Saturday, April 24, 2010

नोकरशाही

मीं एका यंत्रे बनवणार्‍या खाजगी कंपनींत प्रशासकीय अधिकारी. आम्हीं बनवलेल्या यंत्रांच्या सुट्या भागांचा पुरवठा ग्राहकांना करायचें जादा काम एकदां माझ्यावर पडलें आणि मग कायम माझ्याकडेच राहिलें. चें जानेवारीचा दुसरा आठवडा. थंडीच्या दिवसांत वा पावसाळ्यांत पेप्सी कोक वगैरे शीतपेयें बनवणार्‍या कंपन्या उत्पादन दोनतीन आठवडे बंद ठेवून यंत्रे उघडतात आणि सुटे भाग मागवतात. चांगली दीडदोनशे वेगवेगळ्या भागांची यादी असते. त्यांना कोटेशन पाठवणें, प्रॉडक्शन सेल्स समन्वय साधणें अशा कामाची गर्दी होती. साल बहुधा २००२.



ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग.

"येस?"

"मि. सुधीर?"

"येस! हां बोला मेनन मॅडम, आवाज ओळखला तुमचा."

"मी दुपारीं तुमच्या युनिटमध्यें येते आहे."

"काय विशेष?"

"ऍडिशनल. आर. के. येणार आहेत एरियामध्यें. "

"????"

"ऍडिशनल कमिशनर आर. के. शर्मा हो. त्यांना रेव्हिन्यू फिगर्स द्यायला हव्यात ना! त्याच गोळा करायला येते आहे. तुमचा फोनहि वापरणार."

"अवश्य या. वाट बघतों. जेवायला येणार कीं चहाला?"

"जस्ट अ कप ऑफ टी, फोनशीं मारामारी आणि अ फ्यू गुड वर्डस."

"जरूर या. वाट बघतों."

या मेनन मॅडम एक्साईज इन्पेक्टर. अगोदर पुण्यांत होत्या. म्हणून मराठी छान बोलतात. अतिशय कार्यक्षम आणि सज्जन व्यक्ती. दीडदोन वर्षांच्या काळांत त्यांनीं आमच्याकडून कधींहि पैशांची अपेक्षा ठेवली नाहीं. आमचे कागदपत्र घेऊन त्यांच्या कार्यालयांत येणार्‍या सचीनला त्यांनीं कधींहि ताटकळत ठेवलें नाहीं. हसतमुख चेहरा आणि सौजन्यशील तत्पर सेवा हें त्यांचें वैशिष्ट्य. आमच्या कार्यालयांतल्या महिलावर्गाशीं त्यांचे छान मैत्रीपूर्ण संबंध होते. आमच्या आजूबाजूच्या कारखान्यांतून देखील असाच अनुभव होता.



- X - X - X -



ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग.

"येस?" मी.

"एक्साईजवाली मॅडम आ रही है साहब." फाटकावरचा रखवालदार.

"हां ठीक है."

ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग.

"येस?"

"मिसेस मेनन हॅज कम. शाल आय सेंड हर इन?" दूरध्वनि चालिका अर्थात टेलिफोन ऑपरेटर.

"शूऽऽअर."

"गुड आफ्टरनून मिस्टर सुधीर!"

"व्हेऽऽरी गुड आफ्टरनूऽऽन मॅऽऽडम."

मीं बझर दाबला.

"सचीन बघ कोण आलें आहे."

"अरे वा मॅडम. बसा पाणी आणतों." सचीन.

"काय ऊन आहे हो बाहेर! आंत थंड हवेंत आल्यावर बरं वाटलं. तरी जरा पंखा लावा हो पाच मिनिटं! जानेवारीत पण एवढं ऊन. तुमची मुंबईची हवा मात्र एकदम बेकार." मॅडम.

"अगदीं खरं!"



मीं पंख्याचें बटण दाबलें आणि पंखा मॅडमकडे वळवला.

मॅडमनीं पाणी पिऊन पांच मिनिटे थंड हवा खाल्ली. तोपर्यंत योगिता, शोभा, सुमती वगैरे येऊन मॅडमना हाय हलो करून गेल्या. मनांतल्या मनांत मीं मॅडमच्या पी आर ला सलाम केला.



"थर्सडे नाहींतर फ्रायडेला ऍडिशनल येणार आहेत एरियामध्यें." मॅडम.

"ही इज वेलकम. बट पर्पज? रेव्हिन्यू ड्राईव्ह कां?" मी.

"हो."

"नो प्रॉब्लेम."

"तीन महिने सगळी ड्यूटी पी एल ए मध्यें भरायची."

"प्रयत्न करूं."

"किती भराल?"

"ऑर्डर किती आहे आणि किती डिलीव्हरी देऊं शकूं त्यावर अवलंबून आहे. तुम्हांला ठाऊक आहेच कधीं कधीं आम्हीं बनवलेलें मशीन तयार असतें पण पेमेंट येत नाहीं, माल जात नाहीं आणि ड्यूटी पेयेबल कमी असते. पण रेअरली. तरी ड्यूटी क्रेडिट भरपूर पडलेलें असतांना कॅश ड्यूटी कोण, कुठून आणि कां भरणार? या पैसे खाणार्‍या पगारी नोकरांना पैशाची व्हॅल्यू कुठून कळणार? इन्फ्लेटेड रेव्हिन्यू फिगर्स संसदेत दाखवून जनतेची दिशाभूल करायला आम्हीं हातभार लावायचा. खोट्या डिमांड्स काढून ऍसेसीला त्रास द्यायलाहि हे तयार. म्हणजे आम्हीं खोटेपणा करून, आर्थिक नुकसान सोसून त्यांना सहकार्य करयचें आणि वर यांच्या अधिकार्‍यांनीं आम्हांला त्रास देऊन पैसे काढायचे. जास्त शहाणपणा केलाच तर मीं सुनावणार तुमच्या साहेबांना. ऑफिसांत बसून काम करायचें सोडून असें फिरून आपण भरलेल्या टॅक्समधून सरकारी पैशाची उधळपट्टी करून फिरायला यांना सांगितलें कोणी?" मीं न राहवून तिडिकीनें बोललों.

"अगदीं खरं आहे तुमचं. मीं निरोप पोचवला. मला मधें घालूं नका. आतां तुम्हीं आणि ते; बघून घ्या काय ते."

"मीं सगळी माहिती काढून तुम्हांला तासाभरांत फिगर्स देतों."

"एप्रिल टू डिसेंबर लास्ट थ्री इयर्स आणि या वर्षींची फिगर. लक्षांत आहे ना? मीं बसूं तोपर्यंत?

"हक्कानें आरामांत बसा. फिगर्स योगिता देईल. मीं खालीं फॅक्टरींत जाऊन डिलीव्हरी स्टेटसची माहिती काढतों. तोपर्यंत कांहीं लागलें तर योगिता, विलास आणि सचीन आहेतच. सेवेला फोन आहेच."

"आणखी एक भानगड आहे हो."

"?? ??"

"तुमचे डायरेक्टर इथें असायला पाहिजेत हो. साहेबांची इच्छा आहे कीं तुम्हीं त्यांना खालीं गेटवर पर्सनली रिसीव्ह करून वर आणायचें. बरोबर एक ए.सी. आणि चार सुपरिंटेंडंट आणि साताठ इन्स्पेक्टर्स असतील."

"जमणार नाहीं. कोणीहि लहानमोठा अधिकारी असो. त्याचा ड्यू रिस्पेक्ट मीं त्याला देणारच. पण समान पातळीवरून. हवें तर येतील, नाहींतर गेले उडत. डायरेक्टर मुंबईत असले तर जरूर इथें असतील. पण त्यांच्यासाठीं मात्र थांबूं शकणार नाहींत. आमचे क्लायंट्स ऑल ओव्हर इंडिया पसरलेले आहेत. बिझिनेस फर्स्ट. बिझिनेस असेल तर ड्यूटी जमा होईल. एक्साईजचें बघायला मीं आहेच."

मॅडमचा चेहरा चिंतातुर.

"त्यांच्या बैलाला ... ! काळजी करूं नका हो मॅडम! सगळें ठीक होईल. आम्हीं चोर्‍या करीत नाहीं आणि तुम्हींहि करीत नाहीं. आमचें किंवा तुमचें कोणीहि कांहीहि वाकडें करूं शकणार नाहीं. जरा माझ्याकडून बिनधास्त राहायला शिका." मी.

बैलालामुळें त्यांचा झाकोळलेला चेहरा उजळला. "आमचे मोठे बॉस आहेत हो तेऽऽ. आतां देवावर भरोसा." मॅडम.



- X - X - X -



ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग.

"येस?"

"एक्साईजवाले आयें हैं साहब." रखवालदार.

"ऊपर भेजो."

"वे आपको नीचे बुला रहे हैं."

"फोन दो उनको."

"येस?"

"अहो सुधीरसाहेब! त्यांना रिसीव्ह करायला येताय ना?" कोणीतरी एक सुपरिंटेंडंट.

"सॉरी मीं कामांत आहे. तुम्हींच वर आणा त्यांना."

"साहेब रागावतील."

"आय कांट हेल्प."

शिपायाला सांगितलें कीं त्यांना डायरेक्टरांच्या समोरच्या खुर्चीवर बसव आणि डायरेक्टरांना पण खालून कारखान्यातून वर बोलव. ते स्थानापन्न झाल्यावर मीं त्यांना भेटलों, माझी ओळख करून देऊन हस्तांदोलन केलें, तीन वर्षांची व चालू वर्षांची आंकडेवारी दिली. तोपर्यंत डायरेक्टर आले. त्यांची ओळख करून दिली.



"एप्रिलतक तीन महिने सेनव्हॅट क्रेडिट को हाथ नहीं लगानेका. सब ड्यूटी पी.एल.ए. में भरनेका." आर. के.

स्वरांत भरपूर गर्व आणि आढ्यता. आमच्या संचालकांना तें अजिबात आवडलें नाहीं आणि तें त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट उमटलें.

"कोशिश करेंगे." संचालक.

"सिर्फ कोशिश नहीं चलेगी. रिझल्ट आना चाहिये."

"कोशिश तो जरूर करेंगे. लेकिन पैसा रहेगा तो भर सकेंगे ना."

"कहां से भी लाइये. आप के पर्सनल खाते से डालिये." भोंवतीं तोंडपुजेपणा करणारांच्यांत राहून या आर. के. शर्मा साहेबांना वाटेल तें बोलायची संवय झाली होती.

"कहां से लाऊं? अगर पास पैसा हो तो फॅक्टरी डालने की और इधर गधामजदूरी करने की क्या जरूरत है?"

"आप लोग पैसा छिपाके रखते हैं. वो निकालो. बॅंक से फिनान्स लो, कुछ भी करो करो लेकिन सेनव्हॅट को हाथ भी मत लगाओ."

तेवढ्यांत संचालकांना ग्राहकाकडून दूरध्वनि आला. दोन तीन मिनिटें बोलल्यावर संचालक मला हलक्या आवाजांत म्हणाले, "सुधीर, आपहि बात करो. मैं इन्हें नहीं समझा सकता. जो मुझे बोलना है वो मैंने बोल दिया है. आय कांट कीप माय कस्टमर वेटिंग." आणि ते खुर्चींट मागें रेलले आणि खुर्ची किंचित मागें सरकवली.



मीं माझी खुर्ची आतां संचालकांच्या बाजूला ओढून घेतली. "देखिये साहब, प्लीज डू नॉट बी पर्सनल. पैसा कहांसे लायेंगे हम." मी.

"मैं इतना लंबा टाईम निकालके आपके पास आया और आप इतना भी नहीं कर सकते?"

"आपने आपका ड्यूटी किया. हम हमारा कर रहे हैं." मी.

"वो मैं कुछ भी नहीं जानता, आप को ये करनाहि पडेगा."

"हम कोशिश तो जरूर करेंगे, आप प्लीज हमारे ऊपर विश्वास रखिये."

"मुझे कोशिश नहीं चाहिये, रिझल्टस चाहिये. आप किधरसे भी फिनान्स खडा कीजिये."

"पहलेसेहि आपका डिपार्टमेंट झूठी डिमांड्स निकाल रहा है? हम काम करेंगे कि डिमांड्स को जबाब देंगे?" मी.

"ऐसी कौनसी डिमांड्स है? मैंने तो नहीं सुना? क्या बता रहे हैं आप?"

"नोशनल इंटरेस्ट. अगर हम कस्टमर से ऍडव्हान्सेस लेंगे, तो वो अमाउंट्स के ऊपर थर्टीन पर सेंट नोशनल इंटरेस्ट ऍझ्यूम करके यू रेझ डिमांड ऑन दॅट इंटरेस्ट. ऍडव्हान्स लेंगे तो डिमांड आती है. डिमांड आती है इसलिये ऍडव्हान्स नहीं ले सकते. ऍडव्हान्स नहीं लेंगे तो पैसा कहां से लायेंगे? और आप अभी बोल रहे हैं कि फिनान्स रेझ करो. अब फिनान्स कैसा रेझ करने का? कैसा करेंगे हम बिझिनेस. टुडे डिमांड्स वर्थ एटी लॅक्स आर पेंडिंग फॉर लास्ट फाईव्ह ईयर्स. हाव अबाऊट दीज डिमांड्स? कॅन यू विथ्ड्रॉ दीज डिमांड्स?" मी.

"क्या बात कर रहें हैं?"

बाजूला बसलेल्या एका असि. कमिशनरना, नेगींना त्यांनीं विचारले, "इज इट ट्रू?" जणुं त्यांना कांही ठाऊकच नव्हतें. खरें तर हा इशू कमिशनरपासून शिपायांना सगळ्यांना ठाऊक होता. हे साहेब वेड पांघरून पेडगांवला निघाले होते.

"हां साब." नेगीसाहेब - त्यांच्याबरोबर आलेले असि. कमिशनर. उद्गारले, "लेकिन सभी को है ये डिमांड्स."

"इसके बारे में हम अपकी जरूर मदद करेंगे सुधीरसाहब." आर. के.

"हम मदद नहीं चाहते, हम जस्टीस चाहते हैं. ऑल दीज डिमांड्स आर फिक्टीशस ऍंड अनजस्ट ऍंड ऑल ऑफ यू नो इट वेल. आप हमें बोलते हैं की रिझल्ट्स चाहिये. बट यू आर नॉट कमिटिंग एनीथिंग. धिस इस नॉट फेअर. यू टूऽऽ कमिट समथिंग इफ यू एक्स्पेक्ट अस टू. वी विश टु कॅरी ऑन आऽऽर बिझिनेस पीसफुली बट यू पीपल आर सिंपली क्रीएटिंग न्यूसन्स."

माझा सडेतोड युक्तिवाद त्यांना अजिबात आवडला नाहीं. पण आमचे संचालक एकीकडे हें ऐकत होते आणि आतां त्याचें फोनवर बोलून झालें होतें. त्यांच्या चेहर्‍यावर समाधान झळकलें.

"आप ड्यूटी पीएल ए में भरेंगे की नहीं?" स्वतःच्या वरिष्ठासमोर लाळ घोटणारा मनुष्य आमच्यावर वर्चस्व गाजवायला पाहात होता.

"पैसा रहेगा तो जरूर भरेंगे. लेकिन आप ये डिमांड्स का क्या करेंगे?"

"वो मैं बता नहीं सकता पर ड्यूटी तो पी एल ए मेंहि भरना पडेगा."

"धिस इज एक्स्ट्रा लीगल." मी. आतां इतर जमवलेले ए.सी., सुपरिंटेंडंट वगैरे अस्वस्थ. पण त्यांच्या आढ्यतेखोर बॉसला मीं दिलेलीं सडेतोड उत्तरें त्यांनाहि आवडलेलीं. जणूं त्यांना जे बोलतां येत नव्हतें तें मीं बोलत होतों. आर. के. भडकलेले. पण त्यांना काय बोलावें सुचत नव्हतें.

"लेकिन हमारा नुकसान करके ड्यूटी पी एल ए में भरनेका आपको क्या फायदा?" आतां रागरंग ओळखून मीं मुद्दा भलतीकडे वळवला.

"हमारा रेव्हिन्यू ऍचिव्हमेंट जादा दिखना चाहिए." आर के.

"बट देन दीज फिगर्स विल बी आर्टिफिशली इन्फ्लेटेड, ऍंड विल मिसगाईड द फिनान्स कमिशन व्हाईल प्रीपेअरिंग नेक्स्ट बजेट." मी.

"आप जादा बात कर रहे हैं. आप सिर्फ इतना बता दो कि आप पूरा ड्यूटी पी एल ए में भरेंगे कि नहीं? मैं इतना लंबा चला आया और आप इतना भी नहीं कर सकते?"

"ऑल दीज ऑफिसर्स अपना ऑफिस का काम छोडके ऑन ड्यूटी इधर आये हैं, दे आर पेड फ्रॉम मनी गॅदर्ड फ़्रॉम टॅक्सेस कलेक्टेड फ्रॉम अस. धिस इस शीअर वेस्ट ऑफ पब्लिक मनी. और मैं जादा नहीं, एकदम सही बात कर रहा हूं. यू जस्ट कॅन से एनीथिंग बट आय विल नॉट कीप लिसनिंग डंबली. आय ऍम परफेक्टली राईट ऍट वॉट आय से. बट स्टिल हम कोशिश करेंगे. जस्ट फॉर यॉऽऽर गुड वर्ड." मीं.



हे मात्र त्यांच्या पचनीं पडलें नाहीं. वैतागून ते उठले, नाईलाजानें हस्तांदोलन करून निरोप घेतला. पण नंतर त्यांनीं आमच्या मागें नंतर एक बोगस इन्क्वायरी लावली.



- X - X - X -



दिवाळी दोन आठवड्यांवर आलेली. सुटे भाग पुरवायचें खातें उगीचच माझ्याकडे आलेलें. गंमत आणि विरंगुळा म्हणून तें काम साताठ वर्षें जरा जादाच उत्साहानें केलेलें. त्या कामाचा एक भाग म्हणून दिवाळींत ‘विश’ घालणारीं भेटकार्डें पाठवावीं लागतात. त्या मोसमी कामाच्या पुरानें मीं पुरता रंजीस आलेलों. दुपारचे पावणेचार वाजलेले. केव्हां एकदांचे पांच वाजतात आणि निघतों असें झालेलें. कितीहि काम असलें तरी पांचला निघायचेंच असा माझा खाक्या. मी सहसा कार्यालयाची गाडी वापरीत नाहीं. मग सार्वजनिक वाहनांतून गर्दी होण्यापूर्वीं परतीचा प्रवास करतां येतो आणि प्रवासांत वाचनहि होतें. पण एकदां कां उशीर झाला आणि गर्दी वाढली कीं प्रवासांतलें वाचन नीट होत नाहीं. अंधेरी पूर्वेला द्रुत महामार्गावर - हायवेवर एक पूल - फ्लाय ओव्हर होत होता आणि सलग तीन वर्षें वाहतुकीची पार वाट लागली होती. साडेतीन किलोमीटरचें अंतर पार करायला तासतास लागत असे. अणि अपघात वगैरे झाला तर विचारायलाच नको. एकदां साडेसहाला मीं बसमध्यें बसलों तो नऊ वाजतां अंधेरीला पोहोंचलों. सुदैवानें मस्त पुस्तक हातांत होतें तें बरेचसें वाचून झालें. बहुधा विश्वास पाटलांचें पानिपत असावें. वि. ग. कनिटकरांचें नाझी भस्मासुराचा उदयास्त, पाटलांचेंच महानायक, लिझ मेईटनरचें चरित्र, किरण बेदीचें आय डेअर, इ. मस्त पुस्तकें मीं वाहातुकीच्या खोळंब्याला दुवा देत वाचलीं. तसा काय मोठासा फरक पडतो? घरीं जाऊन वाचायचे तें बसमध्यें वाचलें. फक्त जोडीला चहापाणी वा तोंडांत टाकायला शेंगदाणे नव्हते. वहातुकीच्या खोळंब्याला दुवा देणारा मीं अंधेरीचा तरी बहुधा एकमेव माणूस असणार. असो. विषयांतर झालें. लवकर घरीं पोहोंचलें कीं वाचन, चिंतन, मनन, लेखन, संगीतादि छंदांना न्याय देतां येतो. खेळ आणि विज्ञान कला, साहित्य, संगीत वगळतां चित्रवाणीच्या कार्यक्रमांशीं माझें तसें वावडेंच. लौकर जेवून लौकर झोपलें कीं दुसरे दिवशीं सकाळीं लौकर उठून प्रभातफेरी आणि पुन्हां हे छंद जोपासतां येतात. माझे स्नेही आमच्या कंपनीचे हिशेबनीस ऊर्फ अकाउंटंट श्री. राशिनकर यांना मीं गमतीनें बोलत असे कीं अकार्यक्षम माणसांनाच उशिरां काम करावें लागतें. प्रसंगीं कामाचा वेग वाढवून बरोबर पांचला काम संपवूं शकतात ते खरे कार्यक्षम. ते उत्तर देत कीं आळशी, कामचुकार माणसें काम टाकून वेळेवर पांचला पळतात. अर्थाच हा सारा गमतीचा भाग आहे. लौकर झोपणें लौकर उठणें व उशिरा झोंपणें उशिरां उठणें इ. जीवनशैली प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि त्यांत श्रेष्ठ कनिष्ठ ठरवायचा कोणालाहि अधिकार नाहीं. दोन्हीं जीवनशैलींत सासरख्याच कार्यक्षम आणि यशस्वी व्यक्ती आढळतात.



असो. तर एका घाईगर्दीच्या दिवशीं पावणेचार वाजलेले. केव्हां एकदांचे पांच वाजतात आणि निघतों असें झालेलें.

ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग.

"येस?"

"साहब, पांच एक्साईजवाले साहब ऊपर आ रहे हैं." रखवालदार.

"आपका रजिस्टर में लिखा क्या?" मीं

"मैंने बुक लिखने के लिये बोला पर उन्होंने लिखा नहीं."

"ठीक है."

तो रिसिव्हर ठेवतो तोंच,

ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग.

"येस?"

"फाऽऽईव्ह पऽर्सन्स फ्रॉम एक्साऽऽईज हॅव कम. शाल आय सेंऽऽड देम?" दूरध्वनि चालिका.

"ओ के." मी.

"मीं एक्साईज इन्स्पेक्टर शिंदे. हे सुपरिंटेंडंट XXX, हे इन्पेक्टर अमुक अमुक, हे तमुक तमुक."

"बसा साहेब! वेलकम टू हिल्डन. मी सुधीर कांदळकर, एडीएम. एक्साईज पाहातों." (इतरांना) "बसा साहेब, बसा!!"

बझर दाबून पाणी मागवलें. चहा थंड पेय जे हवें तें मागवलें. "बोला. आज रूटीन व्हिझीट कीं विशेष काम?"

"आम्हीं व्हिजिलन्स मधून आलों. स्पेशल इन्व्हेस्टिगेशन आहे."

"ठीक आहे. प्रथम तुमच्या कोणाहि एकाचें आय कार्ड प्लीज." मी.

शिंदेसाहेबांनां ओळखपत्राची मागणी रुचलेली दिसली नाहीं, पण दाखवलें. मीं डायरीत ओळखपत्र क्रमांक टिपून घेतला. क्रमांक टिपून घेतला म्हणून ते कांहींसे अस्वस्थ झाले.

"ए.सी. (असिस्टंट कमिशनर) चें लेटर?" मी.

"हें पाहा." शिंदेसाहेब.

मीं शिपायाला तें पत्र घेऊन आमच्या संचालकांकडे द्यायला सांगितलें. पण शिंदेसाहेबांनीं आक्षेप घेतला. म्हणाले, "लेटर आम्हीं पार्टीला देत नाहीं"



दिवाळी आली कीं हे लोक आपल्या कार्यकक्षेपासून दूरच्या विभागांतल्या कारखान्यांच्या दौर्‍यावर अनधिकृतपणें जातात, दमदाटी करतात व पैसे उकळतात कोणी तक्रार केलीच तर तो मी नव्हेच. हें जगजाहीर आहे. म्हणजे इन्स्पेक्टर खराहि आणि तोतयाहि. त्यामुळें त्यांच्या हस्ताक्षरांत नोंद होणें महत्त्वाचें असतें.



"हे बघा साहेब, या पत्रांत तुमच्या भेटीचा उद्देश - पर्पज ऑफ व्हिझीट - लिहिलेला नाहीं. तुम्हीं तोंडीहि तो सांगितलेला नाहीं. तुम्हांला माझें सहकार्य हवें असेल तर मला लेटर पाहिजे, नाहींतर माझ्या साहेबांना भेटा." मीं.

ते आतां भरपूर रागावले. त्यांचा चेहराच सांगत होता. मग ते त्यांच्या सुपरिंटेंडंटशीं काहींतरी बोलले. मग मला म्हणाले, "तुम्हांला कॉपी घ्या पाहिजे तर पण ओरिजिनल आम्हीं देणार नाहीं."

आतां माझा मेंदू वेगानें काम करायला लागला होता. "ठीक आहे. हें एक्साईजचें व्हिझीट रजिस्टर भरा." (रजिस्टरमध्यें भेटीचा हेतू - पर्पज ऑफ व्हिझीट हा एक रकाना आहेच.)

"तें सगळें इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्यावर नंतर भरूं."

मीं शिपायाकडून एसीच्या पत्राची प्रत संचालकांना पाठवली व सांगितलें कीं एक्साईजवाले साहेब लोक ओरिजिनल देत नाहींत, गेटवरचें बुक लिहिलें नाहीं व एक्साईज व्हिझीट रजिस्टर नंतर लिहिणार म्हणतात. काय करायचें विचार.



- X - X - X -



ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग.

"येस सर?"

संचालकांनीं अंतर्गत दूरध्वनीवरून विचारले व मीं व्यावसायिक शब्दांत खरे तें सांगितलें.

"क्या करना चाहिए अब हम?" त्यांनीं विचारलें.

"आपकी परमिशन चाहिए सर, ओरिजिनल लेटर बिना इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट करने के लिये. एक्साईज का व्हिझीट रजिस्टर ये लोग बाद में लिखेंगे करके बोल रहें हैं. मेरे ऑथोरिटी में मैं यह नहीं कर सकता." मी.



माझा आणि संचालकांचा आपसांतला संवाद चांगला असे. म्हणजे कुणाहि अधिकार्‍यासमोर मीं काहींहि बोललों किंवा कागदाचें चिटोरें मोजके शब्द खरवडून पाठवलें तरी छुपा अर्थ त्यांना अचूक कळत असे. म्हणजे शोधकार्य - इन्व्हेस्टिगेशन बोगस असूं शकतें हें आमच्या सूज्ञ संचालकांना कळलें.



इथें मात्र मी फक्त त्यांची परवानगी घेत आहे असा अर्थ निघाला आणि माझ्या शब्दांनीं तणाव बराचसा कमी झाला.

"ठीक है. काम चालू करो, उन्हें चायपानी, खानापीना दे दो और जरा मुझे आके मिलो." संचालक.

"काय काय रेकॉर्ड्स पाहिजेत साहेब?" मीं.

"एक्साईज अकाऊंट्सपैकीं लिस्ट ऑफ रेकॉर्ड्स, डेली प्रॉडक्शन रिपोर्ट, आर. जी. वन, पी. एल. ए, सेनव्हॅट रजिस्टर, इनपुट स्टॉक रजिस्टर, जॉब वर्क रजिस्टर, आणि फिनान्शिअल अकाउंट्सपैकीं कॅश बुक, बॅंक बुक, बॅंक स्टेटमेंट, सेल्स रजिस्टर, जी. एल., पर्सनल लेजर, गेटवरचें मटेरिअल इनपुट रजिस्टर, आणि इतर प्रायव्हेट रेकॉर्ड्स."

मीं प्रथम माझ्या कॅबिनमधलें डाव्या बाजूचें टेबल रिकामें करून तिथें दोन इन्स्पेक्टर्सना बसून काम करायची सोय केली, माझ्या टेबलवर समोर दोन इन्स्पेक्टर्स बसले आणि सुपरिंटेंडंटना माझ्या टेबलाशीं उजव्या बाजूला बसवलें, एक्साईज अकाउंट बुक्स त्यांच्यासमोर ठेवलीं. नेहमीं प्रशस्त वाटणार्‍या कॅबिनला आतां झोपडपट्टीची गर्दी आणि अवकळा आली. चारजणांचें काम सुपरिंटेंडंटच्या मार्गदर्शनाखालीं सुरुं झालें. त्यांना हवें नको बघायला (खरें तर त्यांच्यावर लक्ष ठेवायला) एक शूर शिपाई दिला आणि संचालकांना भेटलों.



"एनी सीरिअस मॅटर?" संचालक.

"नॉट ऍट ऑल." मीं.

"अपने रेकॉर्ड्स ठीक? एनी लॅप्स? अनी अदर लॉ पॉईंट?"

"सब रेकॉर्ड्स अप टु डेट. नो लॅप्सेस ऍट ऑल. नो एनी डिस्प्यूटेबल लॉ पॉईंट"

"फिर काय के लिये आये हैं?"

"दिवाली नजदीक आयी है ना! चंदा जमा करते होंगे. इसलिये व्हिझीट रेकॉर्ड नहीं करना चाहते हैं ऐसा लग रहा था. लेकिन इन सच केसेस उनका ऍप्रोच अलग रहता है. मीठी बात करते हैं, चायपानी लेते हैं और पॅकेट लेके जाते हैं. मैनें ‘रूटीन व्हिझिट है क्या’ करके पूछा भी. स्पेशल इन्व्हेस्टिगेशन है करके बोला. कभी कभी उनकी एक्स्पेक्टेशन हाऽऽय रहती है तब ऐसा नाटक करते हैं. या इन्व्हेस्टिगेशनका कोटा पूरा करना भी हो सकता है. बट मोस्ट लाईकली रॅंडम सिलेक्टेड सरप्राईज इन्स्पेक्शन रहेगा. वो ऍडिशनल कमिशनर आया था पीछे, उसने लगाया होगा. और ये लोग एक्साईज व्हिझीट बुक, बाद में लिखेंगे. चाहिये तो हम कमिशनर ऑफिस में से पूछके कन्फर्म कर सकते हैं कि यह व्हिझीट ऑफिशिअल है या नहीं."

"ठीक है. अगर रीझनेबल कॉस्ट में पटता है तो पैसा फेंकके भगाओ. जादा मांगते हैं तो बारगेन करो. चाहिए तो मेरी मदद ले लो. अपना काम में ये खोटी तकलीफ क्यूं चाहिये? अपना काम का टाईम बचाने के लिये पैसा देने का. अगर अपना कुछ मिस्टेक नहीं तो डर कायका? जादा नाटक करते हैं तो करते हैं वो करने दो. फिर एक पैसा भी मत दो. जादा से जादा क्या, झूठा डिमांड ठोकेंगे. वी शाल फाईट ऍंड विन."

"ऍबसोल्यूटली राईट सर. फर्स्ट प्रेफरन्स टु सेटल ऍमिकेबली. अदरवाईज लेट देम हिट देअर हेड."

मीं पुन्हां माझ्या जागेवर आलों. आतां सुपरिंटेंडंटना विचारलें कीं रूटीन व्हिझिट आणि जास्त अपेक्षा असेल तर स्पष्ट बोला. आडपडदा ठेवायचें कारण नाहीं. त्यांनीं नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले कीं तसें असतें तर आनंद वाटला असता.

मी म्हटलें "मग तुम्हीं ए.सी. चें लेटरहि देत नाहीं आणि व्हिझीट बुकहि लिहीत नाहीं हे कसें काय? शिवाय आमच्या रेंज एरियातले आम्हीं हाईयेस्ट रेव्हिन्यू पेयर्स आहोंत. आमचे प्रॉडक्ट हें कंझ्यूमर प्रॉडक्ट नाहीं. सर्व ग्राहक हे कोका कोला, पेप्सी इ. उद्योगसमूह असून त्यांना आम्हीं भरलेल्या संपूर्ण एक्साईज ड्यूटीचें क्रेडिट मिळतें. त्यामुळें आमच्या प्रॉडक्टचा काळा बाजार होण्याची शक्यता शून्य आहे आणि म्हणून आमचें नांव रॅंडम इन्व्हेस्टिगेशनला येण्याची शक्यता पण कमी आहे."

"आम्हीं व्हिझीट बुक लिहिणार. काळजी करूं नका."



- X - X - X -



ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग.

नंबर नजीबाबादचा दिसत होता. आमचे कस्टमर्स कोका कोला आणि पेप्सी यांचे कारखाने भारतभर विखुरलेले आहेत.

"हॅलो, मि. सुधीर?

"येस सर? बोलिये शैलेशजी. कैसे हैं आप? हुकूम फरमाइये."

"व्हेरीसील एक सेट बहुत अर्जंटली चहिये. और एक बात, सीओडी (डिलीव्हरी अगेंस्ट पेमेंट मत करना, डायरेक्टली भेजना. बीसपचीस हजार का मामुली अमाउंट रहेगा. मैं एक हप्तेमें पेमेंट निकालूंगा."

"ठीक है आजहि निकलवाता हूं. अभ्भी कोटेशन भेजता हूं, लेकिन आप पी.ओ. आजहि मेल या फॅक्स करना."

"इधर लाईट नहीं है, कॉम्प्यूटर और फॅक्स दोनों बंद है, जैसे लाईट आती है वैसे भेजता हूं."

"मिसेस अनिता को जरा फोन पर पी.ओ. नंबर दे देना, हमारे बिल पर होना जरूरी है. नहीं तो पेमेंट को तकलीफ होगी. मैं लाईन ट्रान्स्फर करता हूं. अनिता, शैलेश इराडा ऑफ नजीबाबाद इज ऑन लाईन. टेक पी.ओ. नंबर, सेंड कोटेशन फॉर सिक्स व्हेरीसील्स, प्राईस थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड ईच प्लस प्लस ऍज युज्वल, ऍंड अरेंज फॉर द डिस्पॅच टुडे इटसेल्फ. टेल मारिओ, बोना बिझी है."

"येस सर!" अनिता.



- X - X - X -



"ऑपरेटर, कस्टमर के कॉल्स अनिता को देना, इफ शी इज बिझी तो साहब को दे देना." मी.

"ओ.के. बट रिसेंट कॉल वॉज रिसिव्ह्ड बाय यू डिरेक्टली. आय डिड नॉट गिव्ह इट."

"येस आय नो इट व्हेरी वेल. बाय."



- X - X - X -



"ठीक आहे शिंदेसाहेब. नो प्रॉब्लेम. तुम्हाला जें तपासायचें तें तपासा. तुम्हाला माझें पूर्ण सहकार्य मिळेल. फक्त एक करा. पण आम्हांला फार त्रास देऊं नका. आमची कार्यालयाची वेळ साडेआठ ते पांच आहे. आम्हीं सर्व आतां दिवसभर काम करून थकलेलों आहोंत. तेव्हां शक्यतों काम पांचपर्यंत आटपा. नंतर माझा स्टाफहि घरी जाणार. स्टाफ गेल्यावर मात्र मी काहींहि मदत करूं शकणार नाहीं. तुमचें काम चालूं राहिलें तरी चालेल. माझ्या मदतीला फक्त शिपाई असेल. तो चहा, खाणेंपिणें याची सोय करेल. आणि नंतर घरीं जातांना वाहतूक कोंडी वगैरेचा त्रास साडेआठनऊपर्यंत असेल. आणि स्पष्टच सांगतों कारण अपेक्षा आणि गैरसमज नकोत, तुम्हीं आमचे शत्रु नाहीं आहांत. पण कायद्यानें चालत आहांत तेव्हां तुमची घरीं जायची सोय तुमची तुम्हांला करावी लागेल. मीं तुम्हाला परतीच्या प्रवासाला गाडी वगैरे देणार नाहीं. फार फार तर माझ्या मालाडच्या रस्त्यावर मीं दोनतीन जणांना कुठेंतरी सोडूं शकेन. तुमच्या कामाच्या प्रगतीवरून तुम्हांला तीन ते चार दिवस लागतील असें वाटतें." मीं.



गेटवरून रखवालदाराकडून मीं व्हिजीटर्स रजिस्टर मागवलें, त्यांच्यासमोरच पावणेचारची वेळ टाकून पांचहि जणांची नोंद केली आणि रिफ्यूज्ड टु साईन असा शेरा लिहून माझी स्वाक्षरी ठोकली. जरी सौजन्यानें वागणार असलों तरी आतां कायद्याच्या दृष्टीनें कांटेकोर काळजी घेणार होतों. कांहीं शंका आलीच तर आमचे कंन्सल्टंट श्री. बी. एच जोशी, सेवानिवृत्त एक्साईज असिस्टंट कमिशनर हे दूरध्वनीवर उपलब्ध होतेच.



आतां काम सुरुं झालें. त्यांच्याकडून एक्साईज अकाउंटबद्दल एकेक प्रश्न येत होते आणि मीं उत्तरें देत होतों. हिशेबाबाबत प्रश्नांची उत्तरें द्यायला मीं आमचे श्री. विलास जाधव यांना बसवलें. सगळ्या बाबी सभ्य आणि सौजन्यपूर्ण शब्दांत स्पष्ट केल्यामुळें त्यांनीं अवास्तव अपेक्षा ठेवल्या नाहींत व ताण निवळला. आम्हां सर्वांच्या आत्मविश्वासानें शिंदेसाहेब मात्र नाराज झालेले दिसले. त्यांनीं स्टोअर्सचे हिशेब पाहाण्याची इच्छा व्यक्त केली. त्वरित त्यांना स्टोअरमध्यें पाठवून दिलें व स्टोअर कीपर श्री. बोना डिसोझांना तशा सूचना दिल्या.



- X - X - X -



आतां त्यांचें काम होईपर्यंत कंटाळवाणॆं वाट पाहाणें. त्यांच्या तुरळक प्रश्नांचीं उत्तरें देणें. विरंगुळा म्हणून तसेंच वेळ घालवायला करायला मी एका वाह्यात मित्राला दूरध्वनि केला. माझ्यासमोर हे लोक होतेच.



"काय रे सेक्रेटरीच्या मिठीतून वेळ बरा मिळाला मला फोन करायला? पहिले तिचे गळ्यातले हात बाजूला कर आणि मग बोल." मित्ररत्न. (ही केवळ गंमत बरें कां, ती माझी मुलगी शोभेल.)

"जें न देखें रवी! सध्यां अशोकवनांत आहे." मी.

"कोण ती का तूं?"

"मी गप्पच."

"कोण तूंच कां"

"हो."

"राक्षसिणींच्या पाहार्‍यांत कां?"

"हो!"

"सरकारी लोक जमलेत?"

"कित्ती हुश्शार रे तू?"

"टेन्शन कमी करायला फोन केलास?"

"कसं रे तुला एवढं कळतं? बोलूनचालून मित्र कोणाचा? माझ्या सहवासांत थोडीफार अक्कल आली बरं तुला."

"खास कारण नसलें तर पांचनंतर फोन करूं नकोस. मीं झोंपणार आहे. आणि तुला रे काय? तू पोलिस कमिशनरची लंगोटी पण काढून आणशील."

"हॅ! हॅ!! हॅ!!!" मी दुरध्वनि ठेवला.



- X - X - X -



पंधरा वीस मिनिटांनीं शिंदेसाहेब आणि डिसोझा असे दोघेहि माझ्याकडे परत आले.

शिंदेसाहेबांचा पारा चढलेला. "तुमच्या स्टोअर कीपरला सांगा की जास्त शहाणपणा करूं नकोस म्हणून."

मीं शांत, थंड स्वरांत ओठांवर स्मित ठेवत संथपणें म्हणालों, "पहिली गोष्ट म्हणजे ‘शहाणपणा’ हा शब्द गैर आहे. आणि गैर शब्द वापरूं नका. डिसोझा आमचे मान्यवर एम्प्लॉयी आहेत. तुमच्या घरचे नोकर नाहींत. तुम्हांला कांहींहि प्रॉब्लेम आला तर मला सांगूं शकतां." मी.

"नॉन सेनव्हॅटेड वस्तूंचें स्टॉक रजिस्टर पाहिजे मला." शिंदेसाहेब.

"तें आपण मेंटेन करीत नाहीं साहेब." डिसोझा.

"हो. बरोबर. ठाऊक आहे. मला." मीं.

"तुम्हांला मेंटेन करावें लागेल. नाहींतर आम्हांला ऍक्शन घ्यावी लागेल." शिंदेसाहेब.

माझा स्वर थंडच, "हें पाहा साहेब, पहिली गोष्ट म्हणजे हें रजिस्टर कायद्याप्रमाणें आवश्यक नाहीं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हीं फक्त इन्व्हेस्टिगेशन करून तुमचा अहवाल पाठवूं शकतां. कोणतीहि ऍक्शन तुम्ही घेऊं शकत नाहीं तेव्हां तुमच्या मर्यादा ओळखून बोला. तुम्हांला शांतपणें सहकार्य देणार्‍या आमच्या एम्प्लॉयीला दमदाटी करायचें तुम्हांला कांहीहि कारण नाहीं नाहींतर मीं ‘व्हेक्सेशस बिहेवियर’ किंवा ‘कोअर्सिव्ह मेझर्स’ म्हणजे ‘धाकदपटशा दाखवणें’ वा ‘कठोर कारवाई करणें’ अशी तक्रार तुमच्याविरुद्ध करूं शकतों. कुठल्या सेक्शनखाली कीं रूलखालीं तें तुम्हांला ठाऊक असेलच. मग आमच्याबरोबर तुमचीहि चौकशी चालू होईल. तोपर्यंत तुमचें इन्क्रीमेंट आणि ईबी होल्ड होतील. आमच्या प्रॉडक्टमध्यें काळ्या बाजाराला बिलकुल वाव नाहीं. पुन्हां एकदां सांगतों कीं आमचें युनिट हें रेंजमधलें हाईयेस्ट टॅक्स पेयर आहे. तरीहि, जशी मीं तुमची तक्रार करूं शकतों तशी माझ्या साहेबांकडे तुम्हीं माझ्याविरुद्ध त्वरित तक्रार करूं शकतां. हवा तर मींच फोन लावून देतों. माझी नोकरी जाईल म्हणून मीं घाबरत नाहीं. आय कॅन ऑल्वेज अर्न माय ब्रेड इन अ रिस्पेक्टेबल मॅनर."



त्यांच्याबरोबरचे मि. पटेल नांवाचे एक इन्स्पेक्टर काम करीत होतेच. त्यांना बहुधा ‘रिस्पेक्टेबल मॅनर’ चा टोला वर्मीं लागल्याचें दिसलें. कारण त्यांनीं अचानक चमकून माझ्याकडे पाहिलें. पण मीं वरकरणीं कांहींहि गैर शब्द वापरला नव्यता. ते मला मराठीतून म्हणाले, "मि. सुधीर, डेली प्रॉडक्शन रिपोर्ट दिले नाहींत तुम्हीं?"

"आम्हीं मेंटेन करीत नाहीं." मी.

"कां?"

"आमचें प्रॉडक्ट वेगळें आहे. जास्त टेक्निकल आहे आणि मुख्य म्हणजे इन्स्पेक्शन करून, जरूर तर टेस्ट रन घेऊन तयार झालें कीं लगेच पाठवावें लागतें. ऍंड मेऽऽनी अदऽऽ रीऽऽझन्स. द इशूऽऽ इस ऑलरेऽऽडी डिस्कस्ड ड्यॉरिंग ऑऽऽडिट्स. डेली प्रॉडक्शन रिपोर्ट इज नॉट मेंडेऽऽटरी ऍंड जस्ट नॉट पॉसिबल."

"पण तो लिहायला पाहिजे."

मी उत्तर दिलें नाहीं.

"डेली प्रॉडक्शन रिपोर्ट नाही लिहायची परमिशन घेतली आहे का कमिशनरची?" पटेलसाहेब.

"इट इज नॉट स्टिप्यूलेटेड अंडर लॉ. सच परमिशन डझ नॉट कम इन पिक्चर."

"इट ईज स्टिप्यूलेटेड."

"आय टेल यू हंबली सर, प्लीज गो थ्रू द लॉ. हें घ्या आर के जैन चें एक्साईज लॉ मॅन्युअल साहेब."

"मीं तुमच्याकडून कायदा शिकायला आलेलों नाहीं."

"मग मी कांहीं करूं शकत नाहीं."

पटेलसाहेब कांहींतरी पुटपुटत उठले आणि आमच्या संचालकांना भेटून त्यांनीं माझ्याविरुद्ध तक्रार केली.



- X - X - X -



तेवढ्यांत दूरध्वनि संचालिकेकडे दूध्व ठणाणला.

ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग.

"गुड आफ्टरनून हिल्डन."

"मे आय स्पीक टू दॅट रास्कल?

"सॉरी?"

"दॅट रास्कल! मि. बिल क्लिंटन?"

"मे आय नो हूऽऽ इज स्पीऽऽकिंग?"

"मि. लेविन्स्की. दॅट रास्कल हॅज स्पॉइल्ट क्लोद्स ऑफ माय सिस्टर."

"हा हा हा! गुड आफ्टरनून मि. फॅटसो! नाऊ आय रेकग्नाइज्ड यू. हाऊ आर यू? कॉंग्रॅट्स! आय हर्ड दॅट यू आर बाईंग अ न्यू कार?"

"येस. ऍंड आय नीड अ ड्रायव्हर. प्रेफरेबली अ लेडी ड्रायव्हर. प्रेफरेबली ऑफ नेम ऐश्वर्या!"

"हि हि, हू हू हू! प्लीज स्पीक टु मि. सुधीर."

हे महायश आमचें मघांचे मित्ररत्नच होतें आणि तो नेहमीं अशीच तिची टोपी उडवायचा. तिनें त्याला कधीं पाहिलें नव्हतें. पण त्याच्या बोलण्याची गंमत मात्र तिला वाटत असे. दोन क्षणांचा विरंगुळा. आणखी काय! हा संवाद तिनेंच मला दुसरे दिवशीं कौतुकानें साभिनय म्हणून दाखवला.

"काय रे?" मी.

म्हटलें झोंपण्यापूर्वीं तुझी खबर घ्यावी. शत्रुपक्ष काय म्हणतो?"

"ठीक. फोन केल्याबद्दल धन्यवाद."

"बाय!"



- X - X - X -



एक्साईज इन्स्पेक्टर पटेल आणि आमचे संचालक असे दोघे माझ्या कॅबिनमध्यें आले. "क्या हो गया?" आमचे संचालक.



जसें घडलें तसें मीं सागितलें.



"पटेलसाब, मि. सुधीर हमारे साथ दस बरससे काम कर रहें हैं. उनका सभी गव्हर्मेंट ऑफिशिअल्स के साथ बहुत अच्छा रिलेशन है ऍंड यू आर द फर्स्ट पर्सन टु कंप्लेन अगेन्स्ट हिम. फिर भी आपको अगर लगता है कि आपही सही हैं, तो आपका जोऽऽ है, जैऽऽसा है, रिपोर्ट लिखिये. नो प्रॉब्लेम. और प्लीऽऽज, बिगिनर जैसी ऍक्शन लेने की थ्रेट मत देना." जसा मीं बोना डिसोझाला पाठिंबा दिला तस्साच मला देखील आमच्या संचालकांनीं पूर्ण पाठिंबा दिला.



आतां त्या सुपरिंटेंडंटनीं प्रसंग ओळखून हस्तक्षेप केला, माझी माफी मागितली आणि शिंदेंना अणि पटेलना समजावून कायद्याच्या कक्षेंत राहून काम करायला संगितलें. बरोबर पांचला काम थांबवलें. नंतर आणखी दोन दिवस काम चालवलें. शिंदेसाहेब त्या काळांत आमच्याकडे पाणी देखील प्याले नाहींत. एकटेच बाहेर जाऊन जेवून वा चहा पिऊन यायचे आणि पाण्याची बाटली पण स्वखर्चानें विकत आणायचे. पटेलसाहेबां सहित इतर चौघे मात्र मी मागवलेलें चहापाणी, जेवण वगैरे मजेंत खातपीत होते. पांच वर्षांचे हिशेब तपासले. आदल्या वर्षाचे अभिलेख सखोल तपासणीला घेऊन गेले. त्यांचा अहवाल जिथें पाठवायचा तिथें पाठवला. शेवटीं त्यातून कांहींहि निष्पन्न झालें नाहीं. एका कवडीचीहि डिमांड, पेनल्टी वा फाईन येऊं शकली नाहीं.



अर्थात सगळे सरकारी अधिकारी असेच नसतात. शंभरांत पांचेक असे असतात. त्यांना विसरून जायचें. पांचेक टक्के तर सौजन्यमूर्ति असतात. उदा. मेनन मॅडम. अशा सौजन्यमूर्ति पण मला बत्तीस वर्षांच्या कालावधींत बर्‍याच भेटल्या. त्यांची आठवण जरूर ठेवावी. बाकी सगळे नॉर्मल असतात. म्हणजे पैशाच्या अपेक्षेनें पटापट कामें करतात. पैसे मिळणार नाही असें वाटलें तर खूप उपद्रव देऊन काम या ना त्या निमित्तनें लांबवणारे. हा काळाचा महिमा आहे झालें. व्यवसायाचा एक भाग म्हणतो आणि अजिबात मनस्ताप करून घेत नाहीं.


पूर्वप्रकाशन: http://www.manogat.com/diwali/2009/node/20.html





No comments: