Saturday, April 24, 2010

आईनस्टाईन आणि ऑर्थर एडिंग्टन

सर ऑर्थर स्टॅन्ले एडिंग्टन जन्म २८ डिसेंबर १८८२, मृत्यू २२ नोव्हेंबर १९४४. कालच थोर शास्त्रज्ञ ऑर्थर एडिंग्टन यांचा जन्मदिवस होता. त्या निमित्तानें त्यांच्याविषयीं थोडेसें.



एडिंग्टन मर्यादा: एखादा तारा जेव्हां प्रारणांच्या स्वरूपांत ऊर्जा प्रसारित करतो तेव्हां त्या प्रारणावर त्या तार्‍याचें गुरुत्त्वाकर्षण लगाम घालतें. त्यामुळें तो तारा एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त प्रारणें प्रसारित करूं शकत नाहीं. म्हणून त्या तार्‍याच्या दीप्तीमानतेवर मर्यादा येते. हें प्रथम ऑर्थर एडिंग्टन यांनीं दाखवून दिलें. एडिंग्टनचा बहुमान म्हणून या मर्यादेला एडिंग्टन मर्यादा (लिमिट) असें नांव ठेवण्यांत आलें.



असें जरी असलें तरी त्यांचें नांव दुसर्‍याच कारणामुळें अजरामर झालें.



सन १९१४ मध्यें ऑर्थर एडिंग्टन केंब्रिजमध्यें असतांना टेनिस खेळत असे. खेळतांना चेंडू रेषेच्या बाहेर पडला कीं रेषेवर याबद्दल एडिंग्टनचें निरीक्षण अचूक असे. कारण त्याची तीक्ष्ण नजर. नंतर हा एडिंग्टन त्याच्या तीक्ष्ण नजरेमुळें आणि अचूक निरीक्षणशक्तीमुळें ‘Best measuring man in England’ - ‘इंग्लंडमधला मोजमापें घेणारा सर्वश्रेष्ठ गृहस्थ’ म्हणून गौरवला गेला. बर्लिन विद्यापीठांत जगांतल्या सर्वोत्तम शास्त्रज्ञांची एक परिषद भरणार होती. जर्मनीच्या महत्त्वाकांक्षी लष्करी सत्तेला बळकट करणें हाच हेतु त्या परिषदेमागें होता हें उघड होतें. एडिंग्टन हा जरी क्वेकर (धर्म जतन करणारांच्या एका संस्थेचा सदस्य) असला तरी ब्रिटिश एडिंग्टनच्या राष्ट्रभक्तीबद्दल कोणतीहि शंका नव्हती. या परिषदेंत ऑर्थर एडिंग्टनला पाठवण्यांत आलें. ब्रिटिश शास्त्रज्ञ किती अग्रेसर आहेंत हें जर्मनांना दाखवून द्यायला, न्यूटनचें श्रेष्ठत्त्व अधोरेखित करायला आणि एका विशिष्ट जर्मन शास्त्रज्ञाच्या कामगिरीवर नजर ठेवायला. त्या शास्त्रज्ञाची जर्मनांना जास्तींत जास्त निकड होती. कां ते ब्रिटिशांना ठाऊक नव्हतें. त्या शास्त्रज्ञाचें नांव होतें आल्बर्ट आईनस्टाईन.



-------------------



आईनस्टाईन तेव्हां स्विट्झरलंडमध्यें झूरिकला राहात होता. वयोवृद्ध मॅक्स प्लांक त्याचा मित्र आणि मार्गदर्शक. आईनस्टाईन नेहमीं विचारांत हरवलेला. त्यामुळें त्याचें वैवाहिक जीवन सदैव धोक्यांत. तो कोणत्या विषयावर काम करतो तें सौ. ला - मिलेव्हाला सांगत नाहीं म्हणून ती खूप रागावत असे. स्विट्झरलंडमधली परिस्थिती संशोधनाला अनुकूल नाहीं असें मॅक्स प्लांकनें आईनस्टाईनला सांगितलें आणि बर्लिनच्या प्रशियन ऍकॅडमी ऑफ सायन्सेस चें सदस्यत्त्व आणि प्राध्यापकपद देऊं केलें. भरभक्कम अशा १२,०००/- मार्क्सच्या पगारावर. आईनस्टाईन म्हणाला कीं मला घरीं विचारावें लागेल. मॅक्स प्लांक म्हणाला कीं, तूं एक थोर शास्त्रज्ञ बनूं शकतोस आणि कांहींतरी मिळवायसाठीं कसला तरी त्याग करावाच लागतो. वर बर्लिनची रेलवेचीं तिकिटेंहि दिली.



-------------------



एडिंग्टनच्या मताप्रमाणें विश्वांतलें सारें काहीं हें लांकूड आहे. सारें कांहीं एकमात्र शक्तीनें बांधून ठेवलें आहे. गुरुत्त्वाकर्षणाच्या शक्तीनें. न्यूटननें हें शोधून काढलें. परंतु एडिंग्टनपुढचा प्रश्न होता तो हा कीं आपण गुरुत्त्वाकर्षणाला स्पर्श करूं शकत नाहीं, पाहूं शकत नाहीं तसेंच त्या शक्तीला प्रतिकारहि करूं शकत नाही. मग हें कोडें कसें बरें सोडवावें?



-------------------



मॅक्स प्लांकनें आईनस्टाईनचें बर्लिनला जोरदार स्वागत केलें.



-----------------------



जर्मन अधिकार्‍यांनीं मॅक्स प्लांककडे चौकशी केली कीं हा आईनस्टाईन करतो तरी काय. या ज्यू माणसाचा जर्मनीला काय उपयोग आहे? गुरुत्त्वाकर्षणाच्या संशोधनानें पैसे कसे काय मिळतील असेंहि विचारलें. मॅक्स प्लांक म्हणाला कीं न्यूटनसारख्या जगांतल्या सर्वश्रेष्ठ इंग्रज शास्त्रज्ञाला आपण चूक ठरवलें तर तो जर्मनांचा मोठाच विजय ठरेल.



------------------



केंब्रिजच्या विज्ञान परिषदेच्या सभेंत एडिंग्टन इतर ब्रिटिश शास्त्रज्ञांबरोबर चर्चा करीत होता. सर्व शास्त्रज्ञ कट्टर राष्ट्रभक्त ब्रिटिश. पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटनमधला जर्मनद्वेष पराकोटीला पोहोंचलेला. या पार्श्वभूमीवर जर्मन आईनस्टाईनची थोरवी या कट्टर देशाभिमानी ब्रिटिशांना कशी समजावून सांगावी या चिंतेत.



"काळ हा सदैव एकाच गतीनें धांवत नाहीं. आपण वेगानें चाललों तर काळ सावकाश धांवतो, आपण जितक्या जास्त वेगानें जाऊं, काळ तितका जास्त सावकाश चालेल असें आईनस्टाईन म्हणतो." एडिंग्टन.



"याला आधार?" परिषदेचे प्रमुख सभासद.



"कांहीं नाहीं. हें असें म्हणणारा आईनस्टाईन पहिलाच." एडिंग्टन.



"मग हें कसें काय तपासायचें?"



"तपासणें हा मुद्दाच नाहीं." एडिंग्टन.



"मग मुद्दा काय आहे." एडिंग्टन.



एडिंग्टनच्या लक्षांत येतें कीं आतां आपण सत्य बोललों तर कांहीं खरें नाहीं. उलटाच परिणाम व्हायचा. एडिग्टन मूकच.



"गुरुत्त्वाकर्षणाबद्दल काय म्हणतो तो?"



"कांहीं नाहीं." एडिंग्टनचें गुळमुळीत उत्तर.



"मग विश्वावर नियंत्रण कशाचें आहे? ग्रहतार्‍यांची गति, दिशा वगैरे कशावरून ठरते? गुरुत्त्वाकर्षणानें. म्हणजेच गुरुत्त्वाकर्षण म्हणजे सर्व कांहीं आहे. काय म्हणतो आईनस्टाईन याबद्दल?"



"कांहीं नाहीं." एडिंग्टन.



"गणित, न्यूटनचे नियम. म्हणजे या शाश्वत विश्वाबद्दल या तुमच्या आईनस्टाईनला कांहींहि म्हणायचें नाहीं?"



एडिंग्टन गप्प.



-----------------------



पहिलें महायुद्ध तर सुरूं होतें. केंब्रिज रेजिमेंट युद्धावर गेली. पण धर्मप्रसारक असल्यामुळें एडिंग्टन युद्धावर जाऊं शकला नाहीं. युद्धावर जाणारा आपला प्रिय मित्र विल्यम मार्स्टनला निरोप द्यायला एडिंग्टन स्टेशनवर गेला. त्याला शोधत स्टेशनभर भटकला. त्याची गाडी निघून गेली होती. तो भेटला नाहीं पण रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे वयोवृद्ध प्रमुख श्री. लॉज भेटले. त्यांनीं एका तरूण लष्करी अधिकार्‍याची एडिंग्टनशीं ओळख करून दिली. आपला मुलगा रेमंड म्हणून.

---------------------



पहिल्या महायुद्धाच्या छायेंत ब्रिटिश आणि जर्मन यांमधलें शत्रुत्त्व पराकोटीला पोहोंचलेलें होतें. एडिंग्टनचा प्रिय मित्र विल्यम्स मुल्लरच्या कुटुंबावर ब्रिटिश लोकांनीं हल्ला केला कारण ते जन्मानें जर्मन होते. एडिंग्टननें त्यांना आपल्या घरीं आणलें. त्यामुळें ब्रिटिश समाजमनांत एडिंग्टनची जर्मनधार्जिणा अशी प्रतिमा बनली.



----------------



एका जर्मन अधिकार्‍यानें आईनस्टाईनकडे एकदां एक जाहीरनामा आणला. आम्हीं जर्मन नागरिक आहोंत आणि त्याचा आम्हांला अभिमान आहे असा सांगणारा जाहीरनामा. त्यावर बिथोव्हीन, शूबर्ट इ. ९३ मान्यवरांच्या स्वाक्षर्‍या असतात. म्हणाला यांत ९४वी स्वाक्षरी करायचा बहुमान आईनस्टाईनला दिला गेला आहे म्हणून. प्लांकहि सोबत उभा.



"शेक्स्पीअरशीं भांडायला मला नक्कीच आवडलें असतें म्हणाला. पण स्विस लवाद नेमला असता तर रक्त सांडल्याशिवाय तोडगा निघूं शकला असता. माफ करा. पण सही करेन म्हणून मला गृहीत कां धरलें, अगोदर कां नाहीं विचारलें?" आईनस्टाईन.



"तुला फार मोठी किंमत मोजून आणलेलें आहे इथें." अधिकारी.



"मला धमकी देतांय?" आईनस्टाईन.



"तुमच्या देवावरच्या श्रद्धेची आठवण करून देताहेत ते. आणि तुमच्या राष्ट्रकर्तव्याची जाणीव." मॅक्स प्लांक.



"काय काम देणार आहांत तुम्हीं मला प्लांकसाहेब?" आईनस्टाईन.



"मीं आर्टिलरी प्रोजेक्टाईलवर - तोफगोळ्यांच्या भ्रमणमार्गावर काम करतों आहे." मॅक्स प्लांक.



"मीं कंत्राटावर आलेलों आहे. मी फक्त माझ्या कामाला बांधील आहे आणि कोणत्याहि राष्ट्राला बांधील नाहीं." आईनस्टाईन.



-------------



एडिंग्टननें ग्रंथालयांत जाऊन आईनस्टाईनचा प्रबंध मागितला. यापूर्वीं एकदां ग्रंथसेविकेनें त्याला तो प्रबंध दिला होता. पण आतां ती तो देऊं शकली नाहीं कारण सर्व जर्मन विज्ञानविषयक नियतकालिकें - जर्नल्स प्रसारातून काढून घेण्यांत आलीं होतीं.



एडिंग्टननें आईनस्टाईनला पत्र लिहिलें. आपल्या ग्रहमालिकेंत बुधाची कक्षा विकृत आहे. तो न्यूटनच्या नियमांचे पालन अचूकतेनें करीत नाहीं. असें कां ही विचारणा करणारें.



--------------



वर्तमानपत्रांत एक बातमी. बेल्जियममध्यें इप्र येथें जर्मनांनीं क्लोरीन हा घातक विषारी वायु वापरून अख्खी केंब्रिज रेजिमेंट मारली. मोठ्या संख्येनें माणसें मेलीं. १५,०००. एकहि बचावला नाहीं. मृतांत रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या प्रमुखांचा मुलगा रेमंड होता. धार्मिक एडिंग्टन शोकाकुल. मग देव कुठें होता असे त्यानें उद्गार काढले.



-------------



वर्तमानपत्रांत या संहाराचें वृत्त वाचून आईनस्टाईननें बर्लिनच्या प्रशियन वैज्ञानिक परिषदेंत जाऊन भर सभेंत जर्मनांची निर्भर्त्सना केली. जर्मनांची दहशत ठाऊक असून.



--------------



केंब्रिज सोसायटीला प्रेसिडेंटकडून एक प्रस्ताव आला. सर्व जर्मनांचे रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचें सदस्यत्त्व रद्द करावें. प्रमुख म्हणाले, "सोसायटीनें त्वरित सर्व जर्मनांचे सदस्यत्व रद्द केलेलें आहे आणि सर्व जर्मन वैज्ञानिकांशीं असलेले सर्व संबंध पूर्ण तोडलेले आहेत असें जाहीर करतों."



एडिंग्टननें विरोध केला. "जर्मन सेनेचा आणि वैज्ञानिकांचा कांहीं संबंध नाहीं."



मग प्रमुख म्हणजे केंब्रिज रेजिमेंटधल्या क्लोरीननें मारल्या गेलेल्या रेमंड लॉजचे वडील म्हणाले, "माझ्या लाडक्या मुलाला मारलें कोणीं? त्या जर्मनांनीं. त्यांच्या विज्ञानानें."



"रेमंड लॉजला कोणीं मारलें? या मूर्ख युद्धानें. जर्मन विज्ञानानें नाहीं. जर्मन वैज्ञानिकांवर बहिष्कार घालून केंब्रिजचा कोणीहि शहीद परत येणार नाहीं. विज्ञानातल्या सत्याला राष्ट्राच्या मर्यादा नसतात." एडिंग्टन.



इतरांनीं विचारलें, "मग त्या ९३ सह्यांचें काय? त्यांत मॅक्स प्लांक आहे, विल्हेम रॉंटगेन आहे, फ्रिट्झ हार्पर?" एडिंग्टन निरुत्तर.



"ठीक आहे; ठराव मतदानाला टाका." एक सदस्य.



एक विरुद्ध इतर सर्व अशा मताधिक्यानें जर्मन वैज्ञानिकांवरच्या बहिष्काराचा ठराव मान्य झाला.



-----------

आईनस्टाईननें जर्मनांची निर्भर्त्सना केली होती. त्याचें फलित काय तर आईनस्टाईनला बर्लिन विद्यापीठातून घालवून दिलें. बर्लिनच्या रस्त्यावरून चालतांना खड्ड्यंत सांचलेलें पाणी उडवीत त्याच्या आजूबाजूनें मोटारी जात येत होत्या. त्या गाड्यांच्या दिव्यातून निघालेल्या प्रकाशशलाकांचा मार्ग त्या धूसर आसमंतांत दिसत होता आणि अचानक त्याला साक्षात्कार झाला. प्रकाश (light) आणि अवकाश व काल (space time) यांच्या विलक्षण अनोख्या संबंधाच्या संकल्पनेनें त्याच्या मनांत आकार घेतला. त्यानें लगेच एडिंग्टनला पत्रोत्तर लिहिलें. पण जर्मन पोलिसांनीं त्याला पत्रपेटीकडे देखील जाऊं दिलें नाहीं. शेवटीं त्यानें मॅक्स प्लांकला तें पत्र केंब्रिजला पत्रपेटींत टाकायला विनंति केली. प्लांकनें तें पत्र पत्रपेटींत टाकलें.

-------------



पत्रोत्तर वाचून एडिंग्टन उत्साहानें भरून गेला. एडिंग्टनला आईनस्टाईनचा सिद्धांत तपासून पाहाण्यासाठीं पश्चिम आफ्रिकेंतल्या एका बेटावर जाऊन सूर्यग्रहणाच्या दिवशीं आकाशनिरीक्षण करायचें होतें. त्यासाठीं त्याला रॉयल सोसायटीकडून अर्थसाहाय्य हवें होते. या अर्थसाहाय्याच्या अर्जाचा विचार करण्यासाठीं ही सभा भरली होती. आणि वैज्ञानिकांच्या त्या सभेंत ऑर्थर एडिंग्टन आईनस्टाईनचा सिद्धांत इतरांना समजावून सांगत होता.



"आतां आईनस्टाईनच्या सिद्धांतामुळें न्यूटनच्या सिद्धांताला कोठें तडा जातो तें पाहूंया. गुरुत्त्वाकर्षणाची ओढ वा प्रारण प्रकाशापेक्षां जास्त वेगानें कसें काय जाईल हा आईनस्टाईनचा प्रश्न होता. सूर्य अचानक नष्ट झाला तर काय होईल? न्यूटनच्या पहिल्या नियमाप्रमाणें सगळे ग्रह आपापल्या दीर्घवर्तुळाकार कक्षेतून कक्षेच्या स्पर्शरेषेच्या दिशेंत सरळ रेषेंत निघून जातील.



एकदम मान्य. पण केव्हां? म्हणजे समजा दुपारीं बरोब्बर बारा वाजतां सूर्य नष्ट झाला तर? न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणें सगळे ग्रह बरोब्बर बारा वाजतां जिथें असतील तिथूनच सरळ रेषेंत जायला लागतील. आपल्या कक्षेंतल्या असल्या ठिकाणच्या बिंदूंतल्या स्पर्शरेषेच्या दिशेंत. म्हणजे पाहा; बारा वाजतां पृथ्वीच्या दिशेनें निघालेला सूर्यापासून निघालेला सूर्याचा शेवटचा प्रकाशकिरण बारा वाजून नऊ मिनिटांनीं पृथ्वीपर्यंत पोहोंचेल. पण गुरुत्त्वाकर्षणाची शक्ती मात्र बरोब्बर बारा वाजतांच नष्ट होईल. म्हणजेच गुरुत्त्वाकर्षण हें प्रकाशापेक्षां जास्त वेगानें प्रवास करतें.



आईनस्टाईनला हें मान्य नाहीं. आईनस्टाईन म्हणतो कीं वस्तुमान (mass) हें अवकाशाला (space) वक्रता देतें. गादीवर जर वजनदार चेंडू ठेवला तर गादीला खड्डा पडतो तसा. या वक्रतेचा आपल्याला जाणवणारा परिणाम म्हणजेच गुरुत्त्वाकर्षण. चेंडू जितका जड तितका खड्डा खोल. जितकें वस्तुमान जास्त तितकी वक्रता जास्त. जवळ म्हणजे कमी अंतरावर वक्रता जास्त आणि दूरवर म्हणजे जास्त अंतरावर वक्रता कमी. सूर्याच्या वस्तुमानामुळें सूर्याभोंवतालच्या अवकाशाला अशी वक्रता येते. सूर्याच्या जास्त जवळ तें जास्त वक्र असतें म्हणून जास्त वक्र अवकाशांतला बुध जास्त वक्र मार्गानें जातो. म्हणजे आईनस्टाईनच्या सिद्धांताप्रमाणें बुधाच्या विकृत भ्रमणमार्गाचें तार्किक स्पष्टीकरण मिळतें.



जर सूर्य अचानक नष्ट झाला तर अवकाश सरळ व्हायला लागेल. वार्‍यावर एखादें वस्त्र फडकावें तशी सूर्याच्या स्थानाभोंवतालची अवकाशाची वक्रता नष्ट होत जाईल. प्रकाशाच्या वेगानें. आणि सुमारें बारा वाजून नऊ मिनिटांनीं पृथ्वीच्या आसपासचें अवकाशाची सूर्यामुळें आलेल वक्रता नष्ट होऊन पृथ्वी सरळ रेषेंत जायला लागेल."



"पण ही तर केवळ उपपत्ति (hypothesis) आहे. हें प्रयोगानें कसें काय सिद्ध करणार? जर सिद्ध करायचें झालें तर सूर्यासारखा एखादा तारा नष्ट करावा लागेल वा बाजूला करावा लागेल. आणि हें तर मानवी शक्तीच्या आवाक्याबाहेरचें आहे." एका सदस्याचा रास्त आक्षेप.



एडिंग्टन म्हणाला, "जर वस्तुमानानें अवकाशाला वक्रता येत नसेल तर सूर्याच्या पलीकडच्या तार्‍याचे किरण आपणांपर्यंत पोहोंचूं शकणार नाहीं. पण जर कां वक्रता येत असेल तर मात्र सूर्याआडच्या तार्‍याचे किरण सूर्याला किंचित वळसा घालून आपल्यापर्यंत पोहोचतील. एरवी सूर्यतेजामुळें आपण ते किरण पकडूं शकणार नाहीं. पण सूर्यग्रहणाच्या वेळीं मात्र आपण तो तारा पाहूं शकूं. तसेंच ग्रहणाच्या वेळीं जे तारे सूर्याच्या आजूबाजूला असतील त्या तार्‍यांचे स्थान आपण अगोदरच नक्की करून ठेवूं. तसे त्यांचे छायाचित्रच घेऊं. ग्रहणाच्या वेळीं ते तारे अचानक दिवसांदेखील दिसूं लागतील. त्वरित त्यांचें छायाचित्र घेऊं. जर आईनस्टाईनचें खरें असेल तर प्रकाशशलाका वक्र झाल्यामुळें सूर्याच्या आसपासच्या तार्‍यांचे स्थान ढळलेलें दिसेल. तें ढळलेलें नसेल तर न्यूटनचेंच खरें."



"ही एक ब्रिटिश मोहीम असेल. एका जर्मन शास्त्रज्ञाला बरोबर ठरवायसाठीं. न्यूटनसारख्या एका थोर ब्रिटिश शास्त्रज्ञाला त्यासाठीं चूक ठरवावें लागेल. माझ्या लाडक्या मुलाला मारलें त्या जर्मनांनीं. तरी हें काम आपण कां बरें करावें?" श्री लॉज म्हणाले. क्लोरीननें मारल्या गेलेल्या रेमंड लॉजचे वडील. हेच एडिंग्टनला स्टेशनवर भेटले होते.



"मला न्यूटनच्या तसेंच तुमच्या सर्वांच्या विद्वत्तेबद्दल आदर आहे आणि न्यूटनचा सिद्धांत चुकीचा ठरला तरीहि तो आदर कमी होणार नाहीं. कारण त्यामुळें न्यूटनचें श्रेष्ठत्त्व कमी होत नाहीं. पण विज्ञानाला राष्ट्रीयत्त्व नसतें. तें जर्मनहि नसतें वा ब्रिटिशहि नसतें. तें अखिल मानवजातीचें आहे. आणि आपण मोठ्या मनानें खरें काय तें शोधलें तर आपला मान वाढणारच आहे. शिवाय आपण नाहीं तर दुसरा कोणीतरी कधीं ना कधीं सत्य शोधून काढेलच. तो जर जर्मन निघाला तर आपल्यासारखे करंटे आपणच. तर मग हें श्रेय आपण कां घेऊं नये? त्यातून जर आईनस्टाईन चूक ठरला तर मग आपल्यासारखे भाग्यवान आपणच. त्या जर्मनांचा चांगलाच नक्षा उतरेल. पूर्वग्रह दूर ठेवा. रेमंड लॉजला जर्मनांनींच मारलें आहे. तरी माझ्याहि मनांत कोणताहि पूर्वग्रह नाहीं. अशी संधि पुन्हां येणार नाहीं. आणि हें आज तरी केवळ ब्रिटिशांनाच शक्य आहे. कारण आज पृथ्वीवरला सर्वश्रेष्ठ ‘मॅन ऑफ मेझरमेंट्स’ ब्रिटिशांकडे आहे. माझा जन्म या कार्यासाठींच झालेला आहे. तो सार्थकीं लागेल. तेव्हां कृपा करून ही संधि मला द्याच."



श्री. लॉज आणि इतर पदाधिकार्‍यांचा मोठेपणा असा कीं ऑर्थर एडिंग्टनला प्रयोगासाठीं परवानगी मिळाली आणि आर्थिक साहाय्यहि मंजूर झालें.



२९ मे १९१९. पश्चिम आफ्रिकेजवळच्या प्रिन्सिपे (Principe) बेटावरच्या डोंगरावरील एका उंच ठिकाणीं एका तंबूंत दुर्बिणी आणि इतर सामग्री. सकाळपासून मुसळधार पाऊस. काय होणार या मोहिमेचें? दुर्बिणी रोखायची वेळ झाली. पाऊस तर थांबला. पण आकाशांतली ढगांची दाटी कायम. चला दुर्बिणी तर रोखूंया. दुर्बिणी रोखल्या. पण सर्वांच्या आशाआकांक्षांना निसर्गाचें ग्रहण लागलेलें. सूर्यबिंब ढगांआड झाकलेलें. सूर्यच दिसत नाहीं तर तारे काय कपाळ दिसणार? आतां केवळ पांचच मिनिटें राहिलीं. अचानक निसर्गाची कृपादृष्टि वळली आणि ढगांचें मळभ दूर होऊन सूर्यदर्शन झालें. कॅमेरे सरसावले. आस्तेआस्ते सूर्यबिंब चंद्रामुळें झांकलें केलें. मग जास्त जास्त झांकलें गेलें. हिर्‍याच्या अंगठीचें - डायमंड रिंगचें दर्शन झालें. आकाशांत तारे लुकलुकूं लागले. सूर्यबिंब पूर्ण झांकलें. आतां हाताशीं पांचच मिनिटें होतीं. त्या काळीं म्हणजे सुमारें नव्वद वर्षापूर्वीं हें छायाचित्रण करणें कठीण होतें. तंत्र तेवढें विकसित झालें नव्हतें. दुर्बिणीतून तर फारच कठीण. आठ छायाचित्रें काढलीं. ज्यासाठीं एवढा अट्टाहास केला होता, एवढी तपश्चर्या केली होती तो क्षण सार्थकीं लागला. पैकीं सहा छायाचित्रें खराब निघालीं. दोन चांगलीं होतीं. पुढें काय? आईनस्टाईन कीं न्यूटन? तें आतां परिषदेंतच ठरेल.



परिषदेची सभा सुरूं झालीं. स्वागतकांनीं प्रस्तावना केली.



"आईनस्टाईन आणि न्यूटन, दोघांचेहि सिद्धांत आपण जाणतोंच. आपल्याकडे दोन छायाचित्रें आहेत. पहिल्या छायाचित्रांत कांहीं दूरचे तारे आहेत. दुसरें छायाचित्रहि त्याच तार्‍यांचें आहे. पण ग्रहणकाळांत घेतलेलें. दोन्हीं छायाचित्रें आपण पडद्यावर पाहाणार आहोंत. आईनस्टाईनच्या सिद्धांताप्रमाणें त्या तार्‍यांकडून निघालेल्या प्रकाशशलाकेच्या मार्गांत मध्येंच सूर्य आड आल्यामुळें जर प्रकाशशलाका वाकलेली असेल तर तेच तारे किंचित सरकलेले दिसतील. पण प्रकाशशलाका जर वाकलेली नसेल आणि सरळ रेषेंतच गेली असेल तर तारे जिथल्या तिथें दिसतील. अजिबात न सरकतां."



सभागृहांत सन्नाटा. पारदर्शिका पाहाण्यासाठीं सभागृहांतले दिवे मालवून अंधार केला गेला. सगळ्या सदस्यांची उत्सुकता ताणलेली. प्रथम पहिलें छायाचित्र पडद्यावर उमटतें. नंतर केंद्रित करून प्रतिमा स्पष्ट, रेखीव केली जाते. मग बंद करून जाऊन दुसरें उमटवलें. तें देखील केंद्रित केलें गेलें. सुस्पष्ट, रेखीव प्रतिमा. आतां पहिलें छायाचित्रहि त्याच पडद्यावर त्याच ठिकाणीं प्रक्षेपित. सर्व सदस्य डोळे फाडून पाहातात. तारे सरकले होते. आईनस्टाईनची उपपत्ति बरोबर. न्यूटनचा सिद्धांत चूक. (तांत्रिकदृष्ट्या हें विधान तेवढें अचूक नाहीं. न्यूटनच्या सिद्धांताच्या केवळ मर्यादा स्पष्ट झाल्या असें म्हणता येईल.) एडिंग्टन भाषण सुरूं करायला सरसावला. पण हाय! एका लोकशाहीवादी ब्रिटिश साम्राज्याचा नागरिक असलेल्या शास्त्रज्ञानें जुलमी जर्मन शास्त्रज्ञाची उपपत्ती प्रयोगानें सिद्ध केली! तीहि ब्रिटिश संस्कृतीचा मानबिंदू असलेल्या न्यूटनला चूक ठरवून? पुत्रवियोग झालेले संस्थाप्रमुख लॉज हा धक्का पचवूं शकले नाहींत. भावनावेगानें उठून सभागृहाबाहेर गेले. त्यांच्यामागून आणखी एकदोन सदस्य गेले.



अशा तर्‍हेनें तेव्हांपर्यंत केवळ उपपत्ति म्हणून प्रसिद्ध असलेल्या सापेक्षतेला ऑर्थर एडिंग्टननें प्रयोगसिद्ध सिद्धांताचें स्वरूप दिलें.



यांतील ‘काल’ म्हणजे time ही राशि सोपेपणासाठीं गाळलेली आहे. आणि स्पेस टाईम या संकल्पनेला फक्त स्पेस - अवकाश असें रूप दिलें आहे. नाहींतर क्लिष्टता वाढेल आणि विषय समजणें कठीण होईल.



प्रसिद्ध विज्ञानसाहित्यकार आयझॅक ऍसिमॉव्ह आईनस्टाईनला एका लेखांत ‘ग्रेट जनरल’ आईनस्टाईन म्हणतात. कारण बहुतेक वैज्ञानिकांच्या तर्काधिष्ठित उपपत्ती कालौघांत आधुनिक तांत्रिक साधनें वापरल्यावर चुकीच्या आढळल्या. उदा. डाल्टनचा अणुसिद्धांत, फ्लॉजिस्टॉन सिद्धांत, इ. इ. पण आईनस्टाईनच्या नंतर आधुनिक तंत्रानें तपासलेल्या उपपत्ती कालौघात त्यांच्या मतें अचूकच आढळल्या.



संदर्भ: १. अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम: स्टीफन हॉकिंग:१९८९. २. सूर्यमालेंतील सृष्टिचमत्कार: मोहन आपटे:२००४. ३. विकीपेडिआ, ४. द सन शाईन्स ब्राईट:आयझॅक ऍसिमॉव्ह:१९८३. ५. माहितीपट: एडिंग्टन ऍंड आइनस्टाईन: बीबीसी: एच बी ओ:२००८: निर्माता मार्क पायबस.दिग्दर्शक फिलिप मार्टिन.



पूर्वप्रसिद्धी: http://www.manogat.com/node/18632

No comments: