक दिवस त्यांच्यात राहून त्यांच्या मदतीने अनेक नमुने जमवले. निरंजन घाटे त्यांच्या ‘उत्क्रांतीची नवलकथा’ या पुस्तकात डार्विन आणि वॉलेस या दोघांच्या स्वभावाची मार्मिक तुलना करतात. डार्विनने सदैव रेड इंडियनांना कमी लेखले व सदैव त्यांचा तिरस्कार केला. याउलट नवीन भाषा, चालीरीती आणि नवे शोध याबद्दल रेड इंडियनांना महत्त्व वाटते असे वॉलेसचें मत होते. रेड इंडियन संस्कृती आणि पश्चिम युरोपीय विकसित संस्कृति यात साम्य आढळलेला वॉलेस हा पहिला मानववंशशास्त्रज्ञ. वॉलेसला रेड इंडियन बनून त्यांच्यातच राहावेसे वाटत होते. वॉलेसची रेड इंडियनांबरोबरच्या एक दिवसाच्या अनुभवावरची कविताहि ते मराठीत उद्धृत करतात तर चिलीच्या दक्षिण टोकावरच्या तिएरा देल फ्युएगोला राहणार्‍या रेड इंडियनांना बघून डार्विनला घृणा वाटली होती अशा अर्थाचे ते लिहितात.

असो. चार वर्षें ऍमेझॉनच्या खोर्‍यात काढून वॉलेस जेव्हा इंग्लंडकडे परतीच्या प्रवासाला निघाला तेव्हा त्याला रोज थंडी वाजून ताप येत होता. जहाजावर चढवतांना बर्‍याच नमुन्यांना जलसमाधी मिळाली. १२ जुलै १८५२ रोजी वॉलेस ‘हेलन’ या बोटीवर चढला. त्या जहाजावर बाल्सम नांवाच्या वनस्पतीपासून बनलेले ज्वालाग्राही पदार्थ होते. (माझ्या माहितीप्रमाणे गुग्गुळ वर्गांतील या झाडाचा डिंक व राळ - दोन्ही ज्वालाग्राही असतात) ६ ऑगस्ट १८५२ रोजी त्या जहाजाला प्रचंड आग लागली आणि खलाशांना व प्रवाशांना ते जळते जहाज सोडून द्यावे लागले. वॉलेसचे सगळे जैव नमुने, त्याने काढलेली विविध जैव नमुन्यांची असंख्य रेखाचित्रे वगैरे सर्व त्या आगींत त्याच्या डोळ्यांसमोर भस्मसात झाले.

पुढे काय?

१८३५ मध्यें डार्विन इंग्लंडला परत आला. १८३८ मध्यें माल्थसचा ‘एसे ऑन पॉप्युलेशन’ वाचल्यावर चार वर्षें विचारमंथन करून १९४२ साली त्याने त्याचा उत्क्रांतिविषयक प्रबंध लिहून तयार केला.) लायेल, हूकर आणि कांही अन्य निवडक मित्रांना त्याने त्या ग्रंथाचे हस्तलिखित वाचायला दिले. मध्यंतरी २४ जानेवारी १८३९ रोजी लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्यत्त्व त्याला मिळाले होते. लगेचच २९ जानेवारीला एम्मा वेजवूड या त्याच्यापेक्षा नऊ महिन्याने मोठी असलेल्या धनवान मामेबहिणीशी त्याचा विवाह झाला. सुखवस्तु वडील आणि मातब्बर सासरेबुवा असल्यामुळें डार्विनला तसा चरितार्थाचा प्रश्न नव्हता. १९४४ साली हस्तलिखित त्याच्याकडे परत आले. पण बायबलमध्ये तर म्हटले होते की ‘ख्रिस्तपूर्व ४००४ मध्ये परमेश्वराने या सृष्टीची निर्मिति केली’. बायबलमधल्या ‘जेनिसिस’च्या या धार्मिक सिद्धांताला डार्विनचा सिद्धांत छेद देणारा होता. ख्रिस्ती धर्मगुरूंचा रोष टाळायला हा प्रबंध प्रसिद्ध करायची डार्विन  इ. स. १८५८ सालापर्यंत टाळाटाळ करीत होता. नव्हे आपल्या हयातीनंतरच तो प्रसिद्ध व्हावा अशा खटाटोपात तो होता असे मानावयास जागा आहे. हे हस्तलिखित आणि कांही पैसे असे बाड बांधून वर आपल्या पत्नीला एक सूचना लिहिली की माझे काही बरेवाईट झाले तर चार्ल्स लायेल आणि डॉ. जोसेफ डाल्टन हूकर (अणुसिद्धांतवाला जॉन डाल्टन वेगळा, तो हा नव्हे) यांच्याकडून संपादित करून घेऊन ४०० पौंड खर्चून हे पुस्तक प्रसिद्ध करावे, आणि बाड बॅंकेत ठेवले. पण जवळजवळ त्याच सुमारास एक घटना घडली.


वॉलेस नंतर १८५४ मध्ये पूर्वेकडील देशांत गेला. तिथे मात्र त्याने वॉलेस लाईन रेषा शोधून काढली. १८५५ मध्ये वॉलेसने ‘ऑन द लॉ विच हॅव रेग्युलेटेड द इंट्रॉडक्शन ऑफ न्यू स्पीशीज’ हा शोधनिबंध लिहिला आणि या विषयात डार्विनला चागली गति आहे हे ठाऊक असल्याने त्याला अभिप्रायार्थ पाठवून दिला. डार्विन आपले संशोधन चर्चला आणि सार्वजनिक टीकेला घाबरून ठामपणे मांडायला धजत नव्हता. आपल्या प्रबंधाचा गोषवारा एखाद्या त्या विषयात पारंगत तज्ञ असलेल्या विद्वत्ताप्रचुर शास्त्रज्ञाला काढायला सांगितला तर जसा असेल त्यापेक्षा सरसच आणि आत्मविश्वासपूर्ण अशा नेमक्या भाषेतला असा वॉलेसचा तो शोधनिबंध वाचून आता डार्विनची काय अवस्था झाली असेल ते सांगायला नकोच. सामाजिक टीकेला अजिबात न घाबरणार्‍या वॉलेसने जर हा शोधनिबंध त्या वेळी त्वरित प्रसिद्ध केला असता तर उत्क्रांतीचा सिद्धांत एकट्या वॉलेसच्या नावावर गेला असता आणि डार्विन कदाचित कोणाला ठाऊकहि झाला नसता. पण दैवगति वेगळी होती. पुढे काय झाले?

वॉलेसचा प्रबंध हाती पडल्यावर देखील डार्विन आपला एकट्याचा शोधनिबंध त्वरेने प्रसिद्ध करू शकला असता. कारणे कांहीही असोत, पण त्याने तसे केले नाही. डार्विनने वॉलेसचा प्रबंध चार्ल्स लायेल आणि डॉ हूकर यांना दाखवला. त्या दोघांनी एक तोडगा काढला. डार्विनचा १८४४ चा शोधनिबंध आणि वॉलेसचा १८५५ चा शोधनिबंध दोन्ही १ जुलै १८५८ रोजी लिनिअस सोसायटी कडे एकाच वेळी एकत्रित रीत्या सादर केले. त्यातल्या त्यात वॉलेसचे नशीब एवढे की उत्क्रांतीच्या शोधाच्या इतिहासात वॉलेसचे नाव डार्विनच्या बरोबरीने कोरले गेले. पण प्रसिद्धीचा झोत मात्र सदैव डार्विनवरच राहिला. सुरुवातीला धार्मिक नेत्यांनी प्रतिक्रिया नोंदवली नाही. पण ही वादळापूर्वीची शांतता होती. २४ नोव्हेंबर १८५९ रोजी डार्विनचा ‘ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज’ हा १२५० पानी ग्रंथ प्रकाशित झाला.  आता चर्चनें आणि कर्मठ प्रसारमाध्यमांनी डार्विनला लक्ष्य केले. ‘डिसेंट ऑफ मॅन’ हें डार्विनचे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर तर डार्विनचे डोके आणि माकडाचे धड असलेले व्यंगचित्र १८७१ साली एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते.


म्हणजे डार्विनला जे धर्ममार्तंडांचे भय होते ते वाजवी होते. वॉलेस जर जन्मालाच आला नसता वा त्यानें उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला नसता तर कदाचित डार्विनचा सिद्धांत डार्विनच्या हयातीनंतर प्रसिद्ध झाला असता.

पण डार्विनचे समाजातले उच्च स्थान आणि उच्चभ्रू वर्गातल्या चार्ल्स लायेल, ग्रे, डॉ. जोसेफ हूकर, थॉमस हक्सले इ. घनिष्ट मित्रांचा ठोस पाठिंबा यामुळे त्याला निभावून नेतां आले. १९ एप्रिल १८८२ रोजी इंग्लंडमधल्या केंट परगण्यातील डाउने येथे डार्विनचा वयाच्या ७३व्या वर्षी मृत्यू झाला. खरे तर डाउनेच्या सेंट मेरी चर्चमागे त्याचे दफन होणार होते. पण त्याचा एक सहकारी विल्यम स्पॉटिंगवूड हा तेव्हा रॉयल सोसायटीचा अध्यक्ष होता. त्याच्या प्रयत्नाने डार्विनचे दफन वेन्स्टमिन्स्टर ऍबेच्या शाही स्मशानभूमीत सर आयझॅक न्यूटन आणि जॉन हर्षल यांच्या सान्निध्यात झाले.

वॉलेसचे नशीब एवढे थोर की उत्क्रांतीच्या संशोधनाला डार्विनच्या उच्चभ्रू पाठिराखे लाभले होते. वॉलेस एकटा असता तर कदाचित चर्चने त्याची वासलात लावली असती. वॉलेसचे पुढे काय झाले? १८८० मध्ये देवीच्या लसीला देखील एक समाजसुधारक(?) या नात्याने आक्षेप घेऊन वॉलेसने देवीलसविरोधी चळवळीत भाग घेतला. देवीचा रोगाचा केवळ सार्वजनिक आणि शारिरिक अस्वच्छतेमुळे प्रसार होतो आणि या लसीच्या प्रसारामागे वैद्यकीय व्यावसायिकांचे आर्थिक हितसंबंध असावेत असा त्याचा संशय होता. आजच्या वैद्यकीय विश्वाचे चित्र पाहातां त्या संशयात काही वावगे दिसत नाही. देवीसंबंधात वॉलेसने आपल्या मुद्द्याच्या समर्थनार्थ दिलेली आकडेवारी ही संशयास्पद होती असे ‘लॅन्सेट’ या संस्थेचे मत होते. (होमिओपॅथीसबंधी लॅन्सेटने अलीकडे तोडलेले तारे पाहाता लॅन्सेट ही कशा प्रकारची संस्था आहे हेही आपल्याला कळून येते) त्याचा भाऊ जॉन हा अमेरिकेत स्थायिक झाला होता. १८८६ मध्ये वॉलेसने अमेरिकेचा दहा महिन्यांचा दौरा करून जैवभूगोलशास्त्र, स्पिरीच्युऍलिझम (अचूक मराठी शब्द मला ठाऊक नाही) आणि अर्थशास्त्रीय सामाजिक सुधारणा या एकमेकांशी सर्वस्वी भिन्न असलेल्या तीन विषयांवर व्याख्याने दिली. त्याचे व्यक्तिमत्त्व असे बहुरंगी, बहुढंगी, बहुपेडी होते. या वास्तव्यात तो एक आठवडा कोलोरॅडो इथे राहिला आणि रॉकी पर्वतातील वनस्पतींचे नमुने जमा केले. आशियातील, डोंगराळ भागातील वनस्पती आणि युरोप तसेच अमेरिकेतील डोंगराळ भागातील वनस्पती यांत जे साम्य आहे त्यावर हिमयुगाच्या दृष्टिकोनातून काय प्रकाश पडतो याचा अभ्यास करायला हे नमुने उपयुक्त ठरले. १८८९ मध्ये वॉलेसने ‘डार्विनिझम’ नांवाचा डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या तत्वाची पाठराखण करणारा ग्रंथ लिहिला. त्यात मांडलेले संकरित- हायब्रीड जातीबद्दलचें तत्त्व ‘वॉलेस इफेक्ट’ या नावानें ओळखले जाते.

या काळात मात्र वॉलेस स्पिरिच्युऍलिझमच्या  नादी लागला होता. त्याच्या मते किमान तीन वेळा अज्ञात शक्तीने इतिहासात हस्तक्षेप केला. प्रथम निर्जीव रसायनांपासून सजीव पेशी बनली तेव्हा, दुसर्‍यांदा उच्च प्रजातीत जाणिवा निर्माण झाल्या तेव्हा आणि तिसर्‍यांदा मानवात उच्च कोटीची बुद्धिमत्ता निर्माण झाली तेव्हा.

असे असले तरी विविध संस्थांची पदे त्यानें भूषवली आणि विपुल लेखन केले. १८९३ मध्ये वॉलेसची रॉयल सोसायटीवर निवड झाली. १९०७ मध्ये त्याने मंगळावरील कालव्यांवर लेखन केले. वृद्धापकाळात वॉलेस एक थोर शास्त्रज्ञ आणि समाजसुधारक म्हणून ख्यातनाम होता. ७ नोव्हेंबर १९१३ रोजी इंग्लंडमधल्या ब्रॉडस्टोन, डॉर्सेट इथें वयाच्या नव्वदाव्या वर्षी वॉलेसचा मृत्यू झाला. त्याचे दफन वेस्टमिन्स्टर ऍबे इथे डार्विनच्या शेजारी व्हावें अशी त्याच्या घनिष्ट मित्रांची इच्छा होती. पण त्याच्या पत्नीने म्हटले की ब्रॉडस्टोनच्या छोट्या चर्चमागेच चिरनिद्रा घ्यायची त्याची इच्छा होती. म्हणून त्याचे दफन ब्रॉडस्टोनलाच झाले. मग काही तत्कालीन आघाडीच्या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी वेस्टमिन्स्टर ऍबे इथे डार्विनच्या समाधीशेजारी  त्याच्या नांवाचा स्मृतिफलक उभारावा म्हणून समिती स्थापन केली. १ नोव्हेंबर १९१५ रोजी या स्मृतिफलकाचें अनावरण झाले.

न्यूयॉर्क टाईम्स वॉलेसच्या मृत्यूलेखांत म्हणतो "द लास्ट ऑफ द जायंट्स बिलॉंगिंग टु दॅट वंडरफुल ग्रूप ऑफ इंटलेक्चुअल्स दॅट इन्क्लूडेड, अमंग अदर्स, डार्विन, हक्सले, स्पेन्सर, लायेल ऍंड ओवेन, हूज डेअरिंग इन्व्हेस्टिगेशन्स रेव्होल्युशनाईज्ड ऍण्ड इव्हल्यूशनाईज्ड द थॉट ऑफ द सेन्च्युरी."

क्लिष्टता तसेच विस्तार टाळण्यासाठी उत्क्रांति, उत्परिवर्तन, नैसर्गिक निवड, लैंगिकतेच्या अनुषंगानें होणारी नैसर्गिक निवड, इ. बारकाव्यांचा उल्लेख टाळला आहे.

संदर्भ:
१. उत्क्रांतीची नवलकथा:०१/१९९३:निरंजन घाटे
२. विकीपेडिया.
३. तिन्हीं चित्रें विकीपेडियावर विनामूल्य उपलब्ध.

असे वैज्ञानिक असे विज्ञान - १ रॉबर्ट हूक आणि न्यूटन

रॉबर्ट हूक आणि न्यूटन

एकाच विषयावरील मौलिक संशोधन कधीं कधीं दोन भिन्न व्यक्ति जवळजवळ एकाच वेळीं वा एकाच छोट्याशा कालखंडांत घडतात तेव्हां त्याला योगायोग नाहींतर आणखी काय म्हणणार? वैज्ञानिक जगतात काही वेळा असे झाले आहे. वॉलेस आणि डार्विन यांच्याही बाबतीत तस्सेच झाले आहे.

आजचा नायक आहे रॉबर्ट हूक:                                                                                                     


जन्म १८ जुलै १६३५. हो, हाच हूक - जो आपण शाळेंत शिकलेल्या स्थितिस्थापकत्त्वाच्या नियमासाठीं प्रसिद्ध आहे. एक प्रखर बुद्धिमत्तेचा शास्त्रज्ञ. १६६६ च्या लंडनला लागलेल्या आगींत याची दीर्घोद्योगी आणि प्रामाणिक वृत्ती प्रकर्षाने दिसून आली. उच्च शिक्षण वाधम महाविद्यालयात. इथे हूकने जॉन विल्कीन्सला केंद्रस्थानी ठेवून उत्साही रॉयलिस्टांचे संघटन केले.

१६५७-५८ मध्ये त्यानें लंबकाचा वापर करून एखाद्या ठिकाणचे रेखांश शोधून काढायची पद्धत शोधून काढली. पण पेटंट घेतल्यावर भरपूर द्रव्य मिळवायच्या लालसेत ती पद्धत कागदावरच धूळ खात पडली. स्प्रिंगवर चालणाया घड्याळाला एक ‘ऍंकर एस्केपमेंट’ नांवाचा जहाजाच्या नांगरासारख्या आकाराचा भाग असतो. लंबकाच्या वा बॅलन्सव्हीलच्या साहाय्यानें डोलतांना ही यंत्रणा घड्याळ्याच्या सेकंदकाट्याच्या फिरणार्‍या दातेरी चक्राचा एका वेळी फक्त एकच दात सोडते.                                      


 हें उपकरण हायजेन्स याने १६७५ सालीं बनवले. त्याच्याआधी पंधरा वर्षे हूकने ते बनवले होते हे ऑब्रे (Aubrey), वॉलर आणि इतर काहींना ठाऊक होते. १७१७ साली एका लेखात हेन्री सली हेही तसेच म्हणतात. पुन्हा एकदा द्रव्याच्या हव्यासापोटी हेही संशोधन धूळ खात पडले. मग रॉबर्ट हूक जास्तच मत्सरी, जळकुटा बनला अशा नोंदी आहेत. 

थॉमस विलीसकडे तसेंच रॉबर्ट बॉईलकडे सहाय्यक म्हणून हूकने काम केलेले आहे. बॉईलला त्याचे वायुविषयक प्रयोग करण्यासाठी लागणारा पंपही हूकनेच बनवला होता. ग्रेगरियन परावर्तकीय दूरदर्शक
सर्वप्रथम बनवण्याचे श्रेय हूककडे जाते. यात ग्रह, तारे वा अन्य आकाशस्थ गोलकांच्या स्थानांतरणाचा कोन एका सकंदाएवढ्या (एक अंश कोनाचा ३६०० वा भाग. ३६० अंशांचें पूर्ण वर्तुळ, १ अंश = ६० मिनिटें, १ मिनीट = ६० सेकंद, ३६०० सेकंद = १अंश) अचूकतेने मोजण्याचे उपकरण,


 ग्रेगरीयन दूरदर्शक 
दूरदर्शकातून दिसणार्‍या आकाशस्थ गोलकाचा उन्नत कोन मोजायची सुविधा दिसते आहे




 ग्रेगरीयन दूरदर्शकाची अंतर्गत रचना


त्यानें दूरदर्शकातून मंगळ आणि गुरूचीं परिवलने - रोटेशन्स - पाहिली होती. त्याने प्रकाशाचे वक्रीभवन शोधून काढले होते आणि प्रकाशाचा लहरसिद्धांत - वेव्ह थिअरी - मांडला होता. उष्णतेमुळे पदार्थ प्रसरण पावतात तसेच ‘वायु हे वस्तुकण एकमेकांपासून दूरदूर जाऊन पदार्थ अतिविरळ झाल्यामुळें झालेले वस्तुरूप’ ही संकल्पना हूकनेच प्रथम मांडली. जमिनीचें सर्वेक्षण करून नकाशे बनवण्याचें तंत्र हूकने विकसित केले. परंतु लंडनच्या विकासाचा त्याचा आराखडा मात्र नाकारण्यांत आला.

यानें दोन वस्तूंमधील गुरुत्त्वीय बलाची तीव्रता ही त्या वस्तूंच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणांत बदलते हा - गुरुत्त्वाकर्षणाचा व्यस्त वर्ग नियम -  इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन - नियम स्वतंत्रपणें शोधून काढला होता असा त्याचा दावा होता. ग्रहांची गति या नियमावरूनच आपल्याला कळू शकते. पुढे हा नियम न्यूटननें पूर्णत्त्वाला नेला अशी इतिहासात नोंद झाली. हूकचे बहुतेक प्रयोग हे एकतर तो ‘रॉयल सोसायटीचा क्यूरेटर’ या पदावर १६६२ पासून असतांना केलेले होते वा तो बॉईलचा सहाय्यक असतांना केलेले होते. त्यामुळें या प्रयोगांचें स्वामित्व त्याला दिले गेले नसावें असे म्हणायला मात्र भरपूर वाव आहे.

शेवटीं शेवटीं हूक महासंतापी बनला आणि प्रज्ञावंत स्पर्धकांवर वैतागत असे. परंतु आपल्या वाधम कॉलेजातील रॉयलिस्ट वर्तुळातील मंडळींचा खासकरून क्रिस्तोफर रेन (Wren) याचा हूक हा खंदा पुरस्कर्ता होता. हूकच्या पूर्वायुष्याची माहिती त्यानॆ १६९६ साली लिहायला घेतलेल्या आत्मचरित्रात सापडते. परंतु हे आत्मचरित्र अपूर्णच राहिले. या अपुर्‍या  आत्मचरित्राचा उल्लेख रिचर्ड वॉलरनें त्याच्या १७०५ सालच्या ‘पॉस्थ्यूमस वर्क्स ऑफ रॉबर्ट हूक’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केला आहे. जॉन वॉर्डच्या ‘लाईव्ह्ज ऑफ ग्रीशम प्रोफेसर्स’ तसेंच जॉन ऑब्रे च्या ‘ब्रीफ लाईव्हज’ मध्येही हूकच्या आयुष्याचा लेखाजोगा सापडतो.

रॉबर्ट हूक हा जॉन आणि मिरेना ब्लेझर या दांपत्याच्या पाच अपत्यांपैकी चौथा. पांचवे भावंड त्याच्यापेक्षा सात वर्षांनी लहान. त्याचे दोन भाऊ पुढें मंत्री झाले. वडील जॉन हूक हे चर्च ऑफ इंग्लंडचे पारंपारिक धर्मगुरू आणि स्थानिक शाळेचे प्रमुख होते. ते रॉबर्टला शाळेत तर शिकवीतच, वर ऊठसूट आजारी पडणार्‍या रॉबर्टला घरीही शिकवीत. शिक्षण पूर्ण करून चर्चचें काम करावे अशी रॉबर्टकडून अपेक्षा होती. तरूणपणी रॉबर्टला यांत्रिक कामांचे निरीक्षण करणे आणि आरेखन करणे (डिझाईनिंग आणि ड्राफ्टिंग) यात रस होता. एकदा त्याने एक पितळी घड्याळ उघडून पूर्ण सुटें केलें आणि त्याबरहुकूम लांकडी भाग बनवून घड्याळ बनवले. हें लांकडी घड्याळ बर्‍यापैकीं चाले. त्यातच तो आरेखन शिकला. कोळसा किंवा खडूने  आणि लोखंडावर खुणा करून तो विविध यंत्रांचे नवीन भाग बनवायला शिकला.

वडील १६४८ मध्ये वारले तेव्हा त्याला ४० पौंडांची रक्कम मिळाली. शिकाऊ उमेदवारी (ऍप्रेंटिसशिप) मिळवण्यासाठी त्याने ही रक्कम खर्च केली. यांत्रिक कामात गति आणि भरपूर वाव पण नाजूक प्रकृति असल्यामुळे रॉबर्टने घड्याळजी वा कुशल चित्रकार व्हावे असे त्याच्या बाबांना वाटे. जरी उमेदवारी मिळवली तरी एक हुषार विद्यार्थी असल्यामुळें लंडनच्या वेस्टमिन्स्टर शाळेत प्रवेश मिळवणे रॉबर्टला जड गेले नाही. या शाळेचे डॉ. बस्बी हे रॉबर्ट हूकचे ‘सर्वोत्तम बुद्धिमान विद्यार्थी, हवाहवासा वाटणारा सभ्य गृहस्थ आणि परिपूर्ण असा धर्मगुरु - बिशप व्हावयास पूर्णपणे लायक असा लंडन स्कूलचा सर्वोत्तम विद्यार्थी’ असे वर्णन करतात.

१६५३ मध्ये ऑर्गनवादनाचा वीस तासांचा एक शिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर रॉबर्ट हूक हा ऑक्सफर्डमध्ये समूहवादक म्हणून ख्राईस्ट चर्चमध्यें काम करू लागला. नंतर हूक डॉ. थॉमस विलीस यांचा रसायनशास्त्रीय सहाय्यक म्हणून कामाला लागला. विलीससाहेब रॉबर्टची भरपूर प्रशंसा करीत. त्यांच्याकडे असतांना हूकची रॉबर्ट बॉईलशीं भेट झाली. १६५५ ते १६६२ या काळात त्याने बॉईलचा सहाय्यक म्हणून काम केलें. १६६३ पर्यंत तरी हूकने एम ए ची पदवी मिळवली नव्हती. १६५९ मध्ये हूकने जॉन विल्कीन्सना हवेहून जड वस्तू कशी उडू शकेल यासंबंधी काही तत्त्वांचे स्पष्टीकरण करून सांगितले. वर मानवी स्नायूमध्ये तेवढी क्षमता नाही असाहि निष्कर्ष काढला. आपल्याला आयुष्यभर साथ देणार्‍या विज्ञानलालसेला आपले ऑक्सफर्डमधले दिवसच कारणीभूत आहेत असें रॉबर्ट हूकचे मत होते. इथेच त्याला क्रिस्तोफर रेन (Wren) सारखे एकापेक्षां एक असे श्रेष्ठ मित्रवर्य भेटले. नंतर त्याला वाधमला जॉन विल्कीन्स यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. हूकच्या आयुष्यावर विल्कीन्सचा खोल ठसा उमटला. विल्कीन्स हा रॉयलिस्ट - राजनिष्ठ - होता आणि काळ किती कठीण आणि अनिश्चित आहे याची त्याला पूर्ण जाणीव होती. त्यानेंच रॉयल सोसायटीला मानमरातब मिळवून दिला.

रॉयल सोसायटींत हूकचे काम होतें आपल्या विशिष्ट पद्धतीने विविध प्रयोग करून दाखवणे. काचेतील बुडबुड्यांमधील हवेचे स्वरूप दाखवणे, छाती उघडल्यावर जर फुफ्फुसांत पंपानॆं पुन्हा पुन्हा हवा भरून फुप्फुसे पुन्हा पुन्हा रिकामी करीत राहिले तर कुत्रा जिवंत राहू शकतो, रोहिणी/धमनी (आर्टरी) वा नीला (व्हेन) यांतील रक्तांत फरक नसतो इ. मह्त्त्वाचे प्रयोग होते. गुरुत्त्वाकर्षणासंबंधींही पडणार्‍या वस्तू, वस्तूंचे वजन, वेगवेगळ्या उंचीवरचा हवेचा दाब मोजणे आणि लंबकाविषयक प्रयोग इ. प्रयोगही त्यानें यशस्वी करून दाखविले.

काही महत्त्वाचीं उपकरणें हूकनें आरेखित करून विकसित केलीं. यात वरचा ग्रेगरीयन दूरदर्शक, बंदुकीच्या दारूची स्फोटक क्षमता मोजण्याचे उपकरण आणि दातेरी चक्राला - गेअरव्हीलला - अचूक मापाचे दांते पाडण्याचें उपकरण (हें अजूनहि वापरलें जातें) हीं महत्त्वाची उपकरणे आहेत.

१६६३-६४ मध्ये हूकने सूक्ष्मदर्शकांतून निरीक्षणे केली आणि तत्संबंधीं माहिती गोळा करून ठेवली. २० मार्च १६६४ रोजीं हूकची ऑर्थर डॅक्रेस यांच्या जागी ‘ग्रीशम प्रोफेसर ऑफ जॉमेट्री’ म्हणून नेमणूक झाली.

हूकच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मात्र फारसे चांगले लिहिले गेले नाही. त्याचा पहिला चरित्रकार रिचर्ड वॉलर त्याचें ‘व्यक्तिशः केवळ तिरस्करणीय, खिन्नमनस्क, विश्वास न ठेवण्यासरखा आणि मत्सरी’ असे वर्णन करतो. जवळजवळ दोन शतके वॉलरच्या मतांचा प्रभाव होता आणि त्या काळच्या पुस्तकात आणि लिखाणात त्याचे कमीजास्त स्वरूपात तशाच स्वरूपाचें प्रतिबिंब सापडते.
 
१९३५ सालीं हूकच्या दैनंदिनीच्या प्रकाशनानंतर मात्र त्याच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरी वाजू प्रकाशांत आली. खासकरून मार्गरेट इस्पिनासे ही त्याच्याविषयीं जास्त तपशिलांत जाऊन लिहिते. मूर्ख आणि मत्सरी असे जे हूकचें चित्र रंगवले गेले आहे ते तिच्या मते संपूर्णपणे खोटे आहे. थॉमस टॉम्पिअन हा घड्याळजी, क्रिस्तोफर कॉक्स हा उपकरण निर्माता यांच्याशी हूकचे चांगले संबंध होते. त्याचे क्रिस्तोफर रेनकडे नेहमी जाणेयेणे होते. जॉन ऑब्रेशी हूकचा दीर्घकाळ स्नेह होता. या दैनंदिनीत कॉफी हाऊसमधल्या तसेच मद्यालयांमधल्या भेटीगाठींचे तसेंच रॉबर्ट बॉईलबरोबरच्या भोजनांचे संदर्भ वारंवार येतात. हॅरी हंट या प्रयोगशाळा सहाय्यकाबरोबर हूक कैक वेळा चहापान करीत असे. घरगुती नातेवाईकांपैकी हूक आपल्या चुलत भावाला आणि पुतणीला गणित शिकवायला घरी घेऊन जात असे. या सर्वांशी हूकचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

रॉबर्ट हूकने लग्न केले नाही आणि त्याचे बहुतेक आयुष्य हें वैट (Wight) या बेटावर, ऑक्सफर्ड आणि लंडन येथे गेले होते. ३ मार्च १७०३ रोजी हूकचे लंडनमध्ये देहावसान झाले. सेंट हेलेन चर्चच्या बिशपगेटजवळ त्याचे दफन झाले. परंतु त्याचे थडगे नक्की कोठे आहे हे कोणाला ठाऊक नाही.

मृत्यूनंतर मात्र त्याच्या कीर्तीला ओहोटी लागली. न्यूटनबरोबरचा गुरुत्त्वाकर्षणाच्या नियमाच्या शोधाच्या श्रेयाचा वाद हे त्याचें प्रमुख कारण समजलें जाते. रॉयल सोसायटीचा अध्यक्ष असल्यामुळें न्यूटननें हूकच्या उपलब्ध असलेल्या एकमेव तैलचित्राची जरूर ती काळजी घेण्यात हयगय केली वा ते गहाळ होण्यासाठीं जरूर ती काळजी घेतली असें म्हटले जाते. पण कारण कांहींहि असो, हूकचे रॉयल सोसायटीमधील एकमेव तैलचित्र गहाळ वा नष्ट व्हायचे ते झालेच. बर्‍याच काळानंतर विसाव्या शतकातील रॉबर्ट गुंथर आणि मार्गरेट इस्पिनास्से यांच्या संशोधनामुळे रॉबर्ट हूकच्या वैज्ञानिक जगतातील अमूल्य योगदानाची माहिती जगापुढे आली.

कांही असले तरी हूकचा नित्यनूतन दृष्टिकोन, त्याची दीर्घोद्योगी वृत्ती, वैज्ञानिक प्रयोग अचूकतेने करण्याची त्याची क्षमता हे सर्व वादातीत आहे. हूकच्या जळकुटेपणाबद्दल मात्र संशय घ्यायला फारसा वाव नाहीं. गुरुत्त्वाकर्षणाच्या व्यस्त वर्ग - इन्व्हर्स स्क्वेअर - नियमाबद्दलचा न्यूटनविरुद्ध असलेला त्याचा वाद आणि ओल्डेनबर्गविरुद्धचा घड्याळाच्या ‘ऍंकर एस्केपमेंट’ च्या पेटंटबद्दलचा वाद ही त्याच्या दाव्यांबाबतचीं दोन ठळक उदाहरणें. रॉयल सोसायटीचा प्रयोगसंचालक - क्यूरेटर ऑफ एक्सपरीमेंट्स -  असल्यामुळें तो नेहमीं कामांत मग्न असे आणि पेटंटच्या उचापती करायला त्याला फारसा वेळ नसे ही बाब लक्षांत घेतां त्याच्या दाव्यातला तथ्यांश नाकारतां येत नाही. न्यूटन रॉयल सोसायटीवर आल्यानंतर हूकचे कागदपत्रच गहाळ वा नष्ट होणे यांत कुठेतरी पाणी मुरते हें नक्की. हे गायब झालेले हूकचे कागदपत्रच यावर जास्त प्रकाश टाकूं शकतील. कांहीं झाले तरी अखिल मानवजात मात्र हूकची ऋणी आहेच.
- X – X – X -